ISL 2018: दिल्लीविरुद्धच्या लढतीत बेंगळुरुचा छेत्री केंद्रस्थानी

बेंगळुरू:  हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर सोमवारी बेंगळुरू एफसी आणि दिल्ली डायनॅमोज यांच्यात लढत होत आहे. या लढतीत सर्वांचे लक्ष सुनील छेत्री याच्याकडे असेल. तो बेंगळुरूसाठी 150वा सामना खेळेल. गुणतक्त्यात बेंगळुरू दुसऱ्या, तर दिल्ली शेवटच्या स्थानावर आहे.
 
छेत्री हा बेंगळुरूचा आधारस्तंभ राहिला आहे. यंदा त्याने पाच गोल केले आहेत. तो क्लब स्थापन झाल्यापासून या संघाकडून खेळत आहे. क्लबने चँपीयन म्हणून केलेल्या वाटचालीत त्याचे योगदान बहुमोल ठरले आहे. एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी केलेला गोल निर्णायक ठरला. यावरून त्याची कामगिरी दोन संघांमधील तफावत ठरू शकते हे पुन्हा दिसून आले.
 
तळातील दिल्ली फॉर्मसाठी झगड आहे. त्यामुळे भरात आलेल्या बेंगळुरूविरुद्ध त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल. आतापर्यंत बेंगळुरू एफसी हाच एकमेव अपराजित संघ आहे. त्यांचे केवळ सहाच सामने झाले आहेत. गोव्याविरुद्ध 2-1 अशा प्रभावी विजयासह त्यांनी सातत्य राखले आहे. त्या लढतीत दोन्ही संघांना दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले. मध्यरक्षक डिमास डेल्गाडो निलंबीत असल्यामुळे त्याच्या गैरहजेरीत बेंगळुरुला खेळावे लागेल. झिस्को हर्नांडेझ त्याची जागा घेण्याची शक्यता आहे.
 
मागील सामन्यास स्टार स्ट्रायकर मिकू आणि एरीक पार्टालु दुखापतीमुळे मुकले. पार्टालू याच्या पायाच्या बोटावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही. मिकूच्या घोट्याला सुज आली आहे. त्यातून सावरल्यास तो खेळू शकेल. तसे झाले नाही तर चेंचो गील्टशेन याला छेत्रीच्या साथीत आक्रमणाची धुरा सांभाळावी लागेल. गोव्याविरुद्ध त्याला पहिली संधी मिळाली होती.
 
दिल्लीला दुसरीकडे मोक्याच्या क्षणी आक्रमणातील ढिलाई भोवत आहे. त्यांना आठ सामन्यांत मिळून केवळ सात गोल करता आले आहेत. संधी मिळवूनही सफाईदार फिनिशिंग करता येत नाही अशी दिल्लीची स्थिती झाली आहे. लिगचा पहिला टप्पा निराशाजनक ठरल्यानंतर त्यातून सावरून खेळाडू पुरेशी विश्रांती घेऊन सज्ज व्हावेत अशी प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांची आशा असेल.
 
प्रीतम कोटल आणि नारायण दास यांच्यावर बचावाची जबाबदारी असेल. दिल्लीविरुद्ध आतापर्यंत 13 गोल झाले आहेत. गोलरक्षक म्हणून गोम्बाऊ अल्बिनो गोम्स किंवा फ्रान्सिस्को डोरोन्सोरो यांच्यापैकी कुणाला संधी देणार यावर संघाचे स्वरूप अवलंबून असेल. डॅनिएल लाहलीम्पुईया बेंगळुरूविरुद्ध छाप पाडण्यास जास्त आतूर असेल. याचे कारण तो पूर्वी बेंगळुरूकडे होता आणि त्याला आयएसएलमध्ये केवळ पाच मिनिटे संधी मिळाली होती.
 
बेंगळुरू वर्चस्व कायम ठेवत आणखी एक विजय मिळविणार कि दिल्ली मोसमातील पहिला विजय मिळवून चकित करणार याची उत्सुकता आहे.