ISL 2018-19: गोवा-दिल्ली यांच्या गोलशून्य बरोबरीची कोंडी

दिल्ली।  हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज ( 4 फेब्रुवारी) दिल्ली डायनॅमोज एफसी आणि एफसी गोवा यांच्यात गोलशून्य बरोबरीची कोंडी झाली. येथील नेहरू स्टेडियमवर गोव्याच्या चाली दिल्लीची बचाव फळी तसेच गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो यांनी मिळून फोल ठरविल्या..

लीगमध्ये सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत आघाडीवर असलेल्या गोव्याला मोसमात तिसऱ्यांदा गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. यापूर्वी जमशेदपूर आणि एटीके यांच्याविरुद्ध हे घडले होते.

गोव्याचे तिसरे स्थान कायम राहिले. 14 सामन्यांतून ही त्यांची चौथी बरोबरी असून सात विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 25 गुण झाले. बेंगळुरू एफसी (13 सामन्यांतून 30) आघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसी (14 सामन्यांतून 27) दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचेही आठवे स्थान कायम राहिले. 14 सामन्यांत दोन विजय, पाच बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण आहेत.

गोव्याने नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरवात केली. तिसऱ्याच मिनिटाला त्यांनी चाल रचली. यात कोरोमीनास याचा पुढाकार होता. त्याने ह्युगो बौमौस याला पास दिला. त्यातून ब्रँडन फर्नांडीसला संधी मिळाली. ब्रँडनने डावीकडून मंदार राव देसाई याला पास देण्याचा प्रयत्न केला, पण अखेर दिल्लीच्या बचाव फळीने हे आक्रमण रोखले.बर

चौथ्या मिनिटाला गोव्याच्या नेटच्या दिशेने चेंडू मारण्यात आला. त्यातून डॅनिएल लाल्हीम्पुईया याने बॉक्समध्ये आगेकूच करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा एकही सहकारी योग्य जागी नव्हता. त्यामुळे गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार चेंडूपर्यंत जाण्यास उशीर होऊनही फरक पडला नाही.

दहाव्या मिनिटाला कोरोमीनासला मध्य क्षेत्रात चेंडू मिळाला. त्याने बौमौसला डावीकडे बॉक्समध्ये पास दिला. त्यावेळी दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने दडपण आणल्यामुळे बौमौसने मारलेला चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला.

जॅकीचंद सिंगने ड्रिबलिंगचे कौशल्य प्रदर्शित करीत 14व्या मिनिटाला चाल नीट रचली. त्यामुळे त्याचे सहकारी बॉक्समध्ये योग्य ठिकाणी जाऊ शकले. त्याने उजवीकडून स्थितीचा व्यवस्थित अंदाज घेतला. त्याने मारलेला चेंडू मात्र कॉर्नरसाठी बाहेर गेला. त्यावर अहमद जाहौह याने मारलेला फटका फ्रान्सिस्कोने चेंडू एक टप्पा पडल्यानंतर अडविला.

चार मिनिटांनी बौमौसने मुसंडी मारली. त्याला दोन्ही बाजूंनी मोकळीक मिळाली होती. त्याने डावीकडील ब्रँडन फर्नांडीसला पास दिला, पण दिल्लीने बचाव केला.

दिल्लीच्या नारायण दासला 23व्या मिनिटाला संधी मिळाली. त्याने नवीनला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये जाऊन स्थिरावला.

गोव्याने तोपर्यंत सामन्यावर पकड मिळविली होती. दिल्लीचे खेळाडू चेंडूवरील ताबा सहज गमावित होते. तिसाव्या मिनिटाला दिल्लीच्या जियान्नी झुईवर्लून याला पास मिळाला, पण त्याने मारलेला स्वैर फटका क्रॉसबारच्या बराच वरून गेला.

जॅकीचंद सिंगने 36व्या मिनिटाला डावीकडून प्रयत्न केला, पण चेंडू थोडक्यात नेटवरून गेला. 41व्या मिनिटाला कोरीमासने बॉक्सलगत लेनी रॉड्रीग्जला पास दिला. लेनीने चेंडूवर नीट ताबा मिळवित फटका मारला, पण चेंडू थेट फ्रान्सिस्कोकडे गेला.

दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिचाला ब्रँडन फर्नांडीने सुमारे 35 यार्ड अंतरावरून फ्री-किकवर डावीकडून फटका मारला. त्यावर झुईवर्लूनला संधी मिळाली, पण त्याला हेडिंगमध्ये अचूकता साधता आली नाही.

ब्रँडन फर्नांडीसने 54व्या मिनिटाला प्रयत्न केला, पण झुईवर्लून याने डावीकडील ही चाल चेंडू छातीने अडवित फोल ठरविली. पुढच्याच मिनिटाला ब्रँडनने मारलेला चेंडू दिल्लीचे बचाव क्षेत्र भेदून बॉक्समध्ये लेनीकडे गेला. त्याचवेळी फ्रान्सिस्को पुढे सरसावला. त्याने चेंडू अडविला. तेव्हा गोव्याचे पेनल्टीचे अपील फेटाळून लावत पंच ओमप्रकाश ठाकूर यांनी बचाव नियमानुसार असल्याचा कौल दिला.

गोव्याला 59व्या मिनिटाला आणखी एक संधी मिळाली. कोरोमीनासने रचलेली चाल दिल्ली थोपविली, पण चेंडू बदली खेळाडू एदू बेदीया याच्याकडे गेला. बेदीयाने डाव्या पायाने मारलेला फटका मात्र जास्त ताकदीमुळे नेटवरून गेला.

दोन मिनिटांनी ब्रँडन-बेदीया यांनी चाल रचली. त्यावेळी नारायण दासने दडपण आणत साथ दिल्यानंतर फ्रान्सिस्कोने चेंडू रोखला.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया विरुद्ध या तीन खेळाडूंना मिळू शकते विश्रांती

एकेकाळी यो-यो टेस्टही पास न होणारा खेळाडू झाला टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू

पंड्यावर कडाडून टीका करणारा दिग्गज क्रिकेटपटू आता करतोय त्याचेच कौतुक