ISL 2018-19: गोव्याविरुद्ध भरपाईचा प्रेरीत मुंबईचा निर्धार

मुंबई| मुंबई सिटी एफसीची हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (1 फेब्रुवारी) एफसी गोवा संघाविरुद्ध लढत होणार आहे. बेंगळुरूवरील विजयाने प्रेरित झालेल्या मुंबईचा पहिल्या टप्यात गोव्यातील दारुण पराभवाच्या भरपाईचा निर्धार असेल. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार हा सामना मुंबई फुटबॉल एरीनावर खेळला जाणार आहे.

मुंबई 13 सामन्यांतून 27 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोवा सहा गुणांनी मागे आहे, पण गोव्याचा एक सामना कमी झाला आहे. बाद फेरीत जाणाऱ्या पहिल्या चार संघांच्यादृष्टिने ही लढत महत्त्वाची आहे. मुंबईचा संघ जिंकल्यास 30 गुणांचा टप्पा गाठू शकेल. त्याचवेळी गोव्याला पराभव झाल्यास जमशेदपूर एफसी आणि एटीके गाठण्याची भिती असेल.

पहिल्या टप्यात गोव्याकडून मुंबईचा पाच गोलांनी धुव्वा उडाला होता. त्यानंतर मात्र मुंबईच्या संघाने पुनरागमन केले आहे. प्रशिक्षक जोर्गो कोस्टा यांनी त्या लढतीनतंर शुभाशिष बोस याला त्याच्या पसंतीच्या लेफ्ट-बॅक जागेवर परत नेले. याचा मुंबईला फायदा होत आहे. हा संघ नऊ सामन्यांत अपराजित असून बेंगळुरूला मोसमातील पहिला पराभव पत्करण्यास त्यांनीच भाग पाडले.

कोस्टा यांनी सांगितले की, गोव्याविरुद्ध मागील सामन्याचा दिवस आमच्यासाठी खराब गेला. त्यानंतर मात्र स्थिती बरीच सुधारली आहे. आम्ही काही खास बदल केलेले नाहीत, पण उद्याचा सामना आमच्यासाठी वेगळा ठरेल. अंतिम निकाल काय असेल हे मला माहित नाही, पण तो आधीच्या सामन्यासारखा नसेल. आम्ही आमच्या शैलीचा, तर गोवा त्यांच्या शैलीचा खेळ करते. त्यांचा संघ चांगला आहे आणि चांगल्या फॉर्मात आहे. चेंडूवर ताबा कसा ठेवायचा हे त्यांना माहित आहे, पण त्यास कसे सामोरे जायचे हे आम्हाला सुद्धा ठाऊक आहे.

अरनॉल्ड इसोको बाजूने धोकादायक आक्रमण करतो. त्यामुळे तो प्रतिस्पर्धी फुल-बॅकसाठी डोकेदुखी ठरला आहे. मागील सामन्यात मोडोऊ सौगौऊला मांडीची दुखापत झाल्यामुळे बदली खेळाडू निवडण्यात आला. सेनेगलचा हा स्ट्रायकर तंदुरुस्त झाला आहे हे पाहावे लागेल.

मुंबई सिटी भेदक प्रतिआक्रमण करू शकतो, तर गोवा दोन्ही बाजूंनी फलदायी चाली रचू शकतो. गोव्याने यंदा केलेल्या 27 पैकी 12 गोल क्रॉस पासेसवर झाले आहेत.

एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक जीझस टॅटो यांनी सांगितले की, गोव्यातील पराभवानंतर मुंबई संघाने विलक्षण लय मिळविली आहे. त्यांनी जबरदस्त पुनरागमन केले आहे. त्यांनी आघाडीवरील बेंगळुरूा हरविले. त्यामुळे आम्ही शंभर टक्के दर्जाचा खेळ केला नाही तर सामना अवघड ठरेल.

मुंबईचा बचाव चिवट, तर गोव्याचे आक्रमण भक्कम आहे. मुंबईने आतापर्यंत सात क्लीन-शीट राखल्या आहेत. गोव्याचा आक्रमणाचा धडाका पाहता या लढतीत मात्र मुंबईच्या बचावाची कसोटी लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रो कबड्डीसाठी युवा खेळाडूंची निवड चाचणी ५ फेब्रुवारी पासून

भारतीय रेल्वे संघाने जिंकले ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

ISL 2018-19: दिल्लीकडूनही ब्लास्टर्सला पराभवाचा धक्का