ISL 2018: एफसी गोवा घरच्या मैदानावर मुंबईकडून पराभूत

गोवा । हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमातील आतापर्यंतच्या सर्वाधिक नाट्यमय लढतीत एफसी गोवा संघाला नेहरू स्टेडियमवरील घरच्या मैदानावर मुंबई सिटी एफसीविरुद्ध 3-4 अशा पराभवाचा फटका बसला. या लढतीत गोव्याच्या पाच, तर मुंबईच्या सहा अशा एकुण तब्बल 11 खेळाडूंना पिवळी कार्ड दाखविण्यात आली.

मध्यंतरास गोव्याने 2-1 अशी आघाडी मिळविली होती, पण उत्तरार्धाच्या प्रारंभीच सेरीटॉन फर्नांडीसला दुसऱ्या पिवळ्या कार्डसह मैदान सोडावे लागले. दहा खेळाडूंनिशी खेळण्याची वेळ येऊनही गोव्याने बरोबरी साधली होती, पण चार मिनिटे बाकी असताना एव्हर्टन सँटोसचा फटका अडविताना गोव्याचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीला फाजील आत्मविश्वास भोवला. कट्टीमनी पुढे सरसावला, पण त्याला सफाईदार बचाव करता आला नाही. मंदार राव देसाई याने चेंडू डाव्या पायाने बाहेर मारण्याचा प्रयत्न केला, पण तोच मुंबईच्या बलवंत सिंगने चेंडूला नेटची दिशा दिली. हाच गोल निर्णायक ठरला. मुंबईने पहिल्या टप्यातही बाजी मारताना गोव्याला चकविले होते.

गोव्याला 11 सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. 19 गुणांसह त्यांचे चौथे स्थान कायम राहिले, पण निर्णायक विजयासह आघाडीची संधी गेली. मुंबईने 12 सामन्यांत पाचवा विजय मिळविला. दोन बरोबरी व पाच पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. मुंबईने 17 गुणांसह गोलफरक सुधारला. त्यामुळे जमशेदपूर एफसी व केरळा ब्लास्टर्स यांना मागे टाकत मुंबईने पाचवे स्थान गाठले.

दुसऱ्या सत्रात वेगवान घडामोडी घडल्या. 46व्या मिनीटाला मंदारने मारलेली किक अमरिंदरने पायाने अचूकपणे अडविली. 48व्या मिनिटाला मुंबईच्या एव्हर्टन सँटोसने घोडदौड करीत सेरीटॉनला मागे टाकले. यामुळे सेरिटॉनने पाठीमागून एव्हर्टनची जर्सी ओढली. परिणामी सेरीटॉनला दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखविण्यात आले. त्याआधी 31व्या मिनिटाला त्याला पिवळ्या कार्डला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सेरीटॉनला मैदान सोडावे लागले. त्यावेळी गोव्याचे मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांना धक्का बसला होता.

दहा खेळाडूंनीशी खेळावे लागल्यानंतर गोव्याला आणखी एक धक्का बसला. 53व्या मिनिटाला महंमद अलीने बॉक्समध्ये घसरत एव्हर्टनला पाडले. त्यामुळे मुंबईला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. त्यावर अचीले एमाना याने कट्टीमनीचा अंदाज चुकवित डावीकडे चेंडू मारला. यानंतर थियागो सँटोसने मुंबईला आघाडी मिळवून दिली होती. या धक्क्यानंतर 78व्या मिनीटाला कोरोमीनासने अहमद जाहौहचा पास सत्कारणी लावत गोव्याला बरोबरी साधून दिली होती, पण अखेरीस बलवंतने मुंबईला तारले.

पहिल्या सत्रात गोव्याने सुरवात वेगवान केली. चेंडूवर ताबा राखत त्यांनी दोन्ही बाजूंनी चाली रचल्या. पहिल्या 15 मिनिटांत मुंबईला प्रभाव पाडता आला नव्हता. अखेर मुंबईने खेळात समन्वय साधला, पण पहिल्या 25 मिनिटांत दोन्ही संघ अर्थपूर्ण चाल रचू शकले नाहीत. 28व्या मिनिटाला बलवंतने चेंडू मारला, पण कट्टीमनी याने चेंडू सहज अडविला.

34व्या मिनिटाला कोरोमीनासने घोडदौड करीत मुंबईच्या दोन बचावपटूंना चकविले. त्यानंतर त्याने घसरत डावीकडे मंदार राव देसाई याला पास दिला. मंदारचा फटका अमरिंदरने थोपविला, पण दक्ष आणि धुर्त कोरोमीनासने रिबाऊंडवर चेंडू नेटमध्ये घालविला.

त्यानंतर दोन मिनिटांत मुंबईचा गोल नशीबाने झाला. थियागो सँटोसने बॉक्सच्या किंचीत बाहेर चेंडू मारला, तो नेटच्या बाहेर जाण्याची चिन्हे होती, पण तोच एव्हर्टन सँटोसला लागून चेंडू अचानक वळला आणि नेटमध्ये गेला. त्यावेळी असे घडेल हे कट्टीमनीच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. त्यामुळे चेंडू नेटमध्ये गेल्याचे त्याला पाहावे लागले.

पुर्वार्धाच्या अंतिम टप्यात गोव्याने जोर लावला. मंदारने लांबून डाव्या पायाने मारलेला चेंडू थेट स्टँडमध्ये गेला. एका मिनिटाच्या भरपाई वेळेत लँझारोटोने आगेकूच केली होती. त्याला रोखण्यावरून अमरिंदर व संजू प्रधान यांना समन्वय साधता आला नाही. याचा फायदा घेत लँझारोटने मोकळ्या नेटमध्ये अलगद चेंडू मारला.

निकाल :
एफसी गोवा : 3 (फेरॅन कोरोमीनास 34, 78, मॅन्युएल लँझारोटे 45)पराभूत विरुद्ध मुंबई सिटी एफसी : 4 (एव्हर्टन सँटोस 36, अचीले एमाना 54-पेनल्टी, थियागो सँटोस 70, बलवंत सिंग 86)