ISL 2018: चेन्नईला पहिल्या विजयाची आशा

चेन्नई। चेन्नईयीन एफसीची हिरो इंडियन सुपर लीगमधील वाटचाल विस्कळीत झाली आहे. आज (3 नोव्हेंबर) मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांची लढत होत आहे. या लढतीत तीन गुण मिळविण्याची प्रतिक्षा संघ संपुष्टात आणेल आणि त्यासाठी 2015 मधील मोसमापासून प्रेरणा मिळवेल, अशी आशा प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांना आहे.

चेन्नईयीनला पाच सामन्यांतून अवघ्या एका गुणाची कमाई करता आली आहे. त्यामुळे मोहिमेची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी भक्कम कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान चेन्नईयीनसमोर आहे.

ग्रेगरी यांची प्रकृती बरी नसल्यामुळे पत्रकार परिषदेला सहाय्यक प्रशिक्षक साबीर पाशा उपस्थित होते. चेन्नईयीनच्या आव्हानाला कमी लेखणाऱ्या टीकाकारांना इशारा देताना पाशा यांनी 2015 मधील कामगिरीचा दाखला दिला. तेव्हा चेन्नईयीन मोसमाच्या प्रारंभी गुणतक्त्यात तळातच होते, पण मार्को मॅटेराझी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्कम पुनरागमन केले आणि बाद फेरीत मुसंडी मारली.

पाशा यांनी सांगितले की,” आम्ही गतविजेते आहोत. आम्हाला मागील मोसमाची पुनरावृत्ती करायची आहे, पण दुर्दैवाने अद्याप तसे घडलेले नाही. मार्को यांच्या कार्यकाळात आम्ही तळात होतो, पण पारडे फिरविले आणि जेतेपद जिंकले. खास करून विजेते असल्यामुळे आम्हाला तुम्ही कमी लेखू शकत नाही. उसळी घेण्याचा आम्हाला विश्वास आहे.”

नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध मागील सामन्यात चेन्नईयीनला 1-3 असे पराभूत व्हावे लागले. एक वेळ आघाडी घेऊनही ते हरले. केवळ खराब बचावच नव्हे तर गोलसमोरील ढिसाळ खेळाचा सुद्धा त्यांना फटका बसला आहे. प्रत्येक सामन्यात त्यांनी संधी निर्माण केल्या आहेत, पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आलेले नाही.

पाशा यांनी पुढे सांगितले की, “प्रत्येकाला निकाल ठाऊक आहेत. मुंबई सिटीचा संघ सुद्धा आमच्यासारखाच आहे. गोव्याविरुद्ध त्यांनी धोकादायक प्रतिस्पर्धी म्हणून आपली क्षमता दाखवून दिली होती. एटीकेविरुद्ध आम्ही हेच केले होते. पहिल्या 45 मिनिटांत ते अप्रतिम खेळले आणि बऱ्याच संधी निर्माण केल्या. एटीकेविरुद्ध आमचा 1-2 असा पराभव झाला, पण सामना वेगळा होता. आम्ही बऱ्याच संधी निर्माण केल्या.”

जेजे लालपेखलुआ चेन्नईयीनसाठी गेल्या चार मोसमांतील स्टार खेळाडू ठरला आहे. त्याला यंदा मात्र फारसा फॉर्म गवसलेला नाही. कार्लोस सालोम हा सुद्धा झगडतो आहे. शनिवारी हरल्यास चेन्नईयीन आणि पहिल्या चार संघांमधील तफावत आणखी वाढेल.

मुंबई सिटीला गोव्यात 0-5 असे गारद व्हावे लागले, पण त्यानंतर दिल्ली डायनामोज एफसीला 2-0 असे हरवून त्यांनी बहुमोल विजय मिळविला. जोर्गे कोस्टा यांना मात्र प्रशिक्षक म्हणून संघाकडून सातत्याची अपेक्षा असेल. दिल्लीतील उत्साहवर्धक निकालाचा फायदा संघाने घेणे त्यांना अपेक्षित आहे.

“गोव्यातील सामन्यात पहिल्या सत्रात आम्ही फार चांगला खेळ केला. आम्हाला सहा ते आठ उत्तम संधी मिळाल्या होत्या. शेवटच्या 20-25 मिनिटांच्या खेळावर मात्र मी आनंदी नाही.  त्यानंतर मात्र आम्ही दिल्लीविरुद्ध चांगला खेळ केला. आता मला संघाकडून सातत्याची आणि अनुकूल निकालाची आपेक्षा आहे. सध्या गुणतक्त्यात संघांमध्ये एक किंवा दोन गुणांचा फरक आहे. जिंकून हा फरक वाढविण्याची आम्हाला गरज आहे”, असे कोस्टा म्हणाले.

अरनॉल्ड इसोको याच्यावर मुंबईची मदार असेल, तर रफाएल बॅस्तोस याला गोलसमोर सफाईदार खेळ करावा लागेल.

चेन्नईयीन एफसी संघाला अखेरच्या टप्यात पारडे फिरविणे नवे नाही. 2015 मध्ये त्यांनी हे दाखवून दिले आहे. मुंबईविरुद्ध जिंकल्यास त्यांना गुणतक्त्यात वरचे स्थान मिळविता येईल. मुंबईच्या कामगिरीतही चढउतार झाले आहेत आणि त्यांना सुद्धा सातत्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आजपासून बादफेरीच्या सामन्याचा थरार, जाणून घ्या कसे होणार सामने

ISL 2018: आघाडी घेऊनही पेनल्टी दवडत पुण्याची ब्लास्टर्सशी अखेर बरोबरी

जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स