ISL 2018-19: नॉर्थईस्ट युनायटेडची बाद फेरी पुन्हा हुकणार ?

हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठ मुळ क्लबमध्ये बाद फेरी गाठू न शकलेला नॉर्थईस्ट युनायटेड एफसी हा एकमेव संघ आहे.

या संघाने काही प्रेरणादायी विजय मिळविले आहेत. आयएसएलमध्ये त्यांनी भक्कम सुरवातही केली आहे. त्यांना केलेला प्रयत्न आणि लाभलेला चाहत्यांचा पाठिंबा याला मात्र अद्याप फळ मिळालेले नाही. चार प्रयत्नांत त्यांना अद्याप बाद फेरी गाठता आलेली नाही. अशी वेळ आलेला हा एकमेव संघ आहे. यंदा त्यांची सुरवात पाहिली तर ही प्रतिक्षा अखेर संपुष्टात येईल असा विश्वास अनेक चाहत्यांना वाटत होता.

आता मात्र परिस्थिती काहीशी बदलली आहे. चुरस वाढत असताना एल्को शात्तोरी यांचा संघ बाद फेरीसाठी शेवटच्या चौथ्या क्रमांकावर आहे. 14 सामन्यांतून त्यांनी 23 गुण मिळविले आहेत. प्रामुख्याने चांगल्या सुरवातीमुळे ही स्थिती त्यांना निर्माण करता आली. गेल्या चार सामन्यांत मात्र त्यांना एकही विजय मिळविता आलेला नाही. खेळाडूंची तंदुरुस्ती आणि संघनिवडीतील समस्या ही यामागील कारणे आहेत. गेल्या सहा सामन्यांत त्यांना एकच विजय मिळाला आहे. त्यावरून कामगिरी इतकी घसरणे चाहत्यांसाठी चिंताजनक ठरले आहे.

शात्तोरी यांनी सांगितले की, आम्हाला कसून सराव करावा लागेल आणि अपेक्षित निकाल साध्य करावे लागतील. आम्ही केवळ विशिष्ठ गोष्टींवरच अवलंबून आहोत असे नाही. बाद फेरीच्या इतक्या जवळ आल्यानंतर ध्येय गाठणे अवघड बनणे ही स्थिती काही सोपी नाही. आता आम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागेल.

नॉर्थईस्ट युनायटेडचा क्रमांक तिसऱ्या स्थानावरील एफसी गोवा संघानंतर आहे. गोव्याचे 25 गुण आहेत. जमशेदपूर एफसी आणि एटीके प्रत्येकी 20 गुणांसह नॉर्थईस्टचा पाठलाग करीत आहेत. अशावेळी प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरेल.

नेदरलँड््सचे शात्तोरी पुढे म्हणाले की, एटीके आणि जमशेदपूर यांच्याविषयी मला आदर वाटतो, पण ते त्यांचे उरलेले सर्व सामने हरतील अशी आशा मला वाटते. आमच्या संघाच्या खाली असलेल्या प्रतिस्पर्ध्यांनी गुण गमावावेत, कारण बाद फेरीत पहिले चार संघ जातील.

दोन संघ मागोमाग असल्यामुळे नॉर्थईस्टला उरलेले सर्व सामने जिंकणे महत्त्वाचे ठरले आहे. शेवटच्या चार सामन्यांतील प्रतिस्पर्धी यातील अनुकुल घटक ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्या मोहीमेला चालना मिळू शकते.

दिल्ली डायनॅमोज, मुंबई सिटी, एफसी पुणे सिटी आणि केरळा ब्लास्टर्स असे हे प्रतिस्पर्धी आहेत. यातील मुंबई वगळता इतरांना बाद फेरीची अगदी धुसर किंवा अजिबात संधी नाही हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल.

अर्थात म्हणून गुण मिळविणे सोपे ठरणार नाही. दिल्लीने सोमवारी गोव्याला बरोबरीत रोखले. त्यावरून तळातील संघ बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या संघांचा मार्ग अवघड करीत असल्याचे स्पष्ट होते.

नॉर्थईस्टसाठी पूर्वीच्या प्रशिक्षकांना जे जमले नाही ते शात्तोरी करून दाखविणार का ? बाद फेरीतील प्रवेशाचे तिकीट ते कायम ठेवणार का की तिसऱ्या मोसमाप्रमाणे अखेरच्या काही फेऱ्यांत भरकटणार? याचे उत्तर पुढील चार सामन्यांतून मिळेल.

यातील पहिला सामना उद्या (7 फेब्रुवारी) आहे. यामध्ये नॉर्थईस्ट दिल्ली डायनामोजशी भिडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ISL 2018-19: छेत्रीच्या गोलमुळे बेंगळुरूची ब्लास्टर्सशी बरोबरी

विश्वचषकात किंग कोहली तिसऱ्या नाही तर या क्रमांकावर येणार फलंदाजीला

आयसीसी क्रमवारीत टाॅप १२ गोलंदाजांत फक्त तो एकटाच वेगवान गोलंदाज