ISL 2018: पेनल्टी, स्वयंगोलसह दिल्ली मुंबईकडून गारद

दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (3डिसेंबर) दिल्ली डायनॅमोजला मध्यंतरास एका गोलच्या आघाडीनंतरही मुंबई सिटी एफसीविरुद्ध 2-4 असे गारद व्हावे लागले. मुंबईचे सर्व चार गोल दुसऱ्या सत्रात झाले. पेनल्टी, स्वयंगोलमुळे आघाडी मिळालेल्या मुंबईने दमदार विजय नोंदवित गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर झेप घेतली.

नेहरू स्टेडियमवर लालियनझुला छांगटेने तिसऱ्याच मिनिटाला दिल्लीचे खाते उघडले होते. दुसऱ्या सत्रात तब्बल पाच गोलांचा पाऊस पडला. यात मुंबईच्या रफाएल बॅस्तोसने पेनल्टीवर बरोबरी साधली. त्यानंतर दिल्लीच्या मार्टी क्रेस्पीकडून स्वयंगोल झाला. जियान्नी झुईवर्लून याने दिल्लीला बरोबरी साधून दिली होती. मग मुंबईकडून रेनीयर फर्नांडिस आणि कर्णधार पाऊलो मॅचादो यांनी गोल केले आणि निर्णायक विजयास साजेसा खेळ प्रदर्शित केला.

मुंबईने नऊ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून दोन बरोबरी व दोन पराभवांसह त्यांचे 17 गुण झाले. मुंबईने जमशेदपूर एफसी (10 सामन्यांतून 15) व एटीके (10 सामन्यांतून 15) यांना मागे टाकले. त्यामुळे सहा वरून त्यांना दोन क्रमांक प्रगती करता आली. एफसी गोवा संघाचेही 17 गुण आहेत, पण गोव्याचा 8 (22-14) गोलफरक मुंबईच्या एकापेक्षा (11-10) सरस आहे. बेंगळुरू एफसी 22 गुणांसह आघाडीवर असून नॉर्थइस्ट युनायटेड एफसी 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दिल्लीची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम राहिली. 10 सामन्यांत त्यांना सहावा पराभव पत्करावा लागला. चार बरोबरीच्या चार गुणांसह त्यांचा तळात दहावा क्रमांक आहे.

दिल्लीचे खाते नाट्यमय पद्धतीने उघडले. तिसऱ्या मिनिटाला मार्कोस टेबारने चेंडूवर ताबा मिळवित बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने डावीकडील छांगटेला पास दिला. छांगटेला पुरेशी संधी असूनही त्याने कुणी सहकारी दिसतो का हे हेरण्याचा प्रयत्न केला. अखेरीस त्याने मारलेला चेंडू सौविक चक्रवर्तीला लागून नेटमध्ये गेला. त्यावेळी मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंग चेंडू नेटमध्ये जाताना पाहण्याखेरीज काहीही करू शकला नाही.

मुंबईने उत्तरार्धाची सुरवात सकरात्मक केली. 47व्या मिनिटाला रफाएल बॅस्तोसने मोडोऊ सौगौ याला पास दिला. मोडोऊ याने नेटच्या दिशेने फटका मारला, पण दिल्लीचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने डावीकडे झेप टाकत चेंडू अडविला. मुंबईला पुढच्याच मिनिटाला दैवाची साथ लाभली. बॉक्समध्ये दिल्लीच्या प्रीतम कोटल याने चेंडू हाताळला. हे पंच रक्तीम साहा यांनी पाहिले. त्यांनी मुंबईला तातडीने पेनल्टी बहाल केली. त्यावर बॅस्तोसने नेटच्या उजव्या कोपऱ्यात वरील बाजूला चेंडू अचूक मारला. त्यावेळी गोम्स निरुत्तर झाला.

मुंबईला पेनल्टीनंतर स्वयंगोलचा लाभ झाला. छोट्या पासेसनंतर बॅस्तोसकडे चेंडू आला. त्याने मारलेला चेंडू मार्टी क्रेस्पीच्या डोक्याला लागून हवेत गेला. त्यावेळी गोम्स गोंधळात पडला. त्याला काही कळायच्या आत चेंडू वरून नेटमध्ये गेला व क्रेस्पीच्या नावावरील स्वयंगोल मुंबईच्या खात्यात जमा झाला.

तीन मिनिटांत दिल्लीने पिछाडी कमी केली. रेने मिहेलिच याने घेतलेल्या फ्री किकवर जियान्नी झुईवर्लून याने हेडींगवर चेंडू नेटच्या कोपऱ्यात मारत दमदार गोल केला. बरोबरीमुळे कमालीची चुरस निर्माण झाली होती. त्याचवेळी मुंबईने आक्रमण केले. बॅस्तोसने चाल रचत पाऊलो मॅचादोला डावीकडे पास दिला. मॅचादोने रेनीयर फर्नांडीस याच्याकडे चेंडू सोपविला. रेनीयरने मग पहिल्या प्रयत्नात नेटच्या डाव्या कोपऱ्यात मारत सुंदर गोल केला.

दहा मिनिटे बाकी असताना मुंबईने चौथा गोल केला. अरनॉल्ड इसोकोने उजवीकडून चाल रचली. त्याने मॅचादोला पास दिला. मग मॅचादोने उरलेले काम चोखपणे पार पाडत लक्ष्य साधले.

वास्तविक दिल्लीने सुरवात चांगली केली होती. दिल्लीने खाते उघडल्यानंतर वेगवान खेळ करीत पुर्वार्धात मुंबईवर आणखी दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. सहाव्या मिनिटाला नंदकुमार शेखरने आगेकूच करीत थेट नेटच्या दिशेने फटका मारत उल्लेखनीय प्रयत्न केला. 12व्या मिनिटाला मुंबईला कॉर्नर मिळाला. अरनॉल्ड इसोको कॉर्नर घेण्यासाठी सज्ज होत असताना त्याचा दिल्लीच्या खेळाडूंशी वाद झाला. त्यामुळे त्याला यलो कार्डला सामोरे जावे लागले.

छांगटेने 17व्या मिनिटाला बाजू बदलत नंदकुमारला शानदार क्रॉस चेंडू दिला. बॉक्समध्ये डावीकडे हे घडत होते. त्यावेळी नंदकुमारकडे पुरेसा वेळ असूनही तो संधी साधू शकला नाही. विसाव्या मिनिटाला मुंबईविरुद्ध आणखी एक चाल झाली, पण अॅड्रीया कॅर्मोना याने लांबून मारलेला फटका नेटवरून गेला.

दोन मिनिटांनी मुंबईला संधी होती. पाऊल मॅचादो याने बॉक्सजवळ रफाएल बॅस्तोस याच्याकडून पास मिळताच ताकदवान फटका मारला, पण चेंडू थेट प्रतिस्पर्धी गोलरक्षक अल्बिनो गोम्स याच्याकडे गेला. छांगटेने 28व्या मिनिटाला अॅड्रीया याला सुंदर पास दिला, पण ही संधी फिनिशीेंगअभावी वाया गेली. 36व्या मिनिटाला सेहनाज सिंगने इसोकोला उंचावरून पास दिला. इसोकोने चेंडूवर नियंत्रण मिळवित फटका मारला, पण चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. तेव्हा गोम्स बचावासाठी योग्य स्थितीत होता.

मध्यंतरास एका गोलची आघाडी घेतलेल्या दिल्लीसाठी दुसरे सत्र मात्र धक्कादायक ठरले.

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियाचा अपमान करणाऱ्या आॅस्ट्रेलियन मीडियाला सुनावले आॅस्ट्रेलियन नागरिकांनी खडेबोल

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

वाढदिवस विशेष: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मार्क बाउचरबद्दल काही खास गोष्टी…