ISL 2018: जमशेदपूरला नमवत एफसी पुणे सिटीचा आयएसएलमधील पहिलाच विजय

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीने पहिल्यावहिल्या विजयाची प्रतिक्षा अखेर बुधवारी घरच्या मैदानावर संपुष्टात आणली. जमशेदपूर एफसीला 2-1 असे हरवित पुण्याने आठव सामन्यांत पहिलाच विजय नोंदविला.

निर्धारीत वेळ संपण्यास चार मिनिटे बाकी असताना इंग्लंडचा बचावपटू मॅट मिल्स याने केलेला गोल निर्णायक ठरला. पुणे निर्णायक विजयाचे खाते उघडत असताना जमशेदपूरची अपराजित मालिका संपुष्टात आली.

याबरोबरच आठ सामन्यांत एक विजय, दोन बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह पुण्याचे पाच गुण झाले. पुण्याने दोन क्रमांक झेप घेत तळाच्या दहाव्या क्रमांकावरून आठवे स्थान गाठले. जमशेदपूरचे चौथे स्थान कायम राहिले. आठ सामन्यांत दोन विजय, पाच बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 11 गुण आहेत.

आता दहा संघांमध्ये केवळ बेंगळुरू एफसी पाच सामन्यांत अपराजित आहे, तर दिल्ली डायनॅमोज एफसीला आठ सामन्यांत एकही विजय मिळविता आलेला नाही.

86व्या मिनिटाला बदली खेळाडू मार्को स्टॅन्कोविच याने उजवीकडून कॉर्नर घेतला. त्यावर मिल्सने अचूक टायमिंग साधत उडी घेतली आणि हेडिंगवर लक्ष्य साधले. खाते उघडण्याची शर्यत पुणे सिटीने जिंकली. पाचव्याच मिनिटाला मार्सेलिनीयो याच्या पासवर दिएगो कार्लोसने गोल केला. तीन सामन्यांच्या बंदीनंतर कार्लोसने सनसनाटी कामगिरी नोंदविली. त्याने शानदार फटका मारत जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला चकविले. त्यावेळी त्याला रोखण्याचा टिरीचा प्रयत्न अपयशी ठरला.

जमशेदपूरने पाच मिनिटांत बरोबरी साधली. डावीकडून कार्लोस कॅल्वो याने आगेकूच केली. त्याने सुमित पासी याला पास दिला. सुमितला तेव्हा मार्किंग नव्हते. याचा फायदा घेत त्याने हेडिंग केले आणि पुण्याचा गोलरक्षक कमलजीत सिंग झेप टाकूनही चेंडू अडवू शकला नाही.

पहिला प्रयत्न तिसऱ्या मिनिटाला जमशेदपूरने नोंदविला. मारिओ आर्क्वेस याने डावीकडून मुसंडी मारली, पण त्याने बॉक्समधून मारलेला फटका स्वैर होता. पुण्याने खाते उघडल्यानंतर कमलजीतने सुरवातीला जमशेदपूरचे दोन प्रयत्न अपयशी ठरविले. टिरीने हेडींगवर पासीकडे चेंडू सोपविला. पासीने डालव्या पायाने मारलेला फटका कमलजीतने कॉर्नरसाठी बाहेर घालविला. मग कॅल्वोने घेतलेल्या कॉर्नरवर पाब्लो मॉर्गाडोने प्रयत्न केला, पण यावेळीही कमलजीतने बचाव केला.

आशिक कुरुनियान याने 17व्या मिनिटाला प्रयत्न केला. त्याने छातीवर चेंडू नियंत्रीत केला. त्याच्या फटक्यावर चकलेला सुब्रत चेंडू क्रॉसबारला लागल्यामुळे बचावला. 23व्या मिनिटाला मार्सेलिनीयोने रॉबीन गुरुंगला धसमुसळ्या खेळाने पाडले. त्यावेळी जमशेदपूरने पेनल्टीचे अपील केले होते. 33व्या मिनिटाला आशिकने घोडदौड करीत मारलेला चेंडू टिरीने ब्लॉक केला.

उत्तरार्धात मार्सेलिनीयोने डावीकडून मुसंडी मारली. त्याने पास देताच रॉबिनने मारलेला फटका स्वैर होता. 55व्या मिनिटाला मॉर्गाडोने मारलेला चेंडू कमलजीतने उजवीकडे झेपावत थोपविला. मग चेंडू उजव्या बाजूला गुरुंगकडे गेला. त्यावेळी गुरतेज सिंग आणि कमलजीत यांच्यातील समन्वयाअभावी नेट मोकळे राहिले होते, पण चेंडू सुदैवाने बाहेर केला.

61व्या मिनिटाला पुण्याने प्रतिआक्रमण रचले. उजवीकडून आशिकने चांगली चाल रचली. त्याने रॉबिनच्या दिशेने चेंडू मारला. तेव्हा रॉबिनला मोकळ्या नेटमध्ये चेंडू मारायचा होता, पण तो चुकला. परिणामी चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.

निकाल:

एफसी पुणे सिटी: 2 (दिएगो कार्लोस 5, मॅट मिल्स 86) विजयी विरुद्ध जमशेदपूर एफसी: 1 (सुमीत पासी 10)