ISL 2018: पुण्याविरुद्ध तीन गुणांचा एटीके संघाचा निर्धार

कोलकता: स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखालील एटीकेची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर शनिवारी एफसी पुणे सिटी संघाविरुद्ध लढत होत आहे. लीगमधील आव्हानाला चालना देण्यासाठी निर्णायक विजयासह तीन गुण जिंकण्याचा एटीकेचा निर्धार असेल.

पुणे सिटीची लिगमधील सुरवात आतापर्यंतची सर्वाधिक खराब ठरली आहे. केवळ दोन गुणांसह हा संघ शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांना अद्याप एकही विजय मिळविता आलेला नाही. यानंतरही विजयाची चव चाखण्यासाठी हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आतूर आहे. पुण्यासमोरील आव्हान मात्र बिकट झाले आहे. याचे कारण दिएगो कार्लोस आणि मार्सेलिनीयो हे दोन प्रमुख खेळाडू निलंबीत आहेत. त्यातच मार्को स्टॅन्कोविच याला दुखापत झाली आहे.

रेड्डी यांनी सांगितले की, आम्हाला तीन परदेशी खेळाडूंशिवाय खेळावे लागेल, पण मोसमात सहा वेगवेगळ्या खेळाडूंनी आमच्यासाठी गोल केले आहेत. त्यातील तिघे नसतील. ही स्थिती आमच्यासाठी आदर्श अशी नाही. नेहमीसारख्या परिस्थितीत एक गुण मिळाला असता तरी आनंदी झालो असतो, पण आता लिगमधील आमचे स्थान लक्षात घेता तीन गुणांची गरज आहे. आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल आणि तीन गुणांसाठी प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे आम्हाला आगेकूच करता येईल.

कॉपेल यांना मात्र सोप्या लढतीच प्रतिक्षा नाही. ते म्हणाले की, मार्सेलिनीयो आणि दिएगो हा सुद्धा धोकादायक आहे. ते उपलब्ध नाहीत, पण ते असले असते तरी सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले असते. आम्हाला जिंकायचे असेल तर विजय कमवावा लागेल. आम्हाला विजय कुणीही बहाल करणार नाही आणि आमचे काम सोपे करणार नाही. आम्हाला स्वतःसाठी तो कमवावा लागेल.

एटीकेला सुद्धा कालू उचे याच्या गैरहजेरीत खेळावे लागेल. त्याचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे तो नाताळपर्यंत उपलब्ध नसेल.

कॉपेल यांचा एटीके संघ गुणतक्त्यात सातवा आहे. सहा सामन्यांतून त्यांनी दोन विजय मिळविले आहेत. कोलकत्याने केलेल्या गोलांमध्ये एक सोडल्यास बाकीचे पहिल्या सत्रात झाले आहेत. अशावेळी पुणे संघ सुरवातीपासून सावध खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

बचाव ही रेड्डी यांच्या पुणे संघासाठी समस्या राहिली आहे. गेल्या तीन सामन्यांत त्यांच्याविरुद्ध नऊ गोल झाले आहेत. मॅट मिल्स आणि गुरतेज सिंग यांना एटीकेविरुद्ध अत्यंत दक्ष राहावे लागेल. वेगवान प्रतिआक्रमण रचून पुण्याला चकविण्याचे एटीकेचे डावपेच असतील.

पुण्याला मागील सामन्यात चेन्नईयीनविरुद्ध दुसऱ्या सत्रात शरणागती पत्करावी लागली. त्यामुळे सुरवातीलाच आघाडी घेऊनही उपयोग झाला नाही.  कोलकत्यात त्यांच्या तंदुरुस्तीची कसोटी लागेल. याचे कारण दुसऱ्या सत्रात खेळाची तीव्रता कमी होऊ नये म्हणून एटीके टिच्चून खेळेल.

तरुण खेळाडू कोमल थातल याने प्रभाव पाडला आहे. त्याच्या पहिल्या गोलमुळे एटीकेला मागील सामन्यात बेंगळुरू एफसीविरुद्ध आघाडी मिळाली, पण मध्यंतराच्या अलिकडे-पलिकडे बेंगळुरूचे गोल झाले आणि एटीकेला रिकाम्या हाताने परत यावे लागले.

एटीकेचा संघ पुण्याला प्रतिकार आणि झुंजार खेळ पणास लावायला लावेल. पुण्याकडे स्टार स्ट्रायकर्स नसले तरी विजयाची प्रतिक्षा संपुष्टात आणण्याकरीता ते आशेने खेळतील.