ISL 2018: आघाडी घेऊनही पेनल्टी दवडत पुण्याची ब्लास्टर्सशी अखेर बरोबरी

पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी पुणे सिटीची विजयाची प्रतिक्षा आणखी लांबली. केरला ब्लास्टर्स विरुद्ध श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सामन्यात शुक्रवारी आघाडी घेऊनही पेनल्टी दवडल्यानंतर पुण्याला अखेर बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पुण्याने 13व्या मिनिटालाच ऑस्ट्रीयाचा मार्को स्टॅन्कोविच याच्या गोलमुळे मिळालेली आघाडी मध्यंतरास टिकविली होती, पण दुसरे सत्र त्यांच्यासाठी धक्कादायक ठरले. कर्णधार एमिलीयानो अल्फारो याने पेनल्टी दवडली. त्याला ज्याने ढकलले त्या सर्बियाच्या निकोला क्रॅमरेविच यानेच ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली.

पुण्याने पाच सामन्यांत दुसरी बरोबरी साधली असून त्यांना तीन पराभव पत्करावे लागले आहेत. दोन गुणांसह त्यांनी तळातील स्थान एक क्रमांक वर नेत गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला मागे टाकले. चेन्नईयीन आता पाच सामन्यांत एक बरोबरी व चार पराभवांमुळे  एका गुणासह तळाच्या स्थानावर गेला आहे.

ब्लास्टर्सने दोन क्रमांक प्रगती करताना एटीके व मुंबई सिटी एफसी यांना मागे टाकले. या तिन्ही संघांचे प्रत्येकी सात गुण आहेत, पण ब्लास्टर्सचा गोलफरक (7-5, 2) हा एटीके (6-8, उणे 2) व मुंबई (5-8, उणे 3) यांच्यापेक्षा सरस ठरला. ब्लास्टर्सला पाच सामन्यांत चौथी बरोबरी पत्करावी लागली. त्यांनी एक विजय मिळविला आहे. ब्लास्टर्स अद्याप अपराजित आहे.

ब्लास्टर्सचा चालींचा धडाका ओसरल्यानंतर पुण्याने प्रतिआक्रमण रचले. 13व्या मिनिटाला पुण्याने खाते उघडण्याची शर्यत जिंकली. सुमारे 25 यार्ड अंतरावरून मार्को स्टॅन्कोविच याने अफलातून फटका मारत गोल केला. पुण्याने मध्यंतरास एका गोलची ही आघाडी टिकविली होती.

दुसऱ्या सत्रात 56व्या मिनिटाला क्रॅमरेविच याने अल्फारोला ढकलून दिले. त्यामुळे पंच ओमप्रकाश ठाकूर यांनी पुण्याला पेनल्टी बहाल केली. त्यांचा हा निर्णय कठोर असल्याचे रिप्लेवरून दिसून आले, पण ब्लास्टर्स खेळाडूंच्या जाहीर नाराजीचा फायदा झाला नाही. अल्फारो पेनल्टी घेण्यासाठी सज्ज झाला, पण उजव्या कोपऱ्यात फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने मारलेला चेंडू बारला लागून बाहेर गेला.

ब्लास्टर्सला चार मिनिटांनी दैवाची पुन्हा साथ लाभली. डावीकडे मिळालेला कॉर्नर स्लावीस्ला स्टोयानोविच याने घेतला. चेंडू पुणे सिटीच्या गुरतेज सिंग याच्यापाशी पडला, पण त्याला तो ब्लॉक करता आला नाही आणि चेंडू क्रॅमरेविच याच्याकडे गेला. क्रॅमेरिवचने मग ताकदवान फटका मारत पुणे सिटीचा गोलरक्षक कमलजीत सिंग याला चकविले.

त्याआधी गुरतेजकडून स्वयंगोल होता होता थोडक्यात टळला होता. पाच मिनीटे बाकी असताना अल्फारोने बॉक्सजवळून मारलेला चेंडू नवीनने डावीकडे झेपावत थोपविला. चेंडू बाहेर गेल्याने पुण्याला कॉर्नर मिळाला, पण तो वाया गेला. त्यानंतर आदिल खान याचाही एक प्रयत्न फोल ठरला.

ब्लास्टर्सने नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरवात केली होती. दुसऱ्याच मिनिटाला ब्लास्टर्सने प्रयत्न केला, पण सी. के. विनीतचा कमकुवत क्रॉस पुण्याच्या बचाव फळीने रोखला. गोलच्या दिशेने पहिला प्रयत्न ब्लास्टर्सनेच केला. यात विनीतचाच वाटा होता. तिसऱ्या मिनिटाला त्याने उजवीकडून चाल रचली, पण यावेळी पुरेशी ताकद नसल्यामुळे त्याचा फटका पुण्याचा गोलरक्षक कमलजीत सिंग याने सहज रोखला.

चौथ्या मिनिटाला ब्लास्टर्सच्या सैमीनलेन डुंगलने विनीतला उजवीकडे पास दिला, पण विनीतचा फटका स्वैर होता. आठव्या मिनिटाला स्लावीस्ला स्टोयानोविच आणि मॅटेज पॉप्लॅटनिक यांनी एकमेकांच्या साथीत आगेकूच केली, पण स्लावीस्ला याचा फटका रोखण्यासाठी कमलजीत पुढे सरसावतच ऑफसाईडचा इशारा झाला. दहाव्या मिनिटाला साहल अब्दुल समाद याने वितीनला पास दिला, पण विनीतने मारलेला फटका कमलजीतने कसाबसा रोखला.

पुण्याने खाते उघडल्यानंतर काही चांगले प्रयत्न केले. 16व्या मिनिटाला मार्सेलिनीयोने बॉक्समध्ये घोडदौड केली, पण त्याने अकारण जास्त जोर लावल्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमारला फटका रोखणे जमले. 20व्या मिनिटाला एमिलीयानो अल्फारो याला मार्को स्टॅन्कोविच याने घेतलेल्या कॉर्नरवर हेडिंगची संधी होती, पण तो अचूकता साधू शकला नाही. 26व्या मिनिटाला सिरील कॅली याने डावीकडून निकोला क्रॅमरेविच याला पास दिला. निकोलाचे हेडिंग कमलजीतने रोखले.

महत्त्वाच्या बातम्या:

जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाची कमाल, घेतल्या ४ चेंडूत ४ विकेट्स

Video: जेव्हा धोनीच्या मस्करीमुळे घाबरतो ‘हिटमॅन’ रोहित शर्मा