ISL 2018: फॉर्म गमावलेल्या दिल्लीला मुंबई सिटीवर विजय अनिवार्य

दिल्ली। दिल्ली डायनॅमोज एफसीची हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (3 डिसेंबर) मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होणार आहे. यंदा फॉर्म आणखी गमावलेल्या दिल्लीला विजय हा अनिवार्य असेल.

दिल्लीला गेल्या मोसमात प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळे यंदा चाहत्यांना सरस खेळाची अपेक्षा होती, पण पहिला टप्पा त्यांच्यासाठी फारसा उल्लेखनीय ठरलेला नाही. दिल्ली नऊ सामन्यांतून चार गुणांसह तळात आहे. त्यांना अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. यंदा विजयाचे खाते रिक्त असलेला हा एकमेव संघ आहे. त्यांना केवळ चार बरोबरी साधता आल्या आहेत. अनेक सामन्यांत दिल्लीने आश्वासक खेळ केला आहे. आता संधीचे रुपांतर करून वर्चस्व राखत विजय मिळविता आले नाहीत तर त्यांना प्ले-ऑफ पात्रतेच्या आशा विसरून जाव्या लागतील.

दिल्लीला विजयाची मालिका लवकरच सुरु करावी लागेल. दिल्लीचे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ आतापर्यंत मिळविता न आलेला विजय मुंबईविरुद्ध नेहरू स्टेडियमवर कमावण्यासाठी आशावादी आहेत.

गोम्बाऊ यांनी सांगितले की, “एका फार चांगल्या संघाविरुद्ध आमचा महत्त्वाचा सामना आहे. आमचा हा दहावा सामना आहे. आम्ही आतापर्यंत जिंकू शकलेलो नाही, गेल्या दोन सामन्यांत आम्ही चांगला खेळ करीत आहोत असे वाटते. मुंबई संघाविषयी मला बराच आदर आहे. आम्ही चांगली कामगिरी करून जिंकू शकू अशी आशा आहे.”

दिल्लीच्या खेळात कल्पकतेची कमतरता नाही, पण फिनिशींग नसल्यामुळे त्यांना फटका बसला आहे. आता आपला संघ संघटित होऊन मोसमातील पहिला विजय कमावेल अशी गोम्बाऊ यांना आशा आहे. दिल्लीने आतापर्यंत घरच्या मैदानावर जिंकण्याच्या स्थितीत असूनही चार गुण गमावले आहेत. गोम्बाऊ यांनी सांगितले की, गोवा आणि बेंगळुरूविरुद्ध आम्ही फार चांगला खेळ करीत बऱ्याच संधी मिळविल्या होत्या, पण आम्हाला फिनिशींग करता आले नाही. यावेळी चेंडू नेटमध्ये मारत गोल करण्याचा विश्वास संघाला आहे.

मुंबई येत्या नऊ दिवसांत तीन सामने खेळेल. त्यातील ही पहिली लढत आहे. त्यांचे दोन सामने दुसऱ्या शहरात आहेत. घरच्या मैदानावर मुंबईने दिल्लीवर 2-0 अशी मात केली असली तरी मुंबईचे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा यांना दिल्लीच्या आव्हानाची जाणीव आहे.

कोस्टा म्हणाले की, तुम्ही दिल्लीचा खेळ पाहिला नसेल आणि त्यांचे गुणतक्त्यातील स्थान पाहिले तर तुम्ही निराश व्हाल, पण तुम्ही त्यांचा खेळ पाहिलात तर तो चांगला खेळत असल्याचे तुम्हाला कळेल. मागील सामन्यात बेंगळुरूविरुद्ध त्यांनी बऱ्याच संधी निर्माण केल्या. त्यांचा खेळ संघटित वाटत होता. मध्यंतरालाच त्यांच्याकडे दोन किंवा तीन गोलांची आघाडी असायला हवी होती इतक्या योग्यतेचा खेळ झाला होता. त्यामुळे आम्हाला दिल्लीच्या संघाविषयी आदर राखून खेळावर लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल.

मुंबईचा बाहेरच्या मैदानावरील सामन्यांमध्ये फॉर्म चांगला आहे. चार सामन्यांत त्यांचा एकच पराभव झाला आहे. मध्य फळीत पाऊलो मॅचादो याचा चमकदार खेळ उल्लेखनीय ठरला आहे. ल्युचीयन गोऐन व शुभाशिष बोस यांनी बचावाची जबाबदारी भक्कम खेळाच्या जोरावर पार पाडली आहे.

एक उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्ली आणि मुंबई यांना प्रत्येकी सातच गोल करता आले आहेत, जे लीगमधील सर्वांत कमी प्रमाण आहे. मुंबईचे सात पैकी सहा गोल परदेशी खेळाडूंनी केले आहेत, तर दिल्लीचे सात पैकी पाच गोल भारतीय खेळाडूंनी केले आहेत.

आज दोन्ही संघ गोलसाठी आणि महत्त्वाच्या विजयासाठी प्रयत्नशील असतील. मग कुणीही गोल केला तरी त्यांची हरकत नसेल.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: एटीकेचा विजय, चेन्नईला पेनल्टी पडल्या महागात

ब्रेंडन मॅक्यूलमचे बंधू प्रेम; भावाच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्याला शोधूनच काढेल…

किंग कोहलीचा निर्धार पक्का, मालिका जिंकणारच