ISL 2018: दिल्लीचा बालेकिल्ला काबीज करण्याचा कोलकाता करणार प्रयत्न

दिल्ली हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या विजेत्या कोलकाता दी अॅटलेटिकोची सुरवात इतकी खराब कधीच झाली नव्हती. पाच मोसमांत यंदा प्रथमच त्यांना अद्याप गुणासह गोलचीही प्रतिक्षा आहे.

दोन वेळच्या विजेत्या कोलकाताचा दिल्ली डायनामोजविरुद्ध बुधवारी (17 ऑक्टबर) येथील नेहरू स्टेडियमवर सामना होणार आहे. तेव्हा त्यांचा यजमान संघाचा बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न राहील.

कोलकाताचे प्रशिक्षक स्टीव कॉपेल यांनी सांगितले की, “आम्ही मागील पराभवानंतर केवळ पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. मागील सामन्यात आम्ही विजयाची फारशी संधी गृहीत धरली नव्हती. याचे कारण आमच्या एका खेळाडूला 30 मिनिटांनी मैदान सोडावे लागले होते. सामना जिंकायचा असेल तर 11 खेळाडू विरुद्ध दहा खेळाडू घेऊन खेळणे नेहमीच चांगले नसते. या लढतीमुळे आम्हाला योग्य पाऊल टाकण्याची संधी मिळाली आहे. आम्ही आव्हानाला सामोरे जाण्यास आतूर आहोत.”

कोलकाताला सलामीला केरळा ब्लास्टर्सविरुद्ध 0-2 असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध आणखी एक हार पत्करावी लागली.

कॉपेल यांच्या कार्यपद्धतीशी जुळवून घेण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे. मॅन्युएल लँझरॉत आणि कालू उचे अशा करारबद्ध झालेल्या महत्त्वाच्या खेळाडूंना अद्याप छाप पाडता आलेली नाही. सलग दोन सामने घरच्या मैदानावर खेळावे लागल्यानंतर आता ही लढत बाहेरच्या मैदानावर (अवे) होणार आहे. त्यामुळे दडपण कमी होऊ शकेल.

आयएसएलमध्ये अलीकडे कोलकाता संघाला बाहेरील मैदानांवर फारसा लक्षवेधी खेळ करता आलेला नाही. मागील तीन सामन्यांत त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यातच घरच्या मैदानावर चांगले रेकॉर्ड असलेल्या प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दिल्लीने घरच्या मैदानावर सहा सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. यात सलग आठ गोलसह एकूण 15 गोल केले आहेत.

जोसेप गोम्बाऊ यांच्या संघाने पहिल्या सामन्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या. यावेळी त्यांनी 1-1 अशी बरोबरी साधली. दिल्लीच्या जिगरी संघाने उत्साहवर्धक खेळ करत अंतिम क्षणात गोल केला.

जोसेप यांनी सांगितले की, “पुणे सिटीविरुद्धच्या लढतीनंतर आम्हाला दोन आठवडे तयारीला मिळाले. या कालावधीत काही खेळाडू भारतीय संघाकडून खेळण्यासाठी गेले. ते उपलब्ध नव्हते, पण आता आम्ही सज्ज आहोत.”

दिल्लीला चेंडूवर बहुतांश ताबा राखण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे कोलकाता चिवट बचाव करून आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल.

जोसेप म्हणाले, “आमच्या संघाची घडी छान बसली आहे. कोलकाताचा संघ चांगला आहे. आम्हाला कसून प्रयत्न करावे लागतील. हा सामना फार चांगला होईल आणि आम्ही जिंकू.”

कालू उचे याच्याशिवाय लँझरॉत याच्याकडूनही कोलकाताला अपेक्षा असतील. कालू पूर्वी दिल्लीकडून खेळला. गेल्या मोसमात त्याने 13 गोल केले होते. लँझरॉत याच्यावरही आक्रमणाची मदार असेल. जियान्नी झुईवर्लून याच्या नेतृत्वाखालील बचाव फळी भेदण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.

दिल्लीला बराच वेग राखता येईल. लालियनझुला छांगटे आणि नंदकुमार यांची कोलकाताच्या बचाव फळीविरुद्ध कसोटी लागेल. राल्टे दुसऱ्या यलो कार्डमुळे निलंबीत झाला आहे. अशावेळी कॉपेल वेगवान विंगर्सविरुद्ध लेफ्ट-बॅक म्हणून कुणाला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

ही लढत डावपेचात्मक पातळीवर रंगेल. दोन वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा अवलंब करणाऱ्या प्रशिक्षकांचे डावपेच पणास लागतील. यात कुणाची सरशी होणार याची उत्कंठा शिगेला पोचली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

दोन विश्वचषक जिंकून देणारा गंभीरच्या रिटारमेंटची तेव्हाच…

ISL 2018: युवा खेळाडू ठरत आहेत लक्षवेधी

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष