ISL 2018-19: प्रेरणेसाठी प्रयत्नशील ब्लास्टर्ससमोर बेंगळुरूचे आव्हान

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (6फेब्रुवारी) येथील श्री कंठीरवा स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्ससमोर बेंगळुरू एफसीचे आव्हान असेल. हे दोन प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील तेव्हा त्यांच्यातील चुरशीला पुन्हा प्रारंभ होईल. ब्लास्टर्स फॉर्म उंचवण्यासाठी प्रेरणेच्या शोधात असून गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या बेंगळुरूचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर राहील.

गुणतक्त्यातील स्थिती काहीही असली तरी या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसाठी एकमेकांविरुद्ध तीन गुण वसूल करणे प्रतिष्ठेचे ठरेल. बेंळुरूने 13 सामन्यांतून 30 गुणांची कमाई करताना बाद फेरीतील स्थान जवळपास नक्की केले आहे. ब्लास्टर्सला 14 सामन्यांतून केवळ दहा गुण मिळविता आले असून त्यांचे आव्हान आटोपले आहे.

बेंगळुरूचे मुख्य प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, आम्ही आघाडीवर आहोत याचे कारण संघ म्हणून केलेले प्रयत्न. आम्ही धोके पत्करतो, पण आम्हाला त्याची कल्पना असते. याचा अंतिम निष्कर्ष म्हणजे आम्ही गुणतक्त्यात आघाडीवर आहोत.

मिकूचे संभाव्य पुनरागमन बेंगळुरू संघ आणखी भक्कम करेल. याशिवाय मध्यरक्षक-विंगर ल्युसीमा व्हिला याला करारबद्ध करण्यात आल्यामुळे संघाच्या आक्रमणात आणखी वैविध्य निर्माण झाले आहे. कर्णधार सुनील छेत्री याचा हरपलेला फॉर्म मात्र आघाडीवरील संघासाठी चिंतेचा ठरला आहे. छेत्रीला गेल्या 600 हून जास्त मिनिटांच्या खेळात गोल करता आलेला नाही.

नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध रिओ अँटो प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे कुआद्रात हरमनज्योत खाब्रा याला पसंती देण्याची शक्यता आहे. निशू कुमार याने अव्वल संघाबरोबर सराव करण्यास प्रारंभ केला आहे, पण त्याला स्टार्ट मिळण्याची शक्यता कमी आहे.

कुआद्रात यांनी सांगितले की, ब्लास्टर्स आणि आमच्यातील चुरस विलक्षण आहे. कोचीमधील वातावरण भारावून टाकणारे होते. त्या सामन्यात त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संघाला जोरदार पाठिंबा दिला. त्यांचा संघ हरला तरी सामन्यानंतर तेथील प्रेक्षकांनी आम्हाला चांगली दाद दिली,

ब्लास्टर्सकरीता हा मोसम निराशाजनक ठरला आहे. 13 सामन्यांत हा संघ एकही विजय मिळवू शकलेला नाही. जानेवारीत डेव्हिड जेम्स याना हटवून मुख्य प्रशिक्षक म्हणून नेलो विंगाडा यांना पाचारण करण्यात आले, पण पोर्तुगालचे विंगाडा सुद्धा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. सुत्रे स्विकारल्यानंतर पहिल्या दोन सामन्यांत एक बरोबरी व एक पराभव इतकीच कामगिरी ते करू शकले आहेत.

ब्लास्टर्सला यंदा संधींचे गोलमध्ये रुपांतर करता आलेले नाही. 139 वेळा संधी मिळाली असताना ते केवळ 13 गोल नोंदवू शकले आहेत. बचावाच्या बाबतीतही त्यांनी निराशा केली असून प्रतिस्पर्ध्याच्या 23 गोलचे त्यांचे प्रमाणे दुसऱ्या क्रमांकाचे आहे.

बेंगळुरूचा भक्कम बचाव भेदायचा असेल तर ब्लास्टर्सला आक्रमणात कल्पकता आणि शैली प्रदर्शित करावी लागेल. बचाव फळीत अनास एडाथोडीका याच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे संदेश झिंगन याला मदार पेलावी लागेल. लालरुथ्थारा दिल्ली डायनॅमोजविरुद्ध रेड कार्डमुळे ही लढत खेळू शकणार नाही.

विंगाडा यांनी सांगितले की, मी केवळ पुढील सामन्याकडे बघतो. पुढचा सामना नेहमीच सर्वाधिक महत्त्वाचा असतो. भुतकाळ मागे पडलेला असतो. काय चुकले हे पाहून पुढील सामन्यात काय सरस करता येईल हे पाहण्याची मला गरज असते. आम्ही गुणतक्त्यात एक किंवा दोन क्रमांक वर जाऊ शकू अशी मला आशा आहे.  आत्मविश्वास पुन्हा मिळविण्यासाठी आम्हाला प्रयत्नशील राहावे लागेल.

या खेळाडूंचा दर्जा बघता आम्हाला सरस खेळ करण्याची गरज आहे. त्यामुळे काय चुकले हे पाहून संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणे माझ्यासाठी गरजेचे आहे, असेही विंगाडा यांनी नमूद केले.

ब्लास्टर्सला लौकीक थोडाफार कमावण्यासाठीच खेळायचे असले तरी कट्टर प्रतिस्पर्ध्याला हरविणे एवढी प्रेरणा त्यांच्यासाठी पुरेशी ठरू शकेल. बेंगळुरूसाठी आघाडीचे स्थान भक्कम करणे महत्त्वाचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड-भारत टी२० मालिका हा संघ जिंकणार, जाणून घ्या कारण

चांगला खेळला नाही म्हणून कर्णधारालाच दिला संघातून डच्चू

टी२०तील तो मोठा पराक्रम करण्यासाठी युजवेंद्र चहलला मोठी संधी