ISL 2018: गोव्याचा पराभवातून सावरण्याचा, तर दिल्लीचा विजयाचा निर्धार

गोवा: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी एफसी गोवा आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यात लढत होत आहे. नेहरू स्टेडियमवरील लढतीत गोव्याचा आधीच्या पराभवातून सावरण्याचा, तर दिल्लीचा पहिल्या विजयाचा निर्धार असेल.

गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांची संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. गोव्याला जमशेदपूरमध्ये 1-4 अशा पराभावाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गोव्याची अपराजित मालिका संपुष्टात आली. ही कामगिरी आपल्या कार्यकाळातील सर्वांत खराब असल्याचे आणि खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात संघ कमी पडल्याचे त्यांनी मान्य केले.

स्पेनचे लॉबेरा म्हणाले की, हा माझ्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील कदाचित सर्वांत खराब निकाल असेल. आम्हाला कसून सराव करावा लागेल आणि कामगिरीत सुधारणा करावी लागेल.

लॉबेरा यांना घरच्या मैदानावरील सामना, तेथील प्रोत्साहन देणारे प्रेक्षक आणि यंदा येथील शंभर टक्के यशोमालिका दिलासा देणारे मुद्दे असतील. गोव्यासाठी स्वागतार्ह बातमी म्हणते स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास उपलब्ध असेल. त्याच्यावरील एका सामन्याची बंदी संपुष्टात आली आहे. त्याचा समावेश आघाडी फळी भक्कम करेल. त्याने यंदा 350 मिनिटांत सहा गोल आणि चार अॅसिस्ट अशी कामगिरी केली आहे. ब्रँडन फर्नांडीस पुन्हा तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे लॉबेरा संघात काही बदल करणार का याची उत्सुकता आहे.

या सामन्यात मुळचा गोव्याचा व आता दिल्लीला गेलेला रोमीओ फर्नांडीस येथे पुनरागन करेल. झिको यांच्या कार्यकाळात त्याने गोव्याकडून चांगली कामगिरी केली. गेल्या मोसमात तो दिल्लीशी करारबद्ध झाला. त्यानंतर त्याच्या कामगिरीत पुरेसे सातत्य राहिलेले नाही.

दिल्लीचे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ आपल्या संघाच्या कामगिरीविषयी समाधानी असतील. जमशेदपूरविरुद्ध दुसऱ्या सत्रात 15 मिनिटे त्यांच्या संघाने चांगला खेळ केला. त्यात त्यांनी दोन गोल केले. जोसेप यांनी मध्यंतरास अल्बीनो गोम्सला दोन स्टीक्सच्या मध्ये उभे केले. त्यांनी जास्त परदेशी खेळाडूंना पसंती दिली.

गोव्याविरुद्ध ते सुरवातीपासून आक्रमक डावपेच वापरणार का याची उत्सुकता असेल. मुंबई सिटीने असाच खेळ केला होता, पण फिनिशिंग खराब झाल्यामुळे त्यांना फटका बसला. त्यांनी बचाव फळीत गॅप ठेवल्या. त्यामुळे गोव्याला पाच गोलांचा धडाका लावता आला.

अॅड्रीया कॅर्मोना हा कल्पक खेळाडू आहे, पण तो केवळ 171 मिनिटे खेळू शकला आहे. यावरून त्याची तंदुरुस्ती बरोबर नसल्याचे दिसून येते. जोसेप यांनी सांगितल की, आम्हाला संघर्ष करावा लागेल. आम्हाला पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवावे लागेल. आम्ही सहा गुणांनी मागे आहोत, पण हे दोन विजयांइतके अंतर आहे. त्यामुळे आम्हाला उत्सुक राहून कसून सराव करावा लागेल.

यंदा सात सामन्यांत जमशेदपूरला सर्वोत्तम खेळ करता आलेला नाही. आठव्या प्रयत्नात दैव साथ देईल अशी त्यांना आशा आहे. चौथ्या क्रमांकावर गेलेल्या गोव्याला जमशेदपूरला हरविल्यास आघाडी घेता येईल.