ISL 2018: चेन्नईयीन, जमशेदपूरला मोहीम भक्कम करण्यासाठी विजयाची अपेक्षा

चेन्नई | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये रविवारी चेन्नईयीन एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात नेहरू स्टेडियमवर लढत होत आहे. दोन्ही संघ बाद फेरीच्या शर्यतीत असल्यामुळे भक्कम खेळ करून तीन गुण मिळविण्याच्या अपेक्षेने मैदानावर उतरतील.

चेन्नईने मागील सामन्यात एफसी गोवा संघावर एकमेव गोलने मात करीत बाद फेरीच्या शर्यतीमध्ये भक्कम कामगिरी नोंदविली. चेन्नईचे 15 सामन्यांतून 27 गुण झाले असून त्यांचा तिसरा क्रमांक आहे. दुसऱ्या स्थानावरील पुण्याचे 29 गुण आहेत. पुण्याने चेन्नईपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे. चेन्नईला निर्णायक विजय मिळाल्यास बाद फेरीतील प्रवेश जवळपास नक्की होईल. त्यामुळे लीगच्या या टप्यास कामगिरी खालावणार नाही यासाठी चेन्नई दक्ष आहे.

चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी सांगितले की, गोव्यावरील विजयानंतर आमची स्थिती बरीच सुधारली आहे. जमशेदपूरची स्थिती सुद्धा अशीच आहे. बाद फेरीत जाऊ किंवा नाही हे आमच्याच हातात आहे. आम्हाला उरलेले सामने जिंकावे लागतील. माझ्या संघाचे तीन सामने बाकी आहेत आणि खेळाडूंनी ते सर्व जिंकावेत अशी माझी अपेक्षा आहे.

चेन्नईच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण आनंदाचे आहे आणि तीन गुण मिळविल्यामुळे गोव्यापासून घरच्या मैदानापर्यंतच्या प्रवासाचा खेळाडूंनी आनंद लुटल्याचे ग्रेगरी यांनी सांगितले. जमशेदपूरविरुद्ध त्यांचा जिद्दीची कसोटी पुन्हा लागेल. याविषयी ग्रेगरी म्हणाले की, मागील पाच सामने पाहिले तर कदाचित जमशेदपूर इतर कोणत्याही संघापेक्षा सरस खेळ करीत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. या टप्यातील त्यांची कामगिरी अप्रतिम झाली आहे.

जमशेदपूरला पहिल्या तीन सामन्यांत एकही विजय मिळविता आला नव्हता. गेल्या सहा सामन्यांत पाच विजय मिळवीत त्यांनी सर्वांनाच चकित केले. हा संघ आता 25 गुणांसह चौथा आहे. चेन्नई, बेंगळुरू व गोवा यांच्याविरुद्ध उरलेले तीन सामने जिंकले तर ते बाद फेरी गाठू शकतील.

जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी सांगितले की, आम्हाला तीन अवघड सामने खेळायचे आहेत. गोव्यावरील विजयामुळे चेन्नईचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यानंतर आम्ही पुढील आठवड्यात बेंगळुरूविरुद्ध खेळू आणि गोव्याविरुद्ध सांगता करू. हे तिन्ही सामने अत्यंत खडतर असतील, पण आम्ही अशा स्थितीत असू असे तुम्ही मोसमाच्या सुरवातीनंतर मला सांगितले असते तर मी सहमत झालो असतो. 

जमशेदपूरला घरच्या मैदानावर चेन्नईविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते, पण आपला संघ पराभवाची परतफेड करण्याशिवाय इतर अनेक कारणांमुळे प्रेरित झाल्याचे कॉप्पेल यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, वचपा काढण्याचा मुद्दा नक्कीच नाही. हा आमच्या वेळापत्रकामधील आणखी एक सामना आहे. या टप्यास निकालांना जास्त महत्त्व आहे. रविवारी जे काही घडेल त्यामुळे आमचा मोसम संपणार नाही. आम्हाला तिन्ही सामने खेळावे लागतील. निकाल दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. पूर्ण तीन गुण मिळविणाऱ्या संघाच्या मोहिमेला मोठी बळकटी मिळेल.