ISL 2018: आज मातब्बर टीम कॅहीलच्या आयएसएल पदार्पणाची अपेक्षा

बेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) ऑस्ट्रेलियाचा मातब्बर टीम कॅहील जमशेदपूर एफसीकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर रविवारी बलाढ्य बेंगळुरू एफसीविरुद्ध त्याच्या आयएसएल पदार्पणाचा योग येण्याची अपेक्षा आहे.

बेंगळुरूने पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध 1-0 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. पहिल्या सामन्यात क्लीन शीट राखल्यामुळे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांचा सर्जिओ सिदोंचा, मारिओ आर्क्वेस यांच्यासह कॅहीलला मोकळीक न देण्याचा प्रयत्न राहील.

सिदोंचा आणि आर्क्वेस यांनी मुंबई सिटी एफसीविरुद्ध लक्षवेधी खेळ केला होता, तर कॅहिल ऑस्ट्रेलियाकडून विक्रमी चार विश्वकरंडक स्पर्धांत खेळला आहे. जमशेदपूरला चेंडू मैदानावर सक्रीय असताना खेळणे पसंत असते. अशावेळी बेंगळुरूच्या सेट-पीसवरील क्षमतेचा फायदा उठविण्याचाही स्पेनच्या कुआद्रात यांचा प्रयत्न राहील.

कुआद्रात म्हणाले की, चेंडू ताब्यात असताना फार चांगला खेळ करता येतो हे जमशेदपूरने मुंबईविरुद्ध दाखवून दिले होते. चांगल्या आक्रमक चाली रचण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. चुरशीने खेळायचे, चेंडूवर ताबा ठेवायचा आणि आमच्या स्ट्रायकर्सच्या क्षमतेचा फायदा उठविण्याची योजना असेल. चेन्नईयीनविरुद्ध दुसऱ्या सत्रात आम्ही किती संधी निर्माण केल्या हे तुम्ही पाहिले असेल.

जमशेदपूरची मोहिमेला चमकदार सुरवात झाली. पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबईला हरविले. तेव्हा त्यांनी बहुतांश वेळ वर्चस्व राखले. प्रशिक्षकांच्या कार्यपद्धतीशी खेळाडूंनी जुळवून घेतल्याचे दिसून आले.

जमशेदपूरने बचावात्मक संघटन उत्तम असल्याचेही दाखवून देताना अंतिम टप्यात मुंबईचे आक्रमण निकामी ठरविले. बेंगळुरूविरुद्ध मात्र मिकू, सुनील छेत्री आणि उदांता सिंग अशा दर्जेदार त्रिकुटामुळे त्यांच्या बचाव फळीची कसोटी लागेल.

जमशेदूपरचे मार्गदर्शक सेझार फरांडो यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, कुआद्रात हे चांगले प्रशिक्षक असल्याचे मला माहित आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगला खेळ केला आणि चेन्नईयीनसारख्या भक्कम संघाविरुद्ध विजय मिळविला. बेंगळुरूमध्ये जिंकणे आमच्यासाठी आव्हान असेल, पण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू.

गेल्या मोसमात बेंगळुरूची घरच्या मैदानावरील कामगिरी हेवा करण्यासारखी झाली होती. त्यांनी नऊ पैकी सहा सामने जिंकले होते, पण घरच्या मैदानावर त्यांना हरविलेल्या दोन संघांमध्ये जमशेदपूरचा समावेश होता. दुसरा मुद्दा म्हणजे जमशेदपूरने प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील सामन्यांत पाच वेळा क्लीन शीट राखली होती. या बाबतीत त्यांची साखळीत सर्वोत्तम कामगिरी झाली होती.

स्ट्रार स्ट्रायकर कॅहील निवडीसाठी उपलब्ध असेल, तर धनचंद्र सिंग जायबंदी आहे. फरांडो यांनी सांगितले की, कॅहीलला करारबद्ध करणे आमच्यासाठी चांगले आहे. तो फार महत्त्वाचा खेळाडू आहे. तो खेळेल असे वाटते. भारताच्या तरुण खेळाडूंसाठी त्याचा अनुभव फार उपयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.

कॅहिल बेंगळुरूवर जमशेदपूरला पुन्हा विजय मिळवून देण्यास प्रेरित करणार का की बेंगळुरू घरच्या मैदानावरील वर्चस्व अबाधित राखणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार ठरेल.