ISL 2018: गोव्याची विजयाची हॅट्ट्रीक

गोवाहिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमातील धडाका कायम राखत एफसी गोवा संघाने घरच्या मैदानावर एफसी पुणे सिटीला 4-2 असा शह दिला. याबरोबरच गोव्याने गुणतक्त्यात आघाडी सुद्धा घेतली. नेहरू स्टेडियमवरील लढतीत पूर्वार्धात सहा गोल झाले. यात पुण्याच्या दोन गोलांना गोव्याने दुप्पट म्हणजे चार गोलांचे प्रत्यूत्तर दिले.

कर्णधार एमिलीयानो अल्फारो याने पेनल्टी दवडणे, अखेरच्या टप्यात दिएगो कार्लोस याला लाल कार्डला सामोरे जावे लागणे अशा कारणांमुळे पुण्यासाठी ही लढत धक्कादायक ठरली. गोव्याच्या विजयात दोन गोलांसह सिंहाचा वाटा उचललेल्या फेरॅन कोरोमीनास यालाही लाल कार्डला सामोरे जावे लागले. कोरोने चार सामन्यांतून सहा गोल नोंदवित गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली. त्याने नॉर्थइस्टचा बार्थोलोम्यू ओगबेचे याला (4 सामन्यांतून 5 गोल) मागे टाकले.

गोव्याने चार सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून एक बरोबरी साधली आहे. गोव्याने दहा गुणांसह आघाडी घेताना नॉर्थइस्ट युनायटेड एफसीला (चार सामन्यांतून 8 गुण) मागे टाकले. प्रत्येकी सात गुणांसह बेंगळूरू तिसऱ्या, एटीके चौथ्या, तर मुंबई सिटी पाचव्या स्थानावर आहे. एफसी पुणे सिटीला चार सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. एका बरोबरीच्या एका गुणासह हा संघ तळात दहाव्या स्थानावर आहे. गोलफरक 3-10 असा उणे सात होणे पुण्यासाठी आणखी धक्कादायक ठरले.

पुर्वार्धात अर्धा डझन गोल झाले. कोरोने पाचव्याच मिनिटाला खाते उघडले. तीन मिनिटांनी मार्सेलिनीयोने पुण्याला बरोबरी साधून दिली. त्यानतंर ह्युगो बौमौसने गोव्याचा दुसरा, तर जॅकीचंद सिंगने तिसरा गोल केला. आठ मिनिटांच्या अंतराने झालेल्या या गोलमुळे गोव्याने 3-1 अशी दमदार आघाडी घेतली. तीन मिनिटांनी एमिलीयानो अल्फारो याने पुण्याचा दुसरा गोल केला. कोरोने मग 12 मिनिटांनी वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल केला. अंतिम टप्यात मार्सेलिनीयोचा फटका क्रॉसबारला लागला नसता तर पुण्याला पिछाडी आणखी कमी करता आली असती.

पुण्याने सुरवात आक्रमक केली. पहिल्याच मिनिटाला अल्फारोने बॉक्सपाशी दिलेल्या पासवर मार्सेलिनीयोला पुरेशा ताकदीअभावी चेंडू मारता आला नाही. त्यामुळे गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने चेंडू सहज अडविला. खाते उघडण्याची शर्यत घरच्या मैदानावर गोव्याने जिंकली. पाचव्या मिनिटाला एदू बेदियाच्या पासवर कोरोने लक्ष्य साधले. बेदियाने पुण्याच्या बचाव फळीच्या वरून मारलेला चेंडू कोरोने अथक धावत मिळविला. त्याने बॉक्समध्ये घसरत पुण्याचा मध्यरक्षक गुरजेत सिंग याला चकविले आणि चेंडू उजवीकडून नेटच्या डाव्या कोपऱ्यात मैदानालगत मारला. कोरोच्या कौशल्यासमोर पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ निरुत्तर झाला.

पुण्याने तीन मिनिटांत बरोबरी साधली. रॉबीन सिंगने डावीकडून मार्को स्टॅन्कोविच याचा पास मिळताच बॉक्समध्ये मार्सेलिनीयोसाठी संधी निर्माण केली. मार्सेरिनीयोने नेटच्या वरील भागात चेंडू मारला. त्यावेळी झेप घेऊनही नवाझ चेंडू अडवू शकला नाही. 12व्या मिनिटाला कोरोने मुसंडी मारत रचलेली चाल ह्युगोने सत्कारणी लावली. मग 20व्या मिनिटाला सेरीटॉन फर्नांडीसच्या अप्रतिम पासवर कोरोने नेटसमोर जॅकीचंदला पास दिला. जॅकीचंदने उरलेले काम फत्ते केले. 23व्या मिनिटाला अल्फारोने नेत्रदिपक फटका मारत नवाझला चकविले. 35व्या मिनिटाला कोरोने जॅकीचंदकडून बॉक्समध्ये मिळालेला चेंडू मारला. गुरजेतने चेंडू ब्लॉक केला, पण कोरोने चपळाईने दुसरा प्रयत्न करीत कैथला चकविले.

दुसऱ्या सत्रात पुण्याकडून आणखी गंभीर चूक झाली. 54व्या मिनिटाला चिंगलेनसाना सिंग याने अल्फारोला बॉक्समध्ये पाडले. त्यामुळे पंच प्रांजल बॅनर्जी यांनी पुण्याला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी अल्फारो पुढे सरसावला. त्याने नेटच्या डाव्या कोपऱ्यात वरील बाजूला ताकदवान फटका मारला, पण नवाझने उजवीकडे झेपावत चेंडू अडविला. त्याआधी पुण्याने फ्री किक दवडली होती. चिंगलेनसाना याने अल्फारोला पाडले होते. फ्री किकवर मार्को स्टॅन्कोविचने स्वैर फटका मारला.

84व्या मिनिटाला विशाल कैथने कोरोचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे कोरोची हॅट््ट्रिक हुकली. अंतिम टप्यात पुण्याचा संघ हताश झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातूनच बदली खेळाडू कार्लोसने सेरीटॉन फर्नांडीसला ठोसा मारला. त्यामुळे त्याला लाल कार्डसह मैदान सोडावे लागले. अखेरच्या मिनिटाला कोरोने बचावाच्या प्रयत्नात मैदानावर घसरत स्टॅन्कोविचला पाडले. त्यामुळे त्याला लाल कार्ड दाखविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: शतक साजरे करणाऱ्या रहाणेला या कारणामुळे सुरेश रैनाने थांबवले

सचिन, द्रविडनंतर असा पराक्रम करणारा विराट कोहली केवळ तिसराच फलंदाज