ISL 2018: जमशेदपूर एफसीकडून एटीके पुन्हा पराभूत

कोलकाता । हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात गतविजेत्या एटीकेची अधोगती रविवारी कायम राहिली. येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर जमशेदपूर एफसीने एटीकेला एकमेव गोलने हरविले. 66व्या मिनिटाला त्रिंदादे गोन्साल्वीस याने पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला. एटीकेसाठी दोन्ही सत्रांत संधी दवडवणे निराशाजनक ठरले. पुर्वार्धात जमशेदपूरचा गोल ऑफसाईड ठरूनही एटीकेला खेळ उंचावता आला नाही.

64व्या मिनिटाला एटीकेच्या मध्य फळीतील खेळाडू हितेश शर्मा याने त्रिंदादेला पाडले. त्यामुळे जमशेदपूरला पेनल्टी बहाल करण्यात आली. त्यावर त्रिंदादेने एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याचा अंदाज चुकवित एकाग्रतेने लक्ष्य साधले.

जमशेदपूरने 13 सामन्यांत पाचवा विजय मिळविला. चार बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. जमशेदपूरचे 19 गुण झाले. रविवारी सायंकाळी मुंबई सिटी एफसीने एफसी गोवा संघाला हरवून पाचवे स्थान मिळविले होते, पण ते जास्त वेळ टिकले नाही. जमशेदपूरने पाचवा क्रमांक गाठला. मुंबईची सहाव्या, तर केरळा ब्लास्टर्सची सातव्या क्रमांकावर घसरण झाली. मुंबई व ब्लास्टर्स यांचे प्रत्येकी 17 गुण आहेत. एटीकेला सहावा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व तीन बरोबरींसह 12 गुण मिळवून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.

71व्या मिनिटाला एटीकेला चांगली संधी मिळाली होती. फ्री-किकवर डेव्हिड कॉटेरील याने खेळाडूंच्या भिंतीवरून मारलेला चेंडू मारला अचूकतेअभावी नेटमध्ये गेला नाही. 82व्या मिनिटाला कॉटेरीलने दिलेल्या चेंडूवर मार्टिन पॅटरसन याने केलेले हेडिंग चुकले.

दोन्ही संघांनी सुरवात सावध केली. पहिल्या आठ मिनिटांत कोणताही संघ संधी निर्माण करू शकला नाही. त्यानंतर जमशेदपूरचे प्रयत्न सुरु झाले. 12व्या मिनिटाला त्रिंदादेने बॉक्सच्या बाहेरून मारलेला फटका थोडक्यात हुकला. 18व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला. त्यावर बिकाश जैरूने इझु अझुका याच्या दिशेने चेंडू मारला, पण अझुका हेडींगला अचूकतेची जोड देऊ शकला नाही. 25व्या मिनिटाला जेरी माहमिंगथांगा याने काही अंतरावरून फटका मारला, पण तो नेटवरून गेला.

एटीकेच्या पहिल्या बऱ्या प्रयत्नाची नोंद 28व्या मिनिटाला झाली. जयेश राणेने बॉक्सच्या बाहेरून चेंडू मारला. नेटच्या दिशेने फटका गेला तरी तो कमकुवत असल्यामुळे जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल सहज बचाव करू शकला. 30व्या मिनिटाला जमशेदपूरने आणखी एक प्रयत्न केला. बिकाशच्या पासवर अझुकाने मारलेला चेंडू थोडक्यात बाहेर गेला. 40व्या मिनिटाला कॉर्नरवर डेव्हिड कॉटेरीलने चेंडू मारल्यानंतर एटीकेच्या मार्टिन पॅटरसनने धुर्तपणे आगेकूच केली, पण अनुभवी सुब्रतने चोख बचाव केला.

45व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोल ऑफसाईड ठरविण्यात आला. वेलिंग्टन प्रिओरीने मारलेला चेंडू एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याने थोपविला, पण रिबाऊंडवर अझुकाने चेंडू नेटमध्ये मारला. त्याचवेळी ऑफसाईडचा इशारा झाला. रिप्लेमध्ये हा निर्णय अगदी गुंतागुंतीचा होता असे दिसून आले, जे एटीकेच्या फायद्याचे ठरले. पुर्वार्धात गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

निकाल ।
एटीके । 0 पराभूत विरुद्ध जमशेदपूर एफसी । 1 (त्रिंदादे गोन्साल्वीस 66-पेनल्टी)