ISL 2018: चेन्नईला चकवित दिल्लीचा अखेर पहिला विजय

चेन्नई।  दिल्ली डायनॅमोज एफसीने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील पहिल्यावहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आणली. गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर दिल्लीने 3-1 असा प्रभावी विजय मिळविला. मध्यंतराच्या 1-1 अशा बरोबरीनंतर उत्तरार्धात दिल्लीने चार मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले.

डॅनिएल लाल्हीम्पुईया याने दिल्लीचे खाते उघडले होते. रफाएल आगुस्तोने पेनल्टीचा फायदा उठवित चेन्नईयीनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात बिक्रमजीत सिंग आणि नंदकुमार शेखर यांनी अप्रतिम गोल करीत दिल्लीचा विजय साकार केला.

दिल्लीने 12व्या सामन्यात पहिलावहिला विजय नोंदविला असून चार बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण झाले. त्यांनी चेन्नईयीनला मागे टाकले. चेन्नईयीनला 12 सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. एक विजय व दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे पाच गुण राहिले. त्यांची अखेरच्या दहाव्या क्रमांकावर घसरण झाली. गुणतक्त्यात बेंगळुरू एफसी (27 गुण), मुंबई सिटी एफसी (21), एफसी गोवा (20) आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (20) अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकांवर आहेत.

यजमान चेन्नईयीनने सुरवातीपासून जोरदार प्रयत्न केले होते. खाते उघडण्याची शर्यत मात्र दिल्लीने जिंकली. तरुण खेळाडू लाल्हीम्पुईया याने गोल केला. रेने मिहेलीच याने डावीकडून चाल रचली. त्याने नंदकुमार शेखरला पास दिला. नंदकुमारच्या हालचालींचा अंदाज घेत लाल्हीम्पुईयाने बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने अचूक टायमिंग साधत हेडिंग केले आणि चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याला चकविले.

चेन्नईयीनने पेनल्टीवर बरोबरी साधली. दिल्लीचा बचावपटू महंमद थोटने कार्लोस सालोम याला गोलक्षेत्रात पाठीमागून धक्का देत पाडले. त्यामुळे पंच एल. अजितकुमार मैतेई यांनी थोटला यलो कार्ड दाखवित चेन्नईयीनला पेनल्टी बहाल केली. रफाएल आगुस्तोने त्यावर चेंडू उजव्या कोपऱ्यात मैदानालगत मारले. त्यावेळी दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याचा अंदाज चुकला.

मध्यंतराच्या 1-1 अशा बरोबरीनंतर दिल्लीने 78व्या मिनिटाला आघाडी घेतली. बदली खेळाडू अँड्रीया क्लाऊडेरोविच याने लालियनझुला छांगटे याला हवेतून चेंडू मारत धुर्त पास दिला.त्यावर छांगटेने उजवीकडून मुसंडी मारली. त्याला रोखण्यात चेन्नईयीनच्या क्षेत्रात केवळ गोलरक्षक करणजीत होता. अशावेळी छांगटेने मग बिक्रमजीतकडे चेंडू सोपविला. मग बिक्रमजीतने चेंडू शांतपणे नेटमध्ये मारला.

चार मिनिटांनी छांगटेने उजवीकडून आगेकूच केली. त्याला रोखण्यात आले, पण चेंडू शेखरकडे गेला. शेखरने चेंडूवर नियंत्रण मिळवित चेंडू करणजीतच्या डावीकडे मारला. करणजीतने चेंडू थोपलिला, पण उडालेला चेंडू चेन्नईयीनच्या मैल्सन आल्वेसच्या उजव्या पायाला लागून नेटमध्ये गेला.

दुसऱ्याच मिनिटाला चेन्नईयीनच्या रफाएल आगुस्तोने डावीकडून चाल रचली. त्याने बॉक्सबाहेरून मारलेला चेंडू थेट दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याच्याकडे गेला. तीन मिनिटांनी अनिरुध थापा याने डावीकडून घेतलेल्या फ्री किकवर कार्लोस सालोम याच्याकडे चेंडू गेला. त्यावर सालोमने हेडिंग केले, पण फ्रान्सिस्कोने चेंडू थोपवित क्रॉसबारवरून बाहेर घालविला. त्यामुळे मिळालेल्या कॉर्नरवर फार काही घडले नाही.

दिल्लीच्या मार्टी क्रेस्पीला 12व्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने सालोमला मागून धरले आणि पाडले. फ्रान्सिस्कोने 13व्या मिनिटाला चांगला बचाव केला. क्रेस्पीने फाऊल केल्यामुळे मिळालेल्या फ्री किकवर आगुस्तोने थेट प्रयत्न करीत नेटच्या उजव्या कोपऱ्यात मैदानालगत फटका मारला, पण फ्रान्सिस्कोने डावीकडे झेपावत चेंडू अडविला.

क्रेस्पीने 26व्या मिनिटाला सालोमला रोखले. फ्रान्सिस्को फर्नांडीसच्या पासनंतर सालोम फटका मारण्यासाठी सज्ज होत असतानाच क्रेस्पीने मैदानावर घसरत चेंडू ब्लॉक केला. 30व्या मिनिटाला आगुस्तोने उजवीकडून मुसंडी मारत सालोमला क्रॉस पास दिला. सालोमने त्यावर हेडिंग केले, पण करणजीतने चेंडू आरामात अडविला.

महत्त्वाच्या बातम्या:

मी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण

गौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा

अबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स !