ISL 2018: एटीकेचा विजय, चेन्नईला पेनल्टी पडल्या महागात

चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये माजी विजेत्या एटीकेने (अॅटलेटिको दी कोलकाता) आज ( 2डिसेंबर) चेन्नईयीन एफसीवर 3-2 अशी मात केली. यामध्ये एटीकेला दोन पेनल्टीचा लाभ झाला. दोन्ही वेळा शैलीदार स्ट्रायकर मॅन्यूएल लँझरॉतने या संधी साधल्या. दोन मिनिटे बाकी असताना पिछाडी कमी केलेल्या चेन्नईयीनला घरच्या मैदानावर अखेरीस पेनल्टीच भोवल्या.

एटीकेने 10 सामन्यांत चौथा विजय मिळविला असून तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. मुंबई सिटी एफसीला मागे टाकत त्यांनी पाचवे स्थान गाठले. चेन्नईयीनला दहा सामन्यांत सातवा पराभव पत्करावा लागला. एक विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण व आठवा क्रमांक कायम राहिला.

चेन्नईयनीची सुरवात चांगली झाली तरी खाते आधी एटीकेने उघडले. हितेश शर्माने पास देताच जयेशने दोन पावले पुढे जात 26 यार्डावरून जोरदार फटका मारला. त्याने चेन्नईयीनचा गोलरक्षक संजीबन घोष याला कोणतीही संधी दिली नाही.

चेन्नईयीनने दहा मिनिटांत बरोबरी साधली. इसाकने मुसंडी मारत डावीकडून मैल्सन आल्वेसला पास दिला. मैल्सनने चेंडू नियंत्रीत करीत थोई सिंगला पास दिला. थोईने मैदानालगत फटका मारत नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यावेळी एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याचा अंदाज चुकला.

पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात बरोबरी झाल्यामुळे चुरस शिगेला पोचली होती. मध्यंतरास दोन मिनिटे बाकी असताना हितेशने बॉक्समध्ये प्रवेश करीत उजवीकडे लँझरॉतला पास दिला. लँझरॉतला पुरेसा वेळ होता आणि त्याने चेंडू नेटच्या दिशेने व्यवस्थित मारला. त्याचवेळी बचावाच्या प्रयत्नात एली साबियाचा हात चेंडूला लागला. त्यामुळे पंच ए. रोवन यांनी एटीकेला पेनल्टी बहाल केली. त्यावर लँझरॉतने संजीबनचा अंदाज चुकवित चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात मारला.

एटीकेला आणखी एका पेनल्टीचा लाभ झाला. उजवीकडून लँझरॉतने पलिकडील बाजूला जॉन जॉन्सन याला पास दिला. जॉन्सनने आक्रमक पवित्रा घेत चेंडू नेटच्या दिशेने हेडिंग केला. चेन्नईयीनच्या कार्लोस सालोमने चेंडू ब्लॉक  केला. त्यावेळी थोडी चुरस झाली. कार्लोसला फाऊल दिल्याचे वाटले आणि त्याने चेंडू हातात झेलला, पण हीच घोडचूक ठरली. त्यामुळे एटीकेला दुसरी पेनल्टी मिळाली. लालदीना रेंथलेई आणि कार्लोसने पंचांशी वाद घातला. त्यामुळे यलो कार्ड दाखविले गेले. मग लँझरॉतने पहिल्या वेळी मारला तसाच अचूक फटका मारत लक्ष्य साधले. त्यानंतर इसाकने गोल केला, पण अंतिम निकालात फरक पडला नाही.

चेन्नईयीनची सुरवात सरस होती. त्यांनी चेंडूवर वर्चस्व राखले होते.  पाचव्या मिनिटाला उजवीकडे मिळालेल्या कॉर्नरवर अँड्रीया ओरलँडीने चेंडू मारला, पण तो बॉक्समधील त्याच्या सहकाऱ्यांच्या डोक्यावरून गेला. पुढच्याच मिनिटाला एटीकेने प्रयत्न केला. रिकी लल्लावमावमा  याने मारलेला चेंडू एका खेळाडूला लागून उजवीकडे जयेशपाशी गेला. जयेशने मैदानालगत मारलेला फटका संजीबन याने झेपावत पंच केला. त्यानंतर चेंडू एली साबियाला लागून नेटच्या पलीकडून गेला.

चेन्नईयीनने सातव्या मिनिटाला उत्तम संधी दवडली. इसाक वनमाल्साव्मा याने डावीकडे रफाएल आगुस्तोला पास दिला. आगुस्तोने बॉक्समध्ये प्रवेश करीत अँड्रीया ओरलँडीकडे चेंडू मारला, पण ओरलँडीचा फटका स्वैर गेला. एटीकेने पहिला प्रयत्न नवव्या मिनिटाला केला. लँझरॉतने पास देताच बलवंत सिंगने बॉक्समध्ये प्रवेश केला, पण मैल्सनने दडपण आणल्यामुळे त्याला अचूक फटका मारता आला नाही. त्याचा फटका थेट संजीबनच्या हातात गेला.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न राहिले अधूरे, कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत

तेंडूलकर, गांगुली, लक्ष्मण यांचा समावेश असणारी सल्लागार समिती करणार महिला संघाच्या नवीन प्रशिक्षकाची निवड?

अॅडलेड कसोटीत भारतीय फलंदाजांसाठी ही गोष्ट ठरु शकते धोकादायक