ISL 2018-19: छेत्रीच्या गोलमुळे बेंगळुरूची ब्लास्टर्सशी बरोबरी

बेंगळुरू।  संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने आज (6 फेब्रुवारी) हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सला 2-2 असे बरोबरीत रोखले.

पूर्वार्धातील पेनल्टीसह दोन गोलांची पिछाडी बेंगळुरूने उत्तरार्धात भरून काढली. निर्धारीत वेळ संपण्यास पाच मिनीटे बाकी असताना कर्णधार सुनील छेत्री याने गोल केला. त्यामुळे श्री कंठीरवा स्टेडियमवर जमलेल्या 13 हाजर 572 चाहत्यांना यजमान संघ एका गुणासह दिलासा देऊ शकला.

ब्लास्टर्सकडून स्लाविसा स्टोयानोविचने पेनल्टी सत्कारणी लावली, तर करेज पेकूसन याने दुसरा गोल केला. बेंगळुरूतर्फे उदांता सिंग व छेत्री यांनी गोल केले.

बेंगळुरूने 14 सामन्यांत चौथी बरोबरी साधली असून नऊ विजय व एकच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 31 गुण झाले. त्यांची आघाडी कायम राहिली. मुंबई सिटी एफसी (14 सामन्यांतून 27) दुसऱ्या, तर एफसी गोवा (14 सामन्यांतून 25) तिसऱ्या व नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (14 सामन्यांतून 24) चौथ्या स्थानावर आहे. बाद फेरीच्या आशा आधीच संपलेल्या ब्लास्टर्सला 15 सामन्यांत आठवी बरोबरी पत्करावी लागली असून एकमेव विजय  व सहा पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण व शेवटून दुसरे नववे स्थान कायम राहिले.

बेंगळुरूला दुर्दैवी परिस्थितीत पेनल्टीला सामोरे जावे लागले. 16व्या मिनिटाला महंमद रकीपने उजवीकडून चार रचली. पेनल्टी क्षेत्रात चेंडू बेगळुरूच्या किन लुईस याच्या खांद्याला लागला. पंच तेजस नागवेकर यांनी हे पाहिले. त्यामुळे त्यांनी ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. स्टोयानोविचने ती घेतली. त्याने उजवीकडे मारलेल्या फटक्यावर बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा अंदाज चुकला.

40व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा दुसरा गोल झाला. साहल अब्दुल समादने उजवीकडे सैमीनलेन डुंगलला पास दिला. स्वःताला आगेकूच करण्याचा वाव नसल्याचे दिसताच डुंगलने करेज पेकूसनला पास दिला. पेकुसनने नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारलेला फटका गुरप्रीतच्या बाजूने आत गेला.

बेंगळुरूची गोलची प्रतिक्षा उत्तरार्धात 69व्या मिनिटाला संपुष्टात आली. एरीक पार्टालू याने उजवीकडून दिलेल्या क्रॉस चेंडूला सुनील छेत्रीने हेडिंगकरवी नेटच्या समोर मध्यभागी असलेल्या उदांता सिंगकडे दिशा दिली. उदांताना सहा यार्डवरून लक्ष्य साधले.

बेंगळुरूने 85व्या मिनिटाला बरोबरी साधली. हरमनज्योत खाब्राने टाचेचा वापर करीत उदांताला उजवीकडे पास दिला. उदांताने बॉक्समध्ये दिलेल्या क्रॉस चेंडूला छेत्रीने हेडिंगवर नेटची दिशा दिली.

पहिला प्रयत्न ब्लास्टर्सने केला. तिसऱ्याच मिनिटाला सैमीनलेन डुंगलने उजवीकडून बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने पलिकडील बाजूला स्टोयानोविचला पास दिला, पण स्टोयानोविचचा फटका क्रॉसबारवरून गेला.

चार मिनिटांनी डुंगलने उजवीकडून मुसंडी मारत साहल अब्दुल समादला पास दिला. समादने चेंडू पुन्हा डुंगलकडे सोपविला, पण डुंगलने मारलेल्या फटक्यात जादा ताकद होती. त्यामुळे चेंड गोल कीकसाठी बाहेर गेला. त्यातून उल्लेखनीय असे काही घडले नाही.

तेराव्या मिनिटाला पहिला कॉर्नर बेंगळुरूला मिळाला. उदांता सिंगने बॉक्समध्ये मारलेला चेंडू प्रीतम कोटलने ब्लॉक केला. चेंडू पुन्हा बाहेर जाऊन कॉर्नर मिळाला. डिमास डेल्गाडोने घेतलेल्या कॉर्नरवर ब्लास्टर्सच्या बचाव फळीने चेंडू पुन्हा ब्लॉक केला.

रकीपने 21व्या मिनिटाला उजवीकडून मारलेला चेंडू नेटपासून लांब होता. गुरप्रीतने उडी घेत चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे ढोपर ब्लास्टर्सच्या संदेश झिंगनच्या चेहऱ्याला लागून रक्त येऊ लागले, पण झुंजार झिंगनने थोडेसे उपचार करून घेत लगेच खेळ पुढे सुरु ठेवला.

बेंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅनला  26व्या मिनिटाला यलो कार्डलासामोरे जावे लागले. त्याने डुंगलला धसमुसळ्या पद्धतीने रोखले. एरीक पार्टालूने 29व्या मिनिटाला बॉक्समध्ये मारलेला चेंडू ब्लास्टर्सच्या बचाव फळीला अडविता आला नाही, पण सुनील छेत्रीने काहीशी आधीच हालचाल केल्यामुळे ऑफसाईडचा इशारा झाला.

उत्तरार्धात बेंगळुरूने सुरवातीपासून प्रयत्न केले. उदांताने उजवीकडून क्रॉस चेंडू दिल्यानंतर छेत्री हेडिंगद्वारे फिनिशिंग करू शकला नाही. चेंडू क्रॉसबारवरून गेल्यामुळे छेत्री स्वतःवरच नाराज झाला. 54व्या मिनिटाल डुंगल आणि डेल्गाडो यांच्यात चेंडूवरील ताब्यावरून चकमक झडली. डुंगलने अपश येताच डेल्गाडोला ढकलले. डेल्गाडोनेही परतफेड केली. डुंगलने प्रत्यूत्तर दिले. अखेर झिंगनने डुंगलला शांत केले.

प्रीतम सिंगने 56व्या मिनिटाला मैदानावर घसरत उदांताला रोखले. त्यामुळे पंचांनी त्याला यलो कार्ड दाखवित बेंगळुरूला फ्री किक दिली. झिस्को हर्नांडेझने घेतलेली फ्री किक मात्र थेट ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंग याच्याकडे गेली. धीरजने पंच टाकत चेंडू बाहेर घालविला. छेत्रीने 63व्या मिनिटाला मिकूला पास दिला, पण झिंगनने ही चाल रोखली. चेंडू कॉर्नरसाठी बाहेर गेला. कॉर्नरवर विशेष काही घडले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकात किंग कोहली तिसऱ्या नाही तर या क्रमांकावर येणार फलंदाजीला

आयसीसी क्रमवारीत टाॅप १२ गोलंदाजांत फक्त तो एकटाच वेगवान गोलंदाज

रणजी ट्रॉफी २०१८-१९: विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र अंतिम सामना रोमहर्षक स्थितीत