ISL 2018: सुनील-मिकू जोडीमुळे बेंगळुरू एफसीचा धडाका

बेंगळुरू : मैदानावरील जोडीदार नेहमीच एकत्र येऊन प्रतीस्पर्ध्याची शिकार करतात असे चित्र दिसते. हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बेंगळुरू एफसीच्या सुनील छेत्री आणि मिकू यांच्यासारखी जमलेली स्ट्रायकर्सची दुसरी जोडी मिळणे दुर्मिळ आहे.
 
या जोडीने मिळून गेल्या मोसमात 24 गोल केले. यात व्हेनेझुएलाच्या मिकूचा 14, तर भारतीय स्ट्रायकर छेत्रीचा दहा गोलांचा वाटा होता. यंदा या जोडीने गत मोसमापासून पुढे सुरवात केली आहे. त्यांनी संघाचे दहा पैकी सात गोल नोंदविले आहेत. त्यामुळे कार्लेस कुआद्रात यांचा संघ धडाकेबाज आगेकूच करतो आहे.
 
त्यांची गोल करण्याची क्षमता हीच केवळ प्रतिस्पर्ध्याची डोकेदुखी ठरलेली नाही. या दोघांमधील समन्वय छान जुळून आला आहे आणि त्यांचा खेळ एकमेकांच्या साथीत बहरतो. मिकू हा सेंटर फॉरवर्ड आहे, तर छेत्री त्याच्या पलिकडून किंवा डावीकडून खेळतो. दोघांच्या मैदानावरील हालचाली धुर्त असतात. पेनल्टी बॉक्सजवळील त्यांचे अस्तित्व आणि धाव रोखणे प्रतिस्पर्धी बचावपटूंसाठी डोकेदुखी ठरते.
 
मिकूने सांगितले की, आमचा मैदानावरील समन्वय उत्तम आहे. आमची देहबोली तशीच असते. केवळ एकमेकांकडे पाहून आम्हाला दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे कळते. त्यामुळे आम्हाला गतमोसमात अपेक्षित निकाल साध्य करता आला. यंदा आम्हाला हेच करायचे आहे.
 
प्रतिस्पर्धी मिकूवर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे छेत्रीला प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्याची संधी मिळते. ही बाब बेंगळुरूच्या पथ्यावर पडणारी ठरते. आयएसएलमधील गेल्या 16 पैकी केवळ एका सामन्यात बेंगळुरूला गोल करता आलेला नाही. ही आकडेवारी या जोडीचे वर्चस्व स्पष्ट करते. गेल्या मोसमात एफसी पुणे सिटीविरुद्ध बेंगळुरूला गोलशून्य बरोबरी साधावी लागली होती.
 
मिकूविषयी छेत्री म्हणाला की, मिकू हा उच्च दर्जाचा खेळाडू आहे. हा दर्जा आपल्याकडे का आहे हे दाखविणारा खेळ तो करतो. आम्हा सर्वांना त्याचा फायदा होतो.
 
या दोघांना प्रसंगाचे फार विलक्षण भान आहे. महत्त्वाच्या सामन्यांच्या वेळी आणि मोक्याच्या क्षणी ते खेळ उंचावतात. त्यांचे बहुतेक गोल हे संघाला सर्वाधिक गरज असलेल्या क्षणी झाले आहेत. एटीकेवरील 2-1 असा विजय याची साक्ष देतो. एटीकेने आघाडी घेतल्यानंतर चिवट बचाव सुरु केला होता. त्याचवेळी मध्यंतराच्या सुमारास मिकूने पारडे फिरविणारा गोल केला. मग बेंगळुरूने दुसऱ्या सत्रात निर्णायक गोल नोंदविला आणि तीन गुण वसूल केले.
 
छेत्रीला मागील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्स खेळताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला दोन आठवडे ब्रेक घ्यावा लागेल. त्याने जॉर्डनविरुद्ध शनिवारी होणाऱ्या मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. आयएसएलमधील पुढील टप्पा पुढील आठवड्यात सुरु होईल तेव्हा आघाडीवरील एफसी गोवाविरुद्धच्या लढतीपर्यंत तो पूर्णपणे सज्ज होण्याची शक्यता कमी आहे.
 
तसे झाले तर मग छेत्रीच्या अनुपस्थितीत मिकू गोल करण्याचे दडपण एकटा प्रथमच हाताळू शकेल का की त्याला गोलद्वारे प्रतिस्पर्ध्याची शिकार करण्याच्या मोहिमेत आपल्या जोडीदाराची उणीव जाणवणार याची उत्सुकता आहे. हा विषयी तुमचा-आमचा अंदाज सारखाच असेल.