ISL 2018: ब्लास्टर्स-पुणे सिटी लढतीला जेम्स यांच्या टीकेचाही रंग

कोची| हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) आज (6 डिसेंबर ) केरला ब्लास्टर्स आणि एफसी पुणे सिटी यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याला रात्री 7.30 सुरूवात होणार आहे.  पुणे सिटीची प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याची पद्धत जवळपास लाजीरवाणी आहे, अशी टीका ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी केली. त्यामुळे या लढतीला या वक्तव्याचाही रंग मिळाला आहे.

ब्लास्टर्सला घरच्या मैदानावर यंदा पहिल्या विजयाची अजूनही प्रतिक्षा आहे. त्यांच्याप्रमाणेच पुण्याला दहा सामन्यांत अवघा एक विजय मिळविता आला आहे. दोन संघांमधील फरक केवळ चार गुणांचा आहे. दोन्ही संघ आक्रमणासाठी झगडत आहेत. ब्लास्टर्सला 11, तर पुण्याला केवळ नऊ गोल करता आले आहेत.

सामन्याच्या पूर्वसंध्येस ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी पुण्याच्या अतिआक्रमक धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पुण्याचे काही खेळाडू निलंबीत झाले होते. इयन ह्युम आताच संघात आला आहे. त्यांचे जास्त खेळाडू निलंबीत नाहीत याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या काही खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना ज्या पद्धतीने रोखलेस, ते जवळपास लाजीरवाणे होते.

आपल्या संघाविषयी जेम्स यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या मंगळवारी ब्लास्टर्सची जमशेदपूर एफसीविरुद्ध 1-1 अशी बरोबरी झाली. त्यात ब्लास्टर्सने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. त्याशिवाय त्यांनी प्रतिस्पर्धी बचाव फळीला नियंत्रणात रोखले.

जेम्स यांनी सांगितले की, ही कामगिरी फार चांगली आहे. आतापर्यंतच्या मोसमातील ही सर्वोत्तम आहे, पण आम्ही जिंकू शकलो नाही असा हा आणखी एक सामना होता. संघाचे मनोधैर्य या लढतीनंतर मात्र फार सकारात्मक बनले आहे. यापुढे आम्हाला प्रतिस्पर्धी पुणे असो किंवा बेंगळुरू, प्रत्येक सामना जिंकावा लागेल.

या कामगिरीतून आत्मविश्वास उंचावून अनुकूल कामगिरी करण्याची जबाबदारी ब्लास्टर्सवर आहे. पुण्याविरुद्ध तीन गुण जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. निकोला क्रॅमरेविच आणि केझीरॉन किझीटो हे खेळाडू मात्र निवडीसाठी उपलब्ध नसतील. जेम्स यांना स्लावीसा स्टोयानोविच आणि सैमीनलेन डुंगल यांच्याकडून गोलची अपेक्षा असेल. पुण्याविरुद्ध 21 गोल झाले असून ही जोडी त्यांच्या ढिसाळ बचावाचा फायदा उठवेल असे त्यांना वाटत असेल. ब्लास्टर्सच्या जमेचा आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांचे पुण्याविरुद्धचे रेकॉर्ड उत्तम आहे. त्यांना नऊ सामन्यांत एकच पराभव पत्करावा लागला आहे.

पुण्याचे हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांनी सांगितले की, आम्हाला परदेशी खेळाडूंकडून अपेक्षा आहेत, जे आतापर्यंत सातत्य राखू शकलेले नाहीत. मार्सेलिनीयो, दिएगो कार्लोस, मार्को स्टॅन्कोविच या तिघांना मिळून केवळ चार गोल करता आले आहेत. त्यांना लय अशी गवसलेलीच नाही. भारतीय खेळाडूंमध्ये सुद्धा केवळ आशिक कुरुनियन यालाच गोल करता आला आहे.

पुण्याची बाद फेरी गाठण्याची संधी जवळपास संपुष्टात आली असली तरी रेड़्डी यांचा गुणतक्त्यात अधिकाधिक वरचे स्थान मिळविण्याचा प्रयत्न राहील. ते म्हणाले की, आतापर्यंतचा प्रत्येक सामना जिंकू किंवा मरू असा ठरला आहे. तीन गुण मिळाल्यास तुम्ही वरचे स्थान गाठू शकता. आम्हाला हा सामना गमावून चालणार नाही. त्यानंतर आम्हाला गोव्याविरुद्धच्या लढतीसाठी तयारी करण्यास फारसा वेळ नाही. बाद फेरीच्या संधीचे चित्र कसेही असले तरी आम्हाला शक्य तेवढे वरचे स्थान मिळवायचे आहे. पुढील सामन्यांत आम्ही जे काही करू त्यामुळे आम्हाला पुढील मोसमासाठी फायदा होईल.

आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक गोल केलेला ह्युम सुरवातीपासून खेळण्याची शक्यता आहे. याचे कारण दिएगो कार्लोस हा संघाबरोबर येथे आलेला नाही. लेस्टर सिटीचा माजी खेळाडू ह्यूम हा ब्लास्टर्सविरुद्ध क्षमता सिद्ध करण्यास प्रयत्नशील असेल. याचे कारण गेल्या मोसमात तीव्र दुखापत झाल्यामुळे त्याचा करार वाढवायचा नाही असा निर्णय ब्लास्टर्सने घेतला होता.

या सर्व मुद्यांमुळे कोचीतील मुकाबला तीव्र चुरशीचा ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: सर्वोत्तम कामगिरीसह मुंबईची दुसऱ्या क्रमांकावर झेप

चेतेश्वर पुजारा-राहुल द्रविड बाबतीत घडला बाप योगायोग!

आयपीएल चाहत्यांना मोठा धक्का, २०१९च्या आयपीएलमध्ये दिसणार नाही ही ऑस्ट्रेलियाची स्फोटक जोडी