ISL 2018: एटीके-गोवा लढतीत लांझाच्या खेळाकडे लक्ष

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (28 नोव्हेंबर) एफसी गोवा आणि अॅटलेटिको दी कोलकाता एफसी (एटीके) यांच्यात येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर लढत होत आहे. गेल्या मोसमात गोव्याकडून खेळलेला मॅन्यूएल लँझरॉत उर्फ लांझा यावेळी एटीकेकडे आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

आयएसएलमध्ये अनेक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये उत्कंठावर्धक लढती होतात. बेंगळुरु एफसी आणि केरळा ब्लास्टर्स हे कडवे प्रतिस्पर्धी आहेत. महाराष्ट्र डर्बीची लढत सुद्धा आता चुरशीची ठरते आहे. पण गोवा विरुद्ध बंगाल लढतीची सर कशालाच येऊ शकत नाही.

या दोन फुटबॉलप्रेमी राज्यांमधील चुरस ऐतिहासिक आहे. 2014 मध्ये आयएसएलला प्रारंभ झाल्यापासून त्यांना नवे व्यासपीठ मिळाले. एटीकेचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी एफसी गोवाचा मार्की खेळाडू रॉबर्ट पायरेस याला फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर ठोसा लगावला. त्यावेळी या चुरशीला वेगळी कलाटणी मिळाली.

गेल्या मोसमात लांझा गोव्याकडे होता, पण त्याने प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांची मर्जी गमावली. त्यामुळे तो एटीकेकडे दाखल झाला. आता हे दोघे आमनेसामने येतील तेव्हा कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.

गेल्या मोसमात लांझा गोव्यासाठी बहुमोल खेळाडू ठरला. 19 सामन्यांत 13 गोल आणि सहा अॅसिस्ट अशी कामगिरी त्याने केली. गोव्याने बाद फेरीत मुसंडी मारली होती. मोसमानंतर मात्र लांझाने करार संपविला आणि एटीकेचा रस्ता धरला. एटीकेकडे मात्र त्याला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. लांझाचा गोव्यात फेरॅन कोरोमीनास याच्याशी उपजत समन्वय जुळला होता. कोरो मात्र आठ गोल आणि चार अॅसिस्टसह धडाका कायम राखून आहे.

लॉबेरा यांनी सांगितले की, “बऱ्याच क्लबच्या ऑफर येऊनही कोरोला कायम ठेवू शकलो हे आमचे सुदैव आहे. तो महान खेळाडू आहे. त्याच्या मैदानावरील खेळामुळे आम्हाला फायदा होतो. मैदानाबाहेर सुद्धा त्याचा सहवास खेळाडूंना प्रेरक ठरतो.”

गोव्याची बेंगळुरूविरुद्ध झालेल्या ढिसाळ खेळाची भरपाई करण्याची इच्छा असेल. बेंगळुरूशी हरल्यामुळे त्यांना मोसमातील दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यांच्या बचाव फळीने 14 गोल पत्करले आहेत. तळातील दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध झालेल्या गोलइतकाच हा आकडा आहे.

गोव्यासाठी एदू बेदीया या महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. तो वेळेत तंदुरुस्त झाल्यामुळे स्टार्टींग लाईनअपमध्ये असेल. ह्युगो बौमौस याला मात्र चार वेळा कार्ड मिळाल्याने खेळता येणार नाही.

गोव्याने लीगमध्ये सर्वाधिक 22 गोल केले आहेत. एटीकेचा बचाव चिवट आहे. जॉन जॉन्सन आणि आंद्रे बिके यांच्याकडे बचावाची सुत्रे आहेत. त्यामुळे गोव्याची कसोटी असेल.

एटीकेचे प्रशिक्षक स्टीव कॉपेल म्हणाले की, गोव्याविरुद्ध खेळताना तुम्हाला दक्ष राहावे लागलेत, कारण त्यांच्या खेळात नावीन्य असते. गोव्याने दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांना हरविण्याचा फॉर्म्युला आहे. गेल्या मोसमात त्यांचे पाच पराभव झाले होते. आक्रमण करताना त्यांचा खेळ लक्षवेधी ठरतो, पण त्याचवेळी ते भरकटतात सुद्धा.

लांझा जुन्या संघाविरुद्ध परतफेड करणार की लॉबेरा यांची सरशी होणार ही उत्सुकता असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: पुणे सिटीला हरवित नॉर्थइस्टची आगेकूच

मिताली राजचा प्रशिक्षकांवर मोठा आरोप, संघातून वगळण्याबाबत केला मोठा खूलासा

असा पराक्रम करणारा काशिलिंग अडके पहिला महाराष्ट्रीयन कबड्डीपटू