ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय

कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (31 ऑक्टोबर) गतउपविजेत्या बेंगलुरू एफसीने दोन वेळच्या माजी विजेत्या अटलेटिको दी कोलकाताला (एटीके) पिछाडीवरून 2-1 असे हरविले. विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणावर 15व्या मिनिटाला एटीकेने खाते उघडल्यानंतर बेंगलुरूवर दडपण आले होते, पण पुर्वार्धाच्या भरपाई वेळेत व्हेनेझुएलाचा मिकू, तर उत्तरार्धाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाचा एरीक पार्टालू याने गोल करीत बेंगलुरूचा विजय साकार केला.

बेंगलुरूने चार सामन्यांतील तिसरा विजय मिळविला असून एक बरोबरी साधली आहे. त्यांचे दहा गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील एफसी गोवाचेही 10 गुण आहेत, पण गोव्याचा गोलफरक (14-5, 9), तर बेंगलुरूचा (8-3, 5) आहे. सरस गोलफरकामुळे गोव्याचे दुसरे स्थान कायम राहिले, पण बेंगलुरूने दहा गुणांसह जास्त सामने खेळलेल्या जमशेदपूर एफसी, एटीके आणि मुंबई सिटी एफसी यांना मागे टाकले. एटीकेला सहा सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. दोन विजय व एका बरोबरीसह त्यांचे सात गुण व पाचवे स्थान कायम राहिले.

खाते उघडण्याची शर्यत एटीकेने जिंकली. एव्हर्टन सँटोस याने अप्रतिम पास देत बचाव भेदला. त्यामुळे कोमलला मोकळीक मिळाली. बेंगलुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याच्या स्थितीचा अचूक अंदाज घेत त्याने थोड्या बाजूने शानदार फटका मारत गोल केला. पुर्वार्धात चार मिनिटांचा भरपाई वेळ होता. त्यातील तिसऱ्या मिनिटाला डिमास डेल्गाडो याच्या साथीत चाल रचत मिकूने अप्रतिम गोल केला.

दुसरे सत्र सुरु होताच बेंगलुरूने धडाका कायम ठेवला. फ्री किकवर डिमास डेल्गाडो याने बॉक्समध्ये मारलेला चेंडू एटीकेच्या खेळाडूंना लागून एरीकपाशी पडला. त्याने वेगवान फटका मारत एटीकेचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याला चकविले.

बेंगलुरूने सुरवात चांगली केली. पहिल्याच मिनिटाला सुनील छेत्रीने डावीकडून घोडदौड केली, पण त्याला प्रतिस्पर्धी बचावपटूमुळे पुरेसा वाव मिळाला नाही. दहाव्या मिनिटाला फ्री किकवर मिकूने अप्रतिम कौशल्य दाखवित चेंडू पटकावला, पण तो फटका मारण्याच्या प्रयत्नात असतानाच एटीकेच्या जॉन जॉन्सनने त्याला पाय मध्ये टाकत पाडले. पुढच्याच मिनिटाला बेंगलुरूला आणखी एक फ्री किक मिळाली. त्यावर छेत्रीने पहिल्या प्रयत्नात मारलेला चेंडू खेळाडूंच्या भिंतीला लागला. दुसऱ्या प्रयत्नात छेत्रीचा फटका स्वैर होता.

एटीकेने खाते उघडल्यानंतर 21व्या मिनिटाला बेंगलुरूचा प्रयत्न अरिंदमने फोल ठरविला. डावीकडून निशू कुमारने मिकूला क्रॉस पास दिला, पण हेडिंगवरील चेंडू अरिंदमने चपळाईने अडविला. पाच मिनिटांनी छेत्री-मिकू जोडीची आगेकूच अशीच रोखली गेली. 29व्या मिनिटाला हरमनजोत खाब्रा याने राहुल भेके याला पास दिला, पण भेकेला बॉक्समध्ये बेंगलुरूचा एकही खेळाडू दिसला नाही. त्यामुळे ही संधी वाया गेली. त्यावेळी बेंगलुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांना निराशा लपविता आली नाही.

पूर्वार्धाच्या अंतिम टप्यात एटीकेच्या गेर्सन व्हिएरा याला मिकूने रोखले. त्यात गेर्सन पडला आणि मिकूचा पाय चुकून गेर्सनच्या डोक्याला लागला. 39व्या मिनिटाला एटीकेच्या कालू उचे याची घोडदौड अल्बर्ट सेरॅन याने रोखली. त्यात कालूला थोडी दुखापत झाली.

दुसऱ्या सत्रात56व्या मिनिटाला एटीकेला फ्री किक मिळाली. त्यावर कोमलने केलेले हेडिंग स्वैर होते. 69व्या मिनिटाला मॅन्युएल लँझरॉतने सँटोसला पास दिला, गुरप्रीतने चेंडू अडविला.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीने त्या हॉटेलच्या विजीटींग बुकमध्ये नक्की काय लिहले?