ISL 2018: पुण्याला गारद करत चेन्नईयीनचा अखेर पहिला विजय

पुणे: गतविजेत्या चेन्नईयीन एफसीने हिरो इंडियन सुपर लिगमध्ये पाचव्या मोसमात निर्णायक विजयाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आणताना एफसी पुणे सिटीला 4-2 असे गारद केले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात नवव्याच आशिक कुरुनियन याच्या गोलमुळे मिळालेली आघाडी पुण्याने मध्यंतरास कायम राखली होती. दुसऱ्या सत्रात चेन्नईयीनने पारडे फिरवित दोन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. मग चार मिनिटांत आणखी दोन गोलांचा धडाका लावला. कर्णधार मैल्सन आल्वेस, ग्रेगरी नेल्सन, इनिगो कॅल्डेरॉन व थोई सिंग यांनी ही कामगिरी साकार केली. अखेरच्या मिनिटाला जोनाथन व्हिलाच्या गोलमुळे पुणे सिटीला पराभवाचे अंतर तेवढे थोडे कमी करता आले.

जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईयीनने सातव्या सामन्यात अखेर पहिला विजय संपादन केला. त्यांनी एक बरोबरी साधली असून पाच पराभव पत्करले आहेत. त्यांचे चार गुण झाले. चेन्नईयीनने पुणे आणि सरस गोलफरकामुळे दिल्ली डायनॅमोज एफसी यांना मागे टाकत आठवे स्थान गाठले. चेन्नईयीनचा गोलफरक 9-13, उणे  4, तर दिल्लीचा 5-10, उणे 5 इतका आहे.

पुणे सिटीची प्रतिक्षा आणखी लांबली. सहा सामन्यांत त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला असून त्यांनी दोन बरोबरी साधल्या आहेत. त्यांचे दोन गुण कायम राहिले. आता पुणे तळात आहे. पुणे आणि दिल्ली डायनॅमोज यांनाच केवळ अद्याप एकही विजय मिळविता आलेला नाही. गतउपविजेता बेंगळुरू एफसी 13 गुणांसह आघाडीवर आहे. जमशेदपूर दुसऱ्या, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी तिसऱ्या, तर एफसी गोवा चौथ्या स्थानावर आहे.

54व्या मिनिटाला अनिरुध थापाने फ्री किकवर उजवीकडून अप्रतिम फटका मारला. त्याने पलिकडील बाजूला कर्णधार मैल्सन आल्वेस याच्यासाठी संधी निर्माण केली. आल्वेसने उडी घेत हेडिंग केले आणि कमलजीतला चकविले. दोन मिनिटांनी आल्वेसने चाल रचत नेल्सनच्या दिशेने चेंडू मारला. त्यात पुढे सरसावरण्याची चूक कमलजीतला भोवली.

69व्या मिनिटाला अनिरुधने कॉर्नर घेतला. त्यावर रफाएल आगुस्तोने कॅल्डेरॉनकडे चेंडू सोपविला. मग कॅल्डेरॉनने चपळाईने फटका मारत लक्ष्य साधले. 72व्या मिनिटाला आगुस्तोने उजवीकडून पुण्याच्या लालछुआन्माविया फानाईला चकविले. मग त्याच्या फटक्यावर जेजे लालपेखलुआ याने प्रयत्न केला, पण चेंडू कमलजीतने थोपविला. रिबाऊंडवर मिळालेल्या संधीचे मग बदली खेळाडू थोईने सोने केले.

वास्तविक घरच्या मैदानावर पुणे सिटीने सुरवात चांगली केली होती. नवव्या मिनिटाला त्यांनी खाते उघडले. रॉबिन सिंग याने ही चाल रचली. उजवीकडून चेंडू मिळताच त्याने कुरुनियन याच्यासाठी संधी निर्माण केली. आशिकने बॉक्समध्ये चेंडूवर ताबा मिळवित अप्रतिम गोल केला.