ISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट

जमशेदपूर। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गतमोसमात गोल्डन बूट पटकावलेला स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्या गैरहजेरीत एफसी गोवा संघाची आज (१ नोव्हेंबर) दुर्दशा झाली. जमशेदपूर एफसीविरुद्ध गोव्याला १-४ अशा निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलातील लढतीत गोव्याला एकमेव गोल करता आला.

कोरो नसल्यामुळे त्यांच्या आक्रमणातील भेदकताच नव्हे तर एकूणच जान निघून गेली. तमिळनाडूच्या मायकेल सुसैराज याने दोन गोल करीत जमशेदपूरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ब्राझीलचा मेमो आणि युवा भारतीय सुमित पासी यांनी स्थानिक संघाच्या विजयात योगदान दिले. या दोघांनी अंतिम टप्यात एका मिनिटाच्या अंतराने गोल केले. त्यामुळे २२ हजार ७५१ प्रेक्षकांना जल्लोषाची पर्वणी मिळाली. गोव्याचा एकमेव गोल सेनेगलच्या मुर्तदा फॉल याने केला.

पुणे सिटीविरुद्ध कोरोला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो या लढतीसाठी निलंबीत होता. त्याची उणीव गोव्याला चांगलीच भासली. जमशेदपूरने सहा सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून चार बरोबरींसह अपराजित मालिका कायम राखली. त्यांचे दहा गुण झाले.

गोव्याची अपराजित मालिका संपुष्टात आली. पाच सामन्यांत तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण कायम राहिले. त्यांचा गोलफरक (१५-९, ६) असा आहे. जमशेदपूरने (१२-७, ५ अशा गोलफरकासह बेंगळूरू एफसीला (८-३, ५) मागे टाकत तिसरे स्थान गाठले. बेंगळूरूचे चारच सामने झाले आहेत. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी पाच सामन्यांतून ११ गुणांसह आघाडीवर आहे.

१७व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला. सर्जिओ सिदोंचा याने छान चेंडू मारला. मेमोने हेडिंगवर प्रतिक चौधरीकडे चेंडू सोपविला. मग प्रतिकने मायकेलला डावीकडे अलगद पास दिला. तोपर्यंत गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ चकला आणि मायकेलने चेंडू नेटमध्ये मारला. गोव्याने ३३व्या मिनिटाला बरोबरी साधली. फ्री किकवर चेंडू मिळताच एदू बेदियाने हेडींग केले. मुर्तदाने पुढे झेपावत अचूक हेडिंग करीत जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या बाजूने चेंडू नेटमध्ये मारला.

दुसऱ्या सत्रात प्रारंभीच मायकेलने लक्ष्य साधले. सिदोंचा याने डावीकडून चेंडू दिला. त्याची चाल गोव्याचा सेरीटॉन फर्नांडीस रोखू शकला नाही. मायकेलने अचूक टायमिंग साधत गोल केला आणि मग स्थानिक चाहत्यांच्या दिशेने धावत उत्स्फूर्त जल्लोष केला.

गोव्यासारख्या संघाविरुद्ध कितीही गोलांची आघाडी असली तरी विसंबून राहणे महागात पडू शकते. यामुळे जमशेदपूरने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. ७७व्या मिनिटाला कार्लोस कॅल्वोने कॉर्नर किक घेतली. टिरीने मारलेला चेंडू ब्लॉक झाला, पण मेमोने संधी साधत चपळाई दाखविली. पुढच्याच मिनिटाला सिदोंचाने घोडदौड केली व कॅल्वोला पास दिला. नवाझला आधीच हालचाल करणे भोवले. त्यामुळे पासीने चेंडू अलगद नेटमध्ये मारला.

घरच्या मैदानावर आक्रमक प्रारंभ करणे गरजेचे असल्यामुळे जमशेदपूरने तसाच खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी प्रयत्न केला. मारीओ आर्क्वेसने आगेकूच करीत गौरव मुखीला पास दिला. गौरवने थोडी जास्त ताकद लावून मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने अडविला. दोन मिनिटांनी जमशेदपूरला फ्री किक मिळाली. सर्जिओ सिदोंचा याने प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीला चकवून चेंडू मारला, पण नवाझने चपळाईने डावीकडे झेप घेत चेंडू अडविला.

गोव्याची पहिली चाल ह्युगो बौमौसने सातव्या मिनिटाला डावीकडून रचली, पण टिरीने अनुभव आणि कौशल्यपणास लावत त्याला थोपविले. दोन मिनिटांनी गौरवने गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडिसला चकवून डावीकडून आगेकूच केली. त्याने टाचेने फटका मारला, पण त्याला पुरेशी संधी नव्हती. आधी अंदाज घेऊन तो जवळील सहकाऱ्याला पास देत आणखी चांगला प्रयत्न करू शकला असता.

१४व्या मिनिटाला जमशेदपूरच्या पाब्ला मॉर्गाडोने उजवीकडून चाल रचत गौरवला पास दिला, पण मुर्तदाने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. याचवेळी मिनिटाला मेमोने मॉर्गाडोला डावीकडून पास दिल्यानंतर पुन्हा मुर्तदाने गोव्याचे क्षेत्र सुरक्षित राखले. गोव्यासाठी पूर्वार्धात आणि उत्तरार्धात भेदक चाली रचणे शक्य झाले नाही. कोरोची गैरहजेरी त्यांना चांगलीच जाणवली.

महत्त्वाच्या बातम्या:

तूम्ही जर रोहित फॅन असला तर ही आहे तुमच्यासाठी खास आकडेवारी

धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती