ISL 2018: स्वयंगोलची भरपाई केलेल्या ल्युचीयनमुळे मुंबईची सरशी

मुंबई | हिरो इंडियन सुपर लिगच्या चौथ्या मोसमात बाद फेरीच्या आशा कायम राखताना मुंबई सिटी एफसीने गुरुवारी घरच्या मैदानावर जिगरबाज खेळ करीत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला 3-2 असे हरविले. मुंबईचा कर्णधार ल्युचीयन गोऐन याच्यासाठी हा सामना झिरो ते हिरो असा ठरला. स्वयंगोलची भरपाई करीत त्याने भरपाई वेळेत केलेला गोल निर्णायक ठरला. यजमान संघाच्या विजयानंतर मुंबई फुटबॉल एरीनावर चाहत्यांनी भावपूर्ण जल्लोष केला.

खाते आधी उघडूनही मुंबई मध्यंतरास 1-2 असा मागे होता. यात ल्युचीयनच्या स्वयंगोलमुळे नॉर्थईस्टला खाते उघडतानाच बरोबरी साधता आली होती. दुसऱ्या सत्रात प्रारंभीच एव्हर्टन सँटोसने मुंबईला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अनेक प्रयत्नांना यश येत नव्हते. अशावेळी बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागण्याची शक्यता होती. त्याचवेळी भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटास ल्युचीयन याने गोल केला. राजू गायकवाड याने ही चाल रचली.

मुंबईने 16 सामन्यांत सातवा विजय मिळविला असून दोन बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 23 गुण झाले. त्यांनी एक क्रमांक प्रगती करताना एफसी गोवा संघाला मागे टाकले. गोव्याने 15 सामन्यांत 21 गुण मिळविले आहे. एक सामना कमी असणे गोव्यासाठी जमेची बाब आहे.
नॉर्थईस्टला 17 सामन्यांत 12वा पराभव पत्करावा लागला. 11 गुणांसह त्यांचे शेवटचे दहावे स्थान कायम राहिले.

मुंबईने घरच्या मैदानावर सुरवात चांगली केली. 15व्या मिनिटाला अचीले एमाना याने एव्हर्टन सँटोसच्या पासवर अप्रतिम फिनीशिंग करीत प्रतिस्पर्धी गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकविले. रेहेनेशला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही. खाते उघडल्यानंतर मुंबईकडून आक्रमक खेळ अपेक्षित होता, पण त्यांना दुर्दैवाचा फटका बसला. मैक सेमाने डावीकडून चेंडू मारला. तो गुरसीम्रत सिंग याच्या दिशेने गेला. गुरसीम्रतने ताकदवान फटका मारला. त्यानंतर चेंडू नेटपासून दूर जात होता, पण ल्युचीयन याने बचावाच्या प्रयत्नात चेंडू मुंबईच्याच नेटमध्ये घालविला.

पुर्वार्ध संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना नॉर्थईस्टने आघाडी घेतली. लालरिंदीका राल्टे याने उजवीकडून चाल रचली. त्याने मार्किंग नसलेल्या सांबिनीयाला पास दिला. नेटसमोरच असलेल्या सांबिनीयाने अचूक हेडींग करीत मुंबईचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला चकविले. दुसऱ्या सत्रात मुंबईला लवकरात लवकर बरोबरी साधण्याची गरज होती. या सत्रात नवव्याच व एकूण 54व्या मिनिटाला एव्हर्टन याने ही कामगिरी केली. ही चाल रचताना राफा जॉर्डाने सेहनाज सिंगपेक्षा सरस कौशल्य दाखवित चेंडूवर ताबा मिळविला.


निकाल |
मुंबई सिटी एफसी | 3 (अचीले एमाना 15, एव्हर्टन सँटोस 54, ल्युचीयन गोऐन 90-1)

विजयी विरुद्ध नॉर्थईस्ट युनायटेड एफसी | 2 (ल्युचीयन गोऐन 24-स्वयंगोल, सांबिनीया 43)