ISL 2018: मुंबईशी हरल्याने नॉर्थइस्टची अपराजित मालिका संपुष्टात

गुवाहाटी:  हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात सनसनाटी सुरवात केलेल्या नॉर्थइस्ट युनायटेड एफसीची अपराजित मालिका शुक्रवारी संपुष्टात आली. मुंबई सिटी एफसीविरुद्ध येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर नॉर्थइस्टला एकमेव गोलने पराभूत व्हावे लागले. काँगोचा मध्यरक्षक अरनॉल्ड इसोको याने चौथ्याच मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.

मुंबईने सात सामन्यांत चौथा विजय मिळविला असून एक बरोबरी आणि दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण झाले. पाचवरून मुंबईने तिसरा क्रमांक गाठला. एफसी गोवा (6 सामने) व बेंगळुरू एफसी (5 सामने) यांचेही प्रत्येकी 13 गुण आहेत. यात गोलफरकानुसार गोवा (18-11, 7) पहिल्या, तर बेंगळुरू (10-4, 6) दुसऱ्या स्थानावर आहे. नॉर्थइस्टची दोन क्रमांक घसरण झाली. सहा सामन्यांत त्यांना पहिलाच पराभव पत्करावा लागला. तीन विजय व दोन बरोबरींसह त्यांचे 11 गुण कायम राहिले. नॉर्थइस्ट पाचव्या स्थानावर गेले.

मुंबईने सनसनाटी सुरवात केली. नाट्यमय परिस्थितीत त्यांचा गोल झाला. चौथ्या मिनिटाला त्यांना कॉर्नर मिळाला. शुभाशिष बोसने हेडिंगवर चेंडू इसोकोकडे सोपविला. इसोकोचा फटका ब्लॉक केला गेला आणि चेंडू मध्यरक्षक पाऊलो मॅचादो याच्यापाशी गेला. त्याचा क्रॉस पास पुन्हा इसोकोकडे गेला. चेंडू त्याला लागून नेटच्या दिशेने गेला. त्यावेळी नॉर्थइस्टला गोलरक्षक पवन कुमारने चेंडू रेषेबाहेर अडविल्याचा दावा केला. पंचांनाही सुरवातीला तसेच वाटले होते, पण लाईनमनशी चर्चा करून त्यांनी गोल दिला.

दहा मिनिटे बाकी असताना नॉर्थइस्टच्या रिगन सिंगने उजवीकडून चाल रचत चेंडू बॉक्समध्ये मारला ओगबेचने उडी घेत चेंडू छातीवर नियंत्रीत करून ताबा मिळविला. तो आगेकूच करू लागताच मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग पुढे सरसावला आणि चेंडू पंच केला. हा चेंडू थेट रॉलीन बोर्जेसकडे गेला, पण त्याने मारलेला ताकदवान फटका गोलपोस्टवरून गेला.

पहिला प्रयत्न दुसऱ्या मिनिटाला नॉर्थइस्टने केला. फ्री किकवर बार्थोलम्यू ओगबेचे याने मारलेला फटका मात्र अचूक नव्हता. नवव्या मिनिटाला नॉर्थइस्टच्या जुआन मॅस्कीया याला मुंबईच्या ल्युचीयन गोऐन याने पाडले. त्यामुळे ल्युचीयनला यलो कार्डला सामोरे जावे लागले. 15व्या मिनिटाला मुंबईच्या सेहनाज सिंगला याच कारणामुळे यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने फेडेरीको गॅलेगोला मध्य क्षेत्रात पाडले.

17व्या मिनिटाला रिगन सिंगच्या चालीवर ओगबेचेने हेडिंग केले, पण काहीसा वरून आलेला चेंडू मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंग याने उजवीकडे जात अडविला. 23व्या मिनिटाला ओगबेचे याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. रेडीम ट्लांग  याच्या पासवर ओगबेचेने मारलेल्या फटक्याचा अमरींदरला अंदाज आला नाही, पण चेंडू सुदैवाने नेटच्या कडेने बाहेर गेला. तीन मिनिटांनी रिगन सिंग याने उजवीकडून दिलेल्या क्रॉस पासवर मॅस्कीयाचे हेडिंग अचूक झाले नाही. 35व्या मिनिटाला मॅस्कीयाने घेतलेली फ्री किकही अशीच वाया गेली.

दुसऱ्या सत्रात 48व्या मिनिटाला ओगबेचेने डावीकडून आगेकूच केली. त्याने मॅस्कीयाच्या दिशेने चेंडू मारला, पण मुंबईच्या शुभाशिषने चेंडू पायाने अडवून बाहेर घालविला. दोन मिनिटांनी सेहनाजने नॉर्थइस्टच्या बचाव फळीवरून मारलेला चेंडू मोडोऊ सौगौ याने गोलरक्षकाला चकविण्याच्या प्रयत्नात क्रॉसबारवरून मारला. 55व्या मिनिटाला मॅस्कीयाने दिलेल्या पासवर गॅलेगोने मारलेला चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला.