ISL 2018: विजयाच्या हॅट्रिकनंतर मुंबईचे विक्रमाकडे लक्ष्य

मुंबई: मुंबई सिटी एफसीची शनिवारी हिरो इंडियन सुपर लिगमध्ये माजी विजेत्या एटीकेविरुद्ध लढत होत आहे. सलग तीन सामने जिंकल्यानंतर मुंबईने लिगच्या इतिहासात चार सामन्यांची यशोमालिका साधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी त्यांना एटीकेचा बचाव भेदावा लागेल.

जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबईने गेल्या तीन सामन्यांत अद्याप एकही गोल स्विकारलेला नाही. ही आकडेवारी एटीकेसाठी चिंतेची असेल. मुंबईला आठ गोल पत्करावे लागले असून त्यातील पाच एकाच सामन्यात एफसी गोवा संघाविरुद्ध झाले आहेत. त्यामुळे हा अपवाद सोडल्यास मुंबईचा बचाव किती चिवट राहिला आहे हे स्पष्ट होते.

कोस्टा यांनी सांगितले की, काही वेळा तुम्हाला दैवाची साथ मिळते आणि तीन गुण मिळतात. एरवी तसे शक्य होत नाही.

पहिल्या पाच संघांमध्ये केवळ मुंबईचा गोलफरक उणे आहे. त्यावरून शैलीपेक्षा निकालांना महत्त्व देण्याची कोस्टा यांची विचारसरणी स्पष्ट होते. विशेष म्हणजे एटीके आणि मुंबई यांनी सारखेच गोल केले असून सारखेच पत्करले आहेत. गुणांमध्ये मात्र मुंबई तीनने पुढे आहे.

कोस्टा यांनी सांगितले की, एटीकेचा संघ फार चांगला आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आणि चांगले तसेच अनुभवी प्रशिक्षक आहेत. आम्ही सोप्या सामन्याची अपेक्षा ठेवणार नाही. एटीकेची लिगमधील स्थिती त्यांना सुरवातीला अपेक्षित होी झाती तशी नाही हे खरे आहे, पण मी माझ्या तसेच माझ्या खेळाडूंच्या हातात असलेल्या गोष्टींकडे लक्ष देईन.

एटीकेने आधीच्या सामन्यात एफसी पुणे सिटीवर एकमेव गोलने विजय मिळविला. कालू उचे जायबंदी झाल्यामुळे त्यांनी पुण्याहून एमिलीयानो अल्फारो याला लोनवर मिळविले, पण दुर्दैवाने उरुग्वेच्या अल्फारो याला सुद्धा दुखापत झाली. त्यामुळे आता स्टीव कॉपेल यांच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या एली बाबाल्ज याला करारबद्ध केले आहे. मुंबईचा चिवट बचाव भेदण्यासाठी प्रयत्नशील असलेला एटीके संघ त्याला मैदानावर उतरविण्याची शक्यता आहे.

कॉपेल यांनी सांगितले की, मुंबईचा संघ भक्कम असल्यामुळे आम्हाला आदर वाटतो. गोव्याविरुद्ध त्यांना अडथळ्याचा सामना करावा लागला. त्यांचा संघ फार चांगला संघटित आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे अवे सामन्यात खेळणे व त्यांचा बचाव भेदणे हेच आमच्यासमोर खरे आव्हान आहे. त्यास सामोरे जाण्यास आम्ही आतूर आहोत.

गेर्सन व्हिएरा मध्य फळीत आंद्रे बिके याच्या साथीत कायम असेल. जॉन जॉन्सन सेंटरबॅक म्हणून साथ देईल. कोमल थातल याची उजव्या बाजूची उपस्थिती मुंबईसाठी चिंतेची बाब असेल. यंदाच्या मोसमात प्रोणय हल्दर आणि एव्हर्टन सँटोस यांनी एटीकेसाठी सरस कामगिरी केली आहे. त्यातही सँटोसला मध्य फळीत खेळावे लागले आहे, जी त्याची नेहमीचा जागा नाही.

व्यवहारी दृष्टिकोन अवलंबिणाऱ्या दोन प्रशिक्षकांमधील ही लढत असेल. त्यामुळे यात कोण आधी चमक दाखविणार आणि बाजी मारणार याची उत्सुकता आहे.