ISL 2018: एटीकेला हरवित बेंगळुरूची अपराजित घोडदौड कायम

बेंगळुरू। गतउपविजेत्या बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी (13 डिसेंबर) श्री कंठीरवा स्टेडियमवरील घरच्या मैदानावर बेंगळुरूने माजी विजेत्या एटीकेचा (अॅटलेटिको दी कोलकाता) 1-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या एरीक पार्टालू याने पुर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला.

बेंगळुरूने 11 सामन्यांत आठवा विजय मिळविला असून तीन बरोबरी साधल्या आहेत. त्यांचे सर्वाधिक 27 गुण झाले. बेंगळुरूचा गोलफरकही 10 (18-8) असा सर्वोत्तम आहे. मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 21 गुण) दुसऱ्या, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (11 सामन्यांतून 20) तिसऱ्या, तर जमशेदपूर एफसी (12 सामन्यांतून 19) चौथ्या स्थानावर आहे. एटीकेला 12 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. चार विजय व चार बरोबरींसह त्यांचे 16 गुण व सहावे स्थान कायम राहिले.

खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. 37व्या मिनिटाला राहुल भेकेने डावीकडून किन लुईसला पास दिला. लुईसने बॉक्सध्ये पार्टालू याच्याकडे चेंडू सोपविला. मग पार्टालूने हेडींगवर लक्ष्य साधले. हाच गोल निर्णायक ठरला. एटीकेच्या स्ट्रायकर्सना बेंगळुरूच्या बचाव फळीने जेरबंद केले.

बेंगळुरूने तिसऱ्याच मिनिटाला पहिला प्रयत्न केला. किन लुईस याने डावीकडून आगेकूच करीत छेत्रीला पास दिला. छेत्रीने डाव्या पायाने फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती. दोन्ही संघांनी सुरवात सकारात्मक केली.

दहाव्या मिनिटाला बेंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅन याच्या ढिलाईमुळे एटीकेच्या बलवंत सिंगला संधी मिळाली. त्याने चेंडूवर नियंत्रण मिळविले, पण त्याचवेळी बेंगळुरूच्या जुआनन याने मैदानावर घसरत बलवंतला रोखले.

एटीकेचा कर्णधार मॅन्युएल लँझरॉत याला 14व्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले. पंच तेजस नागवेकर यांनी बेंगळुरूला एटीकेच्या बॉक्सलगत फ्री किक दिली. त्यावर लँझरॉतने हुज्जत घातली. त्यानंतर तीन मिनिटांनी सेरॅनने बेफिकीरपणे बलवंतला बेंगळुरूच्या बॉक्सलगत पाडले. त्यामुळे सेरॅनला सुद्धा यलो कार्ड दाखविण्यात आले.

बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रितसिंग संधू याने 19व्या मिनिटाला चपळाई दाखविली. गेर्सन व्हिएराने मध्य क्षेत्रात एव्हर्टन सँटोसला पास दिला. त्यावर एव्हर्टन याने सफाईदार फटका मारला होता, पण तो संधूने अडविला.

जयेश राणेने 31व्या मिनिटाला उजवीकडे अंकित मुखर्जीची घोडदौड हेरली आणि त्याला पास दिला. अंकित बॉक्समध्ये आपल्या सहकाऱ्याला पास देण्यासाठी प्रयत्नशील होता, पण पार्टालू याने बेंगळुरूसाठी बचाव केला.

उत्तरार्धात एटीकेचे काही प्रयत्न वाया गेले. 57व्या मिनिटाला फ्री किकवर मॅन्युएलने मारलेला चेंडू बलवंतच्या दिशेने गेला. त्यावेळी बलवंतने अकारण आकर्षक फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला. 63व्या मिनिटाला बेंगळुरूच्या बचाव फळीने बलवंतला ऑफसाईडच्या सापळ्यात अडकविले.

बलवंतने 67व्या मिनिटाला घोडदौड केली होती. जॉन जॉन्सनने त्याला पास दिला होता. त्यानंतर बलवंत फटका मारण्याच्या प्रयत्नात असतानाच बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूने पुढे सरसावत दडपण आणले. त्यामुळे बलवंतला सफाईने फटका मारता आला नाही आणि अखेरीस चेंडू बाहेर गेला.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दुसरे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले, उपांत्यपूर्व फेरीतच नेदरलॅंड्सकडून पराभूत

आयपीएलमध्ये हे ३ खेळाडू खेळणार किंग्ज ११ पंजाबकडून

सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…