ISL 2018: दिल्लीविरुद्ध जमशेदपूरला सावध राहण्याची गरज

जमशेदपूर| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएलएल) जमशेदपूरची आज (12 डिसेंबर) दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध लढत होणार आहे. या सामन्याला जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलामध्ये संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे.

जमशेदपूरला यंदा सात बरोबरी व केवळ तीन विजय अशी कामगिरी करता आली आहे. सर्वाधिक बरोबरी त्यांनी साधल्या आहेत. दुसरीकडे दिल्लीला एकही विजय मिळविता आलेला नाही. अशावेळी पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टिने जमशेदपूरसाठी या घडीला दिल्ली हा सर्वोत्तम प्रतिस्पर्धी असू शकतो. यानंतरही जमशेदपूरला सावध राहावे लागेल.

मागील लढतीत या दोन संघांमध्ये 2-2 अशी बरोबरी झाली होती. दिल्लीविरुद्ध हरून त्यांना पहिला विजय मिळवून देणारा संघ अशी ओळख निर्माण होऊ नये असाच सेझार फरांडो यांच्या संघाचा प्रयत्न राहील. त्यातही प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आल्या असल्या तरी अधिकाधिक वरचे स्थान मिळवून थोडी प्रतिष्ठा राखण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल.

जमशेदपूरसाठी चिंताजनक बाब म्हणजे गेल्या पाच सामन्यांत त्यांना केवळ एकच विजय मिळविता आला आहे. याशिवाय गेल्या दोन सामन्यांत त्यांना एकच गोल करता आला आहे. हा गोल सुद्धा केरळा ब्लास्टर्स एफसीविरुद्ध वादग्रस्त पेनल्टीमुळे झाला.

जमशेदपूरने अलिकडे काही संधी गमावल्या आहेत. त्यामुळे प्ले-ऑफमधील स्थान त्यांना गमवावे लागणार की जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलातील घरच्या मैदानावर जमशेदपूर मोहीम पुन्हा विजयी मार्गावर आणणार याची उत्सुकता आहे.

जमशेदपूरने यंदा सर्वाधिक गोलांच्या क्रमवारीत एफसी गोवानंतर दुसरा क्रमांक मिळविला आहे. गोव्याचे 22, तर जमशेदपूरचे 19 गोल आहेत. गेल्या काही सामन्यांत मात्र जमशेदपूरला गोलसाठी झगडावे लागले आहे. त्यातही बचाव फळीत टिरीवर प्रमाणाबाहेर अवलंबून राहिल्यामुळे त्यांना फटका बसला आहे. त्यामुळे सामन्यात महत्त्वाच्या क्षणी त्यांच्याविरुद्ध गोल होत आहेत.

जमशेदपूरचे सहाय्यक प्रशिक्षक गुलेर्मो फर्नांडेझ गोंझालेझ यांनी सांगितले की, दिल्लीचा संघ चांगला खेळ करतो.  त्यांच्याकडे आक्रमणाचे कौशल्य आहे. त्यांना सुद्धा जिंकायचे आहे. आम्हाला क्लीन शीट राखणे महत्त्वाचे असेल. त्या मार्गाने आम्हाला आक्रमण आणखी सफाईने करता येईल.

जमशेदपूरला दोन महत्त्वाच्या खेळाडूंना मुकावे लागेल. यात तडफदार आक्रमण करणारा मायकेल सुसैराज याला दुखापत झाली आहे, तर सर्जिओ सिदोंचा अद्याप तंदुरुस्त झालेला नाही.

गोंझालेझ पुढे म्हणाले की, आमचे काही खेळाडू जखमी आहेत. सर्जिओ नसणे हा मोठा धक्का आहे. आम्हाला कोणत्याही सबबी द्यायच्या नाहीत. आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा प्रयत्न करायचा आहे. साखळीच्या गुणतक्त्यात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी आम्हाला जिंकण्याची गरज आहे. मी संघाविषयी फार आनंदी आहे. आम्ही कसून सराव करीत आहोत.

जमशेदपूरसाठी गोल करण्याची धुरा स्टार स्ट्रायकर टीम कॅहील याला पेलावी लागेल. कार्लोस कॅल्वो आणि पाब्लो मॉर्गाडो यांची साथ त्याला मिळावी लागेल. कॅल्वोने यंदा सनसनाटी फॉर्म प्रदर्शित केला आहे. दिल्लीला त्याच्यावर लक्ष ठेवावे लागेल.

सुमीत पासीला मागील सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने दोन गोल नोंदविले आहेत.

दिल्लीसाठी सर्व लक्ष गोल करण्यावर असेल. यंदा त्यांना केवळ नऊ गोल करता आले आहेत, जे लिगमधील सर्वांत कमी प्रमाण आहे. त्यांचा बचाव सुद्धा विस्कळीत आहे.  त्यांच्याविरुद्ध 18 गोल झाले आहेत, जे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमाण आहे. त्यातील 15 गोल दुसऱ्या सत्रात झाले आहेत. यावरून हा संघ पूर्ण 90 मिनिटे लक्ष एकाग्र करू शकत नाही असे स्पष्ट होते.

दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांनी सांगितले की, आम्ही जिंकण्याची पुरेपूर आशा बाळगून येथे आलो आहोत. यामचा दृष्टिकोन चांगला आहे. आम्ही सामना चांगला ठरवू शकतो. आमची आकडेवारी खराब आहे, पण याचा अर्थ आम्ही प्रयत्न सोडून दिले आहेत असे नाही. आम्हाला बऱ्याच गोष्टींवर मेहनत घ्यावी लागेल. आम्ही शक्य तेवढे सामने जिंकायचा प्रयत्न करू, तसेच आम्ही तरुण खेळाडू घेऊन संघाची बांधणी करीत आहोत. त्यामुळे भविष्य आमच्यासाठी उज्ज्वल असेल.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 3 आणि हॉट स्टार वर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: एफसी गोवा संघाला पुणे सिटीचा धक्का

राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती खेळाडू झाली आमदार

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या रोहित शर्मालाच युवराजने खडसावले