ISL 2018: दिल्लीला पराभूत करत जमशेदपूर चौथ्या स्थानी

गुवाहाटी। जमशेदपूर एफसीने आज (12 डिसेंबर) हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलातील लढतीत यजमान जमशेदपूरने दिल्ली डायनॅमोज एफसीचे कडवे आव्हान एका गोलच्या पिछाडीनंतर 2-1 असे मोडून काढले. याबरोबरच जमशेदपूरने गुणतक्त्यात चौथा क्रमांक गाठला.

लालीयनझुला छांगटेने पूर्वार्धात दिल्लीचे खाते उघडले होते. ऑस्ट्रेलियाचा मार्की खेळाडू टीम कॅहील याने जमशेदपूरला लगेच बरोबरी साधून दिली. दुसऱ्या सत्रात फारुख चौधरीने केलेला गोल निर्णायक ठरला.

जमशेदपूरने 12 सामन्यांत चौथाच विजय मिळविला असून सात बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण झाले. त्यांनी एफसी गोवा संघाला मागे टाकले. गोव्याचे 10 सामन्यांत 17 गुण आहेत. गोव्याचे दोन सामने कमी आहेत. आघाडीवरील तीन संघांचेही सामने जमशेदपूरपेक्षा किमान एकने कमी आहेत. बेंगळुरू एफसी 10 सामन्यांतून 24 गुणांसह आघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसी (11 सामन्यांतून 11) दुसऱ्या, तर नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (11 सामन्यांतून 20) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

खाते उघडण्याची शर्यत दिल्लीने जिंकली. नारायण दासने रेने मिहेलीच याला मैदानालगत पास दिला. मिहेलीच याने चेंडू बॉक्समध्ये घालविला. हा चेंडू मारीओ आर्क्वेस याला लागून आपल्या दिशेने येताच छांगटेने लक्ष्य साधले. त्याचा हा मोसमातील चौथा गोल आहे.

जमशेदपूरने पाच मिनिटांत बरोबरी साधली. उजवीकडे मिळालेल्या कॉर्नरवर कार्लोस कॅल्वोने चेंडू बॉक्समध्ये मारला. त्यावर कॅहीलने अचूक टायमिंग साधत उडी घेत हेडिंग केले. दुसऱ्या सत्रात 61व्या मिनिटाला फारुखने मार्कोस टेबार याच्याकडून चेंडू मिळताच संतुलन साधणे अवघड असतानाही फटका मारत गोल केला. त्याने दिल्लीचा गोलरक्षक अल्बिनो गोम्सला चकविले.

पहिल्याच मिनिटाला दिल्लीने प्रयत्न केला. अॅड्रीया कॅर्मोनाने रेने मिहेलीच याच्या साथीत चाल रचली. परत पास मिळताच त्याने 25 यार्डावरून अप्रतिम फटका मारला, पण चेंडू क्रॉसबारला लागला. वास्तविक त्यावेळी जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला चेंडूचा अंदाज आला नव्हता.

टिरीने सातव्या मिनिटाला जमशेदपूरकडून प्रयत्न केला. त्याने लांबून चेंडू मारला, पण दिल्लीच्या बचाव फळीने दक्ष राहात तो अडविला. काही क्षणांत दिल्लीने चाल रचली. मार्कोस टेबार याने मध्य क्षेत्रातून छांगटेला पास दिला. त्यावर दोन प्रतिस्पर्ध्यांना चकवित छांगटेने फटका मारला, पण त्यात अचूकता नव्हती.

दिल्लीच्या रेने मिहेलीय याला नवव्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने डावीकडे जमशेदपूरच्या फारुख चौधरीला पाडले. 14व्या मिनिटाला दिल्लीच्या अॅड्रीया कॅर्मोना याला जांघेचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे मार्टी क्रेस्पी याला पाचरण करण्यात आले.

जमशेदपूरची 20व्या मिनिटाला रचलेली चाल वाया गेली. मारीओने उजवीकडून फारुखला पास दिला. फारुखने कॅहीलला पास देण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीचा बचावपटू महंमद धोट याने चेंडू बाहेर घालविला. त्यावर मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही.

दिल्लीच्या टेबारने 31व्या मिनिटाला फार चांगला पास दिला नसतानाही विनीत रायने प्रयत्न केला, पण त्यात अचूकता नव्हती. त्यामुळे चेंडू नेटवरून बाहेर गेला.

दुसऱ्या सत्रात कॅल्वोने उजवीकडून चेंडू मारला. कॅहीलने चेंडूवर ताबा मिळविला होता, पण दिल्लीच्या जियान्नी झुईवर्लून याने बचाव केला. 55व्या मिनिटाला जमशेदपूरच्या प्रतिक चौधरीने हेडिंगवर ब्लॉक केलेला चेंडू मार्टी क्रेस्पी याच्याकडे गेला. क्रेस्पीने फटका मारला, पण टायमिंगअभावी चेंडू बाहेर गेला.

कॅल्वोने 59व्या मिनिटाला फ्री किकवर मारलेला चेंडू हेडिंग करण्यासाठी टिरीने उडी घेतली. त्याने दिल्लीच्या अँड्रीया क्लाऊडेरोविच याला चकविले, पण चेंडू काही त्याला मिळू शकला नाही.

दिल्लीचा बदली खेळाडू नंदकुमार शेखर याने 70व्या मिनिटाला बॉक्समध्ये चेंडू मिळताच व्यवस्थित नियंत्रण प्रस्थापित केले. तो जमशेदपूरचा बचावपटू रॉबीन गुरुंग याला चकवित होता. त्याचवेळी गुरुंगच्या दंडाला चेंडू लागला, पण पंच प्रांजल बॅनर्जी यांना हे दिसले नाही. दिल्लीने तेव्हा पेनल्टीसाठी जोरदार अपिल केले. क्लाऊडेरोविच याने पंचांशी वाद घातला. त्यामुळे त्याला यलो कार्ड दाखविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: रियो ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर, इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल

गेल्यावर्षी आयपीएलमध्ये १२ कोटी मिळालेल्या स्टार खेळाडूला केवळ दीड कोटीच मिळणार?

आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती