ISL 2018: छेत्रीच्या हॅट्रिकमुळे पुण्याला हरवून बेंगळुरू अंतिम फेरीत

बेंगळुरू |  हिरो इंडियन सुपर लिगमध्ये चौथ्या मोसमात पदार्पण करणाऱ्या बेंगळुरू एफसीने अंतिम फेरीत धडक मारली. येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध बेंगळुरूने 3-1 असा भारदस्त विजय मिळविला. घरच्या मैदानावर कर्णधार सुनील छेत्री बेंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने शानदार हॅट््ट्रिक नोंदविली.

छेत्रीने 15व्या मिनिटाला खाते उघडले. उत्तरार्धात त्याने पेनल्टी किकवर गोल केला. मग एक मिनिट बाकी असताना त्याने हॅट््ट्रिक पूर्ण केली. पुण्याचा एकमेव गोल बदली खेळाडू जोनाथन ल्यूकाने 82व्या मिनिटाला नोंदविला. त्यानंतर बरोबरी साधली असती तर पुण्याला संधी होती, पण छेत्रीने हॅट््ट्रिकसह पुण्याच्या आशा धुळीस मिळविल्या.

पुर्वार्धात पुण्याच्या आक्रमणांचा वेग कमी झाल्यानंतर बेंगळुरूने चाल केली. छेत्रीने चेंडूवर ताबा मिळवित उजवीकडून उदांता सिंगला पास दिला. उदांताने पेनल्टी क्षेत्रात प्रवेश केला आणि चेंडू पलिकडील बाजूला छेत्रीकडे पुन्हा मारला. छेत्रीने उंच उडी घेत हेडिंग केले. त्यावेळी पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ आणि गुरतेज सिंग यांच्यातील समन्वयाअभावी चेंडू नेटमध्ये गेला.

दुसऱ्या सत्रात एकूण 64व्या मिनिटाला पुण्याच्या सार्थक गोलुईने गोलरेषेपाशी छेत्रीला पाडले. पंचांना हे नीट दिसल्यामुळे त्यांनी बेंगळुरूला तात्काळ पेनल्टी बहाल केली. त्यावर स्वतः छेत्रीने शानदार गोल केला. डावीकडे झेपावलेल्या कैथच्या डोक्यावरून त्याने चेंडू नेटमध्ये मारला.

दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतरही पुण्याने अथक प्रयत्न केले. 71व्या मिनिटाला दिएगो कार्लोस याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून जोनाथन ल्युका याला पाचारण करण्यात आले. त्याने 82व्या मिनिटाला गोल केला. तेव्हा पुण्याला संधी होती, पण त्यानंतर छेत्रीने आपला दर्जा पुन्हा एकदा प्रदर्शित केला. डिमास डेल्गाडोच्या पासवर अप्रतिम गोल केला. त्यावेळी त्याने पुण्याच्या रोहित कुमारला आधी चकविले.

बेंगळुरूने सुरवात सकारात्मक केली होती. मिकूच्या फ्लीकवर उदांताला उजवीकडून संधी मिळाली. उदांताच्या हालचालींचा अचूक अंदाज घेत छेत्रीने घोडदौड केली होती. चेंडू मिळताच त्याने प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या स्टडना लागून बाहेर गेला.

पुढच्याच मिनिटाला पुण्याने प्रयत्न केला. एमिलीयानो अल्फारोने पेनल्टी क्षेत्रात दिएगो कार्लोसला पास दिला. कार्लोसने नेटच्या दिशेने फटका मारला, पण बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतने चपळाईच्या जोरावर चेंडू बाहेर घालविला. त्यावर पुण्याला मिळालेला कॉर्नर वाया गेला. त्यावेळी चांगली संधी असूनही साहील पन्वरने मारलेला स्वैर चेंडू स्टँडमध्ये गेला.

पिछाडीवर पडल्यानंतर पुण्याने निर्धाराने बचाव केला. डिमास डेल्गाडोने पेनल्टी क्षेत्रातून प्रयत्न केला, पण पुण्याच्या रॅफेल लोपेझने मैदानावर घसरत चेंडू थोपविला. हा चेंडू उदांताकडे गेला. उदांताने मारलेला चेंडू आदिल खानने हेडिंगकरवी बाहेर घालविला. त्यावरील कॉर्नरवर काही होऊ शकले नाही.

29व्या मिनिटाला पुण्याने प्रयत्न केला. अल्फारोने डावीकडे मार्सेलिनियोला पास दिला. मार्सेलिनियोने पेनल्टी क्षेत्रात चेंडू छान मारला, पण कार्लोस आणि आदिल यांच्यापैकी कुणीच तेथे वेळीच पोचू शकले नाहीत. 42व्या मिनिटाला एरीक पार्टालू याने डावीकडून घेतलेल्या कॉर्नरवर छेत्रीने केलेले हेडिंग थोडक्यात बाहेर गेले.

निकाल :

उपांत्य फेरी : दुसरा टप्पा :
बेंगळुरू एफसी : 3 (सुनील छेत्री 15, 65-पेनल्टी, 89)
विजयी विरुद्ध एफसी पुणे सिटी : 1 (जोनाथन ल्युका 82)
पहिला टप्पा : बेंगळुरू : 0 बरोबरी विरुद्ध पुणे : 0
अॅग्रीगेट :बेंगळुरू : 3 विजयी विरुद्ध पुणे : 1