ISL 2018: मार्सेलिनीयोच्या गोलमुळे पुण्याचा ब्लास्टर्सला धक्का

कोची | हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी पुणे सिटीने येथील नेहरू स्टेडियमवर आज (7 डिसेंबर) केरळा ब्लास्टर्स एफसीला 1-0 असे हरविले. पुर्वार्धात मार्सेलिनीयो याने केलेला गोल निर्णायक ठरला. ब्लास्टर्सला पहिला सामना जिंकल्यानंतर बरोबरींची मालिका खंडित करता येत नव्हती. त्यातच त्यांना पराभूत व्हावे लागले. घरच्या मैदानावर जमलेल्या सुमारे नऊ हजार प्रेक्षकांची यजमान संघाने अखेर निराशा केली.

पुणे सिटीने 11 सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून दोन बरोबरी आणि सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण झाले आहेत. त्यांनी एक क्रमांक प्रगती करताना आठवे स्थान गाठताना चेन्नईयीनला (11 सामन्यांतून 5) मागे टाकले. ब्लास्टर्सचे सातवे स्थान कायम राहिले. 11 सामन्यांत त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला असून एक विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 9 गुण कायम राहिले.

बेंगळुरू एफसी 9 सामन्यांत अपराजित राहात 23 गुणांसह आाघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसीने (10 सामन्यांतून 20) दुसऱ्या, नॉर्थइस्ट युनायटेड एफसी (10 सामन्यांतून 19) तिसऱ्या, एफसी गोवा (9 सामन्यांतून 17) चौथ्या क्रमांकावर आहे.

सकारात्मक खेळाचे फळ पुणे सिटीला 20व्या मिनिटाला मिळाले. डावीकडून प्रतिभाशाली आशिक कुरुनीयन याने चाल रचली. त्याने रिव्हर्स चेंडू देताच मार्सेलिनीयोने डाव्या पायाने जोरदार फटका मारला. हा चेंडू अनास एडाथोडीका याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला. चेंडू थोडा उडाल्यामुळे ब्लास्टर्सचा गोलरक्षक धीरज सिंग चकला.

सामन्याची सुरवात चांगली झाली. पाचव्या मिनिटाला पुण्याच्या साहिल पन्वर याने मध्य क्षेत्रात डावीकडून आगेकूच केली, पण सैमीनलेन डुंगल याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने दोन बचावपटूंना चकविले आमि उजव्या पायाने फटका मारला, पण पुण्याच्या मॅट मिल्सने चेंडू ब्लॉक केला.

सातव्या मिनिटाला पुण्याने चांगली संधी घालविली. मार्सेलिनीयोला केवळ धीरजला चकवायते होते. धीरज पुढे सरसावल्यामुळे चेंडू मारण्याचा वाव कमी झाला. त्यातून मार्सेलिनीयोला सफाईने फटका मारता आला नाही. त्यामुळे धीरज चेंडू सहज अडवू शकला.

पुढच्याच मिनिटाला स्लाविसा स्टोयानोविच याने आगेकूच केली. डावीकडून करेज पेकुसन याने त्याला पास दिला होता, पण स्टोयानोविच याने मैदानालगत मारलेला फटका स्वैर होता. अर्ध्या तासाच्या सुमारास स्टोयानोविच यानेच उजवीकडे मिळालेली संधी अशीच दवडली.

ब्लास्टर्सच्या संदेश झिंगन याला 39व्या मिनिटाला संधी होती. त्याने उजवीकडून क्रॉस पास देताच डुंगलने हेडिंग केले, पण हा फटका स्वैर होता.

दुसऱ्या सत्रात 46व्या मिनिटाला हालीचरण नर्झारी याने स्टोयानोविचला मैदानालगत पास दिला. त्यावेळी बॉक्समध्ये असूनही स्टोयानोविचने मारलेला फटका थेट पुण्याचा गोलरक्षक कमलजीत सिंग याच्या हातात गेला. तीन मिनिटांनी पेकुसन याने चेंडूवर ताबा मिळविला. त्याने उजवीकडे स्टोयानोविचला पास दिला. त्याने चाल रचण्याचा प्रयत्न केला, पण जवळपास सहकारी नव्हता. स्टोयानोविचनेच मग 59व्या मिनिटाला मारलेला फटका नेटच्या उजव्या बाजूने बाहेर गेला.

महत्त्वाच्या बातम्या:

पुजाराने शतकी खेळी केली अॅडलेडमध्ये, चर्चा झाली कोलकाता पोलिसांत

ती खास बॅट वापरुनही मुंबईकर अजिंक्य रहाणे ठरला दुर्दैवी

हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय