ISL 2018: गोवा, नॉर्थइस्टचा ब्रेकपूर्वी घसरण धांबविण्याचा प्रयत्न

गोवा। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (14 डिसेंबर) एफसी गोवा आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या लढतील सुरूवात होणार आहे.

लीगला ब्रेक मिळण्यापूर्वी कामगिरीतील घसरण थांबविण्यासाठी दोन्ही संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील. गोल्डन बूट किताबाच्या शर्यतीमधील दावेदार दोन्ही संघांमध्ये आहेत. त्यामुळेही नेहरू स्टेडियमवरील लढतीत चुरस आणखी वाढलेली असेल.

गोव्याच्या फेरॅन कोरोमीनास याने आठ गोल आणि पाच अॅसिस्ट अशी कामगिरी केली आहे. नॉर्थइस्टच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याेनेही आठ गोल केले आहेत. त्यामुळे हे दोघे एकमेकांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात असतील.

गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी सांगितले की, कोरो हा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आठ गोल केले म्हणून नव्हे तर पाच अॅसिस्टही त्याने नोंदविले आहेत. अशा पद्धतीने गोल आणि अॅसिस्ट नोंदविलेल्या खेळाडूंची यादी पाहिल्यास त्यात फार जण दिसत नाहीत.

या दोघांना गेल्या तीन सामन्यांत मात्र गोल करता आलेले नाहीत आणि याचा दोघांच्या संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे. दोन्ही संघ या टप्यात एकही सामना जिंकू शकलेले नाहीत.

स्पेनचे लॉबेरा पुढे म्हणाले की, मुलभूत विचार केल्यास गेल्या काही सामन्यांत आम्ही बरेच गोल करू शकलेलो नाहीत. आम्हाला चुकांमधून शिकण्याची आणि खेळात सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे उर्वरीत सामन्यांसाठी आम्हाला धडा मिळेल.

यानंतरही गोवा सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत 22 गोलांसह आघाडीवर आहे. नॉर्थइस्टला तेवढा धडाका राखता आलेला नाही, पण त्यांचा गोलफरक गोव्याप्रमाणेच सहा आहे. नॉर्थइस्टने 15 गोल केले आहेत.

आपल्या संघाने आघाडी घ्यावी म्हणून लॉबेरा प्रयत्नशील असतील. त्यामुळे त्यांना नॉर्थइस्टवर प्रतिआक्रमण रचण्यासाठी दडपण आणता येईल.

गोव्याने गुण गमावलेल्या चारही सामन्यांत एक समान गोष्ट घडली. त्यांनी पहिला गोल पत्करला. मग पकड घेण्यासाठी त्यांना झगडावे लागले. त्यांना ही घसरण रोखावी लागेल आणि पुन्हा विजयी मार्गावर यावे लागेल.

नॉर्थइस्टने पाच अवे सामन्यात अपराजित मालिका राखली आहे. 15 पैकी केवळ दोन गुण त्यांनी गमावले आहेत. त्यांचा बचाव सुद्धा चिवट आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ नऊ गोल झाले आहेत. जोरदार आक्रमण करणाऱ्या गोव्याचा ते कसा सामना करतात हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल.

नॉर्थइस्टचे मुख्य प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांनी सांगितले की, माझ्यासमोरही काही समस्या आहेत. आम्ही 22 खेळाडूंसह मोसम सुरु केला, पण आता 17 जण आहेत. यातही दोघांच्या तंदुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह आहे. आम्ही गेल्या आठवड्यात पाच सामने खेळलो आहोत. त्यातून काही जणांना दुखापती झाल्या. त्याचवेळी गोव्याचा प्लेमेकर अहमद जाहौह जायबंदी झाला. आमच्यादृष्टिने हे चांगले आहे. त्यातही गोव्याने मागील सामना गमावला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दडपण आले आहे, पण मला आमच्या संघाविषयी जास्त काळजी वाटते.

रॉलीन बोर्जेस याला मध्य फळीत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. तो त्याच्या आधीच्या मैदानावर परतेल. मध्य फळीतील या खेळाडूने नॉर्थइस्टचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपले स्थान अल्पावधीत निर्माण केले आहे.

गोव्याचा संघ धडाकेबाज खेळ करून विजयासाठी प्रयत्न करणार की शात्तोरी यांचा संघ विजयी ठरणार हे उद्या स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल?

ती अजरामर खेळी झाली नसती तर गांगुली कधी क्रिकेटर म्हणून दिसलाच नसता

ISL 2018: एटीकेला हरवित बेंगळुरूची अपराजित घोडदौड कायम