ISL 2018: गतवर्षीच्या अंतिम सामन्याची यंदा प्रारंभीच आवृत्ती

बेंगळुरू: हिरो इंडियन सुपर लीगच्या यंदाच्या मोसमातील पहिल्या सुपर संडेला गतवर्षी अंतिम फेरीत झुंजलेले बेंगळुरू एफसी आणि चेन्नईयीन एफसी हे संघ आमनेसामने येत आहेत. येथील कांतिरवा स्टेडियमवर या लढतीची आवृत्ती मोसमाच्या प्रारंभीच होईल. त्यासाठी दोन्ही संघ पुन्हा एकदा चुरशीने खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या आयएसएल मोसमात बेंगळुरू आणि चेन्नईयीन हे दोन सर्वोत्तम संघ होते. त्यांचे काही सामने उत्कंठावर्धक झाले. कांतिरवा स्टेडियमवर जेव्हा मुकाबला झाला तेव्हा चेन्नईयीनची सरशी झाली, ज्यात अंतिम फेरीचाही समावेश होता.

चेन्नईयीन एफसीचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांनी सांगितले की, चेन्नईयीन विरुद्ध बेंगळुरू यांच्यातील चुरशीचा अनुभव मला मागच्याच मोसमात आला. बेंगळुरूविरुद्ध तिन्ही सामन्यांत संघर्षपूर्ण खेळ झाला. गेल्या वर्षी त्यांच्याकडे अप्रतिम संघ होता. यंदा सुद्धा यात फरक नसेल. हा सामना फार खडतर असेल.

ग्रेगरी मागच्या मोसमात होता तोच संघ घेऊन बेंगळुरूला आले आहेत. यात मध्यरक्षक धनपाल गणेश याचा अपवाद आहे. त्याला दुखापत झाली असून काही काळ विश्रांती घ्यावी लागेल.

ग्रेगरी यांनी सांगितले की, आम्हाला गणेशची उणीव स्वाभाविकच जाणवेल, पण इतर खेळाडूंना संघात स्थान मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. बारा महिन्यांपूर्वी गणेशला सुद्धा राखीव खेळाडूंच्या बेंचवर बसावे लागले होते.

संधी मिळताच त्याने फायदा उठविला. आता सुद्धा इतरांसाठी अशी संधी चालून आली आहे. गणेशचा एकूण दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्त्व पाहता त्याची उणीव बरीच जाणवेल. गेल्या मोसमात त्याने आमच्यासाठी महत्त्वाचे गोल केले होते.

दुसरीकडे बेंगळुरू एफसीला नवे प्रशिक्षक लाभले आहेत. अल्बर्ट रोका यांनी करार वाढविला नाही. त्यांनी सहाय्यक कार्लेस कुआद्रात यांच्याकडे सूत्रे सोपविली. मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्लेस यांची ही पहिलीच मोहीम आहे. स्पेनचे कार्लेस शक्‍य तेवढी सर्वोत्तम सुरवात व्हावी म्हणून प्रयत्नशील राहतील.

बेंगळुरूने मागील मोसमात साखळी टप्यात वर्चस्व राखले. चेन्नईयीनपेक्षा ते आठ गुणांनी आघाडीवर राहिले. यात त्यांचा वेगवान प्रारंभ मोलाचा ठरला होता. पहिल्या पाच पैकी चार सामन्यांत त्यांनी विजय मिळविला होता.

कार्लेस यांना यावेळी आपला संघ अशीच सुरवात करेल अशी आशा असेल. गतविजेत्या संघाविरुद्ध लढत असल्यामुळे ते दबून जाणार नाहीत. त्यांनी सांगितले की, कुणाविरुद्ध तरी आम्हाला मोसमाची सुरवात करावीच लागणार आहे आणि हा संघ चेन्नईयीन असला तर असूदेत. दरवेळी मैदानावर उतरून सर्वोत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे असते. प्रतिस्पर्धी कोण आहे हे महत्त्वाचे नसते. आम्ही जे काही चांगले करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करतो.

कार्लेस यांच्या संघात मध्यरक्षक झिस्को हर्नांडेझ, बचावपटू अल्बर्ट सेरान आणि विंगर चेंचो गील्टशेन गील्तशेन असे आंतरराष्ट्रीय खेळाडू असतील. विशेष म्हणजे गेल्या मोसमात हा संघ सेट-पिसवरील कुशल खेळामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. कार्लेस यांनी रोका यांना सेट-पीस रुटीन अचूक होण्यास मदत केली होती. त्यातून बेंगळुरूला आठ गोल मिळाले होते. दुसरीकडे चेन्नईयीनचे 50 टक्के गोल अशाच पद्धतीने झाले होते.

आता रविवारी हे दोन संघ आमनेसामने येतील तेव्हा चाहत्यांचा श्वास रोखला गेला असेल.