ISL 2018: बेंगळुरू आणि मुंबईला विक्रमासह स्थान भक्कम करण्याचे वेध

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (9 डिसेंबर) बेंगळुरू एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात लढत होणार आहे. बेंगळुरू अद्याप अपराजित आहे, दुसरीकडे मुंबईनेही आपली वाटचाल लक्षवेधी असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे प्ले-ऑफमधील स्थान भक्कम करण्याचे त्यांच्यात चढाओढ होईल.

मुंबईला फातोर्डा येथे एफसी गोवा संघाकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून त्यांच्या संघाने विलक्षण सुधारणा केली आहे. सलग सहा सामन्यांत अपराजित राहताना मुंबईने पाच विजय मिळविले आहेत. त्यामुळे हा संघ गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. इतकी आगेकूच केल्यानंतर बेंगळुरूला मागे टाकून आघाडी घेण्याचाही त्यांचा प्रयत्न राहील.

बेंगळुरूविरुद्ध खेळणे मात्र सोपे नसेल, कारण हाच एकमेव अपराजित संघ आहे. बेंगळुरूला पराभव टाळता आला तर त्यांनी आयएसएलमधील सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळत ही कामगिरी साध्य केलेली असेल, जे दुर्मिळ ठरेल.

बेंगळुरूचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, आम्हाला दुसऱ्या क्रमांकावरील संघाविरुद्ध बऱ्याच वेळा खेळावे लागले आहे. आम्ही असे आव्हान नेहमी पेलले आहे. इतर संघ आमच्याविरुद्ध खेळणे आव्हान मानतात हे पाहून छान वाटते. हा सामना आमच्यासाठी फार चांगला ठरेल अशी आम्हाला आशा आहे.

व्हेनेझुएलाचा दमदार स्ट्रायकर मिकू याच्या अनुपस्थितीतही बेंगळुरूला काहीसे झगडावे लागले असले तरी सुनील छेत्री, उदांता सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. भुतानचा फॉरवर्ड चेंचो गील्टशेन यानेही ठसा उमटविला आहे. मागील सामन्यात नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध त्याने बरोबरी साधणारा गोल केला. त्यामुळे बेंगळुरूला विक्रमी कामगिरी नोंदविता आली.

बेंगळुरूने 75व्या मिनिटानंतर सहा गोल केले आहेत. त्यातून त्यांच्या आक्रमणातील जिगर स्पष्ट होते. मुख्य म्हणजे दिल्ली डायनॅमोज आणि एफसी पुणे सिटी यांच्याविरुद्ध अखेरच्या टप्यात त्यांनी विजयी गोल केले आहेत. जोर्गे कोस्टा प्रशिक्षक असलेल्या मुंबईला यापासून सावध राहावे लागेल. त्यांना सामना संपेपर्यंत गाफील राहून चालणार नाही.

कोस्टा यांनी सांगितले की, उद्या काय करावे लागेल याची मला कल्पना आहे. मला बेंगळुरू संघात काहीही कमकुवत दुवे सापडले नाहीत. वैयक्तिक आणि सांघिक दृष्ट्या हा संघ फार चांगला आहे. असे असले तरी आम्हाला तीन गुण जिंकून परत जायचे आहे. आम्ही ते करू शकतो असे वाटते.

जॉयनर लॉरेन्को याच्यासाठी ही लढत एकाप्रकारे पुनरागमन असेल. त्याला गेल्या मोसमात संधीसाठी झगडावे लागले होते. मुंबईने घेतलेल्या उसळीत तो अविभाज्य घटक ठरला आहे. तो दाखल झाल्यापासून मुंबईने गेल्या सहा पैकी पाच सामन्यांत बाजी मारली आहे.

शुभाशिष बोस यानेही चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात तो बेंगळुरूकडून प्रत्येक सामना खेळला, त्यानंतरही बेंगळुरूने त्याच्याबरोबरील करार संपविला होता. ही लढत म्हणजे भारतामधील दोन उत्तम गोलरक्षकांमधील मुकाबला असेल. बेंगळुरूचा गुरप्रीतसिंग संधू आणि मुंबईचा अमरिंदर सिंग  आपले नेट सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वस्व पणास लावतील.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: नॉर्थइस्ट-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार

हॉकी विश्वचषक २०१८: भारताचा कॅनडावर विजयी पंच, उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश