ISL 2018: नॉर्थइस्टविरुद्ध बेंगळुरु एफसीचा विजयाचा निर्धार

बेंगळुरू । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीची शुक्रवारी येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. या लढतीत विजय मिळवून आघाडी घेण्याचा बेंगळुरूचा निर्धार असेल.

बेंगळुरु गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने कामगिरी भक्कम करीत वाटचाल सुरू ठेवली आहे. 21 गुणांसह त्यांचा दुसरा क्रमांक आहे, पण अद्याप मोहीम फत्ते झाली नसल्याची त्यांना जाणीव आहे. इतर पाच संघ त्यांच्या आसपास आहेत आणि चुरस शिगेला पोचली आहे.

आघाडी मिळविण्याच्या दिशेने बेंगळुरूसमोर पहिले आव्हान कामगिरीत जोश आणलेल्या नॉर्थइस्टचे असेल. गुवाहाटीत मोसमाच्या प्रारंभी पहिल्या टप्यातील सामन्यात बेंगळुरूला एकमेव गोलने जिंकताना प्रयास पडले होते. यावेळी सुद्धा नॉर्थइस्टकडून रोका यांना प्रतिकार अपेक्षित आहे. ते म्हणाले की, गुवाहाटीत आम्हाला कठोर प्रयास करावे लागले. त्यावरून त्यांचा संघ किती चिवट आहे हे स्पष्ट होते. मैदानाबाहेर सुद्धा त्यांनी बरेच बदल घडविले आहेत. त्यामुळे ते कडवी झुंज देतील याची जाणीव आहे.

रोका पुढे म्हणाले की, आम्ही प्रत्येक सामना खेळताना एका विशिष्ट प्रमाणात दक्षता दाखवितो, पण आम्ही धोरणात्मक शैलीत तडजोड करीत नाही. हा सामना सुद्धा त्यास अपवाद नसेल. स्पर्धा पुढे सरकत असताना नॉर्थइस्टचा आत्मविश्वास उंचावत गेला आहे. यात मला काहीच नवल वाटलेले नाही.

मागील सामन्यात नॉर्थइस्टने चेन्नईयीन एफसीला 3-1 असा धक्का दिला. अशीच वेळ आपल्यावर ओढवून नये अशी बेंगळुरुची इच्छा असेल, कारण इतर संघ त्यांच्या मागोमाग आहेत. पहिल्या चार संघांमध्ये केवळ तीन गुणांचा फरक आहे. आघाडीवरील एफसी पुणे सिटीचे 22, तर चौथ्या क्रमांकावरील एफसी गोवाचे 19 गुण आहेत.

बाद फेरीतील प्रवेशासाठी उर्वरित सामन्यांत विजयच मिळविण्याचा बेंगळुरूचा निर्धार आहे. रोका यांनी सांगितले की, गुणतक्त्यामधील वरचा भाग पाहता चुरस किती आहे हे लक्षात येते. त्यामुळे उरलेल्या सात सामन्यांत 21 गुण मिळवायचे असे मी सांगेन.

बेंगळुरुला खडतर वेळापत्रकाचा सामना करावा लागला आहे. बुधवारी रात्रीच त्यांचा संघ भुतानहून परतला. आता पुढील 14 दिवसांत त्यांना पाच सामने खेळायचे आहेत. रोका म्हणाले की, वेळापत्रक फार भरगच्च आहे, पण यावर आमचे नियंत्रण नाही. उपांत्य फेरी गाठायची असेल तर आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. सुदैवाने माझ्या संघात असे खेळाडू आहेत की पाचारण करताच ते खेळ उंचावण्यास सज्ज असतात.

नॉर्थइस्टचे मुख्य प्रशिक्षक अॅव्रम ग्रँट यांच्यासाठी हा बाहेरील मैदानावरील पहिला सामना असेल. बेंगळुरुविरुद्ध झुंजार खेळाची पुनरावृत्ती करण्याची आशा त्यांना वाटते.

ग्रँट म्हणाले की, मी बेंगळुरुचा खेळ टीव्हीवर पाहिला आहे. त्यांचा संघ चांगला आहे. त्यांची खेळण्याची पद्धत मला आवडते, पण जिंकण्याची क्षमता असल्याचे आम्ही मागील सामन्यात दाखवून दिले आहे.

नॉर्थइस्टचे 10 सामन्यांतून 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकाच्या संघापेक्षा ते नऊ गुणांनी मागे आहेत. आता केवळ आठ सामने उरले आहेत. बाद फेरी गाठण्याच्या संधीबाबत ग्रँट म्हणाले की, मोसमाच्या प्रारंभी अर्थातच पहिल्या चार संघांत येण्याचे ध्येय होते. आता आम्हाला योग्य खेळ करावा लागेल. इतक्या गुणांनी मागे असल्यामुळे आम्हाला केवळ पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.