ISL 2018: नॉर्थइस्ट-बेंगळूरू लढतीत अव्वल स्थानाची चुरस

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीने पाचव्या मोसमात आतापर्यंत ठसा उमटविला आहे. आठ सामन्यांत अपराजित राहत सलग सहा व एकूण सात विजय मिळविलेला हा संघ आघाडीवर आहे. आज (5 डिसेंबर) येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर मात्र त्यांना दक्ष राहावे लागेल. त्यांची दुसऱ्या क्रमांकावरील नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत आहे.

नॉर्थइस्टचे प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांच्यासमोर विजयासह बेंगळुरुची अपराजित मालिका संपुष्टात आणणे असे दुहेरी ध्येय असेल. नॉर्थइस्टला यंदा प्रामुख्याने घरच्या मैदानावर जोरदार कामगिरी करता आलेली नाही. चार सामन्यांत त्यांना एकच विजय मिळविता आला आहे. लिगच्या दुसऱ्या टप्याच्या प्रारंभी 20 गुणांचा पल्ला पार करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यासाठी अनुकुल निकाल साधण्याची त्यांना अपेक्षा असेल, पण कमी कालावधीत जास्त सामने होत असल्यामुळे ते सोपे नसेल.

शात्तोरी यांनी सांगितले की, वेळापत्रकाचा विचार केल्यास बेंगळुरुला फायदा होईल, पण त्यांचा सर्वोत्तम खेळाडू मिकू उपलब्ध नसेल. त्यामुळे ही बाब प्रतिकूल असेल. अर्थात मिकू नसला तरी जिंकू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आतापर्यंत सहाच गोल पत्करले आहेत. त्यामुळे त्यांचा बचाव भेदणे अवघड असेल.

शात्तोरी यांची मदार स्टार स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे याच्यावर असेल. गोल्डन बूट किताबाच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. मध्य फळीत ज्योस लेऊदो व रॉलीन बोर्जेस यांना अतिरीक्त जबाबदारी पार पाडावी लागेल. बेंगळुरूची बचाव फळी डिमास डेल्गाडो आणि एरीक पार्टालू यांच्यामुळे भक्कम आहे.

बेंगळुरूने बाहेरील सामन्यांत शंभर टक्के यश मिळविले आहे. चारही लढती त्यांनी जिंकल्या आहेत. मिकू हा त्यांच्या संघातील महत्त्वाचा घटक आहे. तो नसला तरी सुनील छेत्री, उदांता सिंग व इतरांनी आव्हान पेलले आहे.

बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात गोलसमोरील सांघिक प्रयत्नांमुळे आनंदात आहेत. राहुल भेके, निशू कुमार अशा खेळाडूंनी एक-दोन गोल करीत बेंगळुरूच्या प्ले-ऑफच्या दिशेने सुरु असलेल्या वाटचालीत वाटा उचलला आहे.

कुआद्रात यांनी सांगितले की, यंदाच्या मोसमात नॉर्थइस्टने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. यंदा मी पाहिलेल्या त्यांच्या सर्व सामन्यांतून त्यांनी बरीच पूर्वतयारी केल्याचे स्पष्ट होते. ते कसून सराव करीत आहेत. त्यांनी गुणवान खेळाडू हेरण्याची प्रक्रिया चांगली केल्याचेही दिसून येते. त्यांनी काही चांगले खेळाडू मिळविले आहेत. नॉर्थइस्ट क्लबची प्रगती होत असल्याचे तुम्ही पाहू शकता.

घरच्या मैदानाबाहेर खेळत नसल्यास थोडे दडपण येऊ शकते असे बेंगळुरूच्या निकालांवरून दिसून येते. गेल्या तीन अवे सामन्यांत त्यांच्याविरुद्ध किमान एक गोल झाला आहे. शात्तोरी यांनी आपला होमवर्क पक्का केला असेल. आता त्यांनी आखलेल्या डावपेचांची मैदानावर अंमलबजावणी करण्याचे आव्हान खेळाडूंवर असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018:जमशेदपूरशी बरोबरीमुळे ब्लास्टर्सच्या आशांना आणखी धक्का

२०११ विश्वचषकाचा हिरो गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्ती

डुबकी किंग परदीप नरवालला प्रो कबड्डीत मोठा विक्रम करण्याची संधी