ISL 2018: मुंबई सिटीविरुद्ध ब्लास्टर्सला बरोबरी टाळणे अनिवार्य

मुंबई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (16 डिसेंबर) मुंबई सिटी एफसीविरुद्ध केरळा ब्लास्टर्सची लढत होणार आहे. प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर ब्लास्टर्सला बरोबरींची मालिका टाळणे अनिवार्य असेल. या सामन्याला संध्याकाळी 7.30ला सुरूवात होणार आहे.

इंग्लंडचे माजी गोलरक्षक डेव्हिड जेम्स ब्लास्टर्सचे प्रशिक्षक आहेत. हा संघ 11 सामन्यांतून नऊ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. पहिल्या चार संघांमध्ये यायचे असेल तर उरलेल्या सामन्यांतून त्यांना कमाल गुण मिळवावे लागतील. सलामीला एटीकेविरुद्ध (अॅटलेटिको दि कोलकाता) विजय मिळवून त्यांनी मोहिमेची सुरवात धडाक्यात केली. त्यानंतर मात्र त्यांची मालिका विस्कळीत झाली. त्यांना तब्बल सहा बरोबरी पत्कराव्या लागल्या आहेत. केवळ जमशेदपूर एफसीने त्यापेक्षा जास्त बरोबरी साधल्या आहेत. अशावेळी ब्लास्टर्सला मुंबई फुटबॉल एरीनावरील लढतीत आव्हानाची तीव्रता ठाऊक आहे.

जेम्स यांनी सांगितले की, संघासाठी न जिंकणे फार अवघड असते. आमचा दहा सामन्यांत विजय न मिळण्याइतका कमी दर्जा आहे असे वाटत नाही. साहजिकच आमच्यावर दडपण आहे. आकडेवारीचा विचार केल्यास आम्हाला अजूनही संधी असल्याचे वाटते. आमचा त्यावर विश्वास आहे. आम्ही पात्र ठरू अशीच आशा आहे.  प्रत्येक सामना जिंकण्याचे अतिरीक्त दडपण आहे. आता यापुढे मैदानावर उतरून बरोबरी साधणे आम्हाला परवडणार नाही.

कोचीस्थित ब्लास्टर्स संघाला आघाडीवर झगडावे लागले आहे. त्यांना केवळ 11 गोल करता आले आहेत. मुंबईचा बचाव चिवट असल्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान आणखी खडतर असेल. मुंबई 21 गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. घरच्या मैदानावर त्यांच्याविरुद्ध केवळ दोन गोल झाले आहेत. येथे त्यांनी 360 पेक्षा जास्त मिनिटे गोल पत्करलेला नाही.

जेम्स पुढे म्हणाले की, आता काय करावे लागेल याची आम्हाला कल्पना आहे. त्याविषयी आम्हाला फार कमी पर्याय आहेत. आत्मविश्वासाचा विचार केल्यास आशियाई करंडकासाठी संभाव्य संघात आमच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. स्टीफन कॉन्स्टंटाईन यांचा आमच्या खेळाडूंच्या क्षमतेवर नक्कीच विश्वास आहे.

मुंबई सिटीचा संघ प्ले-ऑफच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यासाठी आणि आपली स्थिती भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुंबईचे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा म्हणाले की, आतापर्यंतचा सर्वांत खडतर सामना हा असेल. असे का याचे स्पष्टीकरण मी देतो. आम्ही या टप्यात खेळणारा शेवटचा संघ आहोत. जो संघ निश्चिंतपणे खेळतो आणि ज्यांच्यासाठी गमावण्यासारखे काहीच नाही त्यांच्याविरुद्ध आम्हाला खेळायचे आहे. हा क्षण खडतर असेल. याचे कारण हा वर्षातील शेवटचा सामना आहे. त्यानंतर खेळाडूंना थोडा ब्रेक मिळेल आणि ते घरी जातील. आम्हाला या लढतीवर लक्ष केंद्रीत करावेच लागेल.

मुंबईचा संघ सेहनाज सिंग याच्या गैरहजेरीत खेळेल. त्याला मागील सामन्यात लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्याच्या ऐवजी मिलन सिंग याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

ब्लास्टर्सचा संघ धडाकेबाज खेळ करेल. त्यामुळे त्यांच्या बचाव फळीत उणीवा राहू शकतात. प्रतिआक्रमण करण्यात मुंबईचा संघ सर्वोत्तम आहे आणि त्यादृष्टिने ब्लास्टर्सला दक्ष राहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: भारतीय गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार कोहलीने लढवली ही नवी युक्ती

यष्टीरक्षक रिषभ पंतने फक्त २ सामन्यात घेतले तब्बल १५ झेल

पीव्ही सिंधूची ऐतिहासिक सुवर्णमय कामगिरी