ISL 2018: गतविजेत्या एटीके संघावर पुणे सिटीचा दणदणीत विजय

पुणे । हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीने आपल्या मोहीमेला गती देताना गतविजेत्या एटीकेवर 3-0 असा दणदणीत विजय मिळविला. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुण्याच्या आदिल खान, दिएगो कार्लोस आणि रोहित कुमार यांनी प्रेक्षणीय गोल करीत चाहत्यांना आनंदित केले.

पुण्याने 11 सामन्यांत सहावा विजय मिळविला. एक बरोबरी व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. पुण्याचे 19 गुण झाले. पुण्याचे तिसरे स्थान कायम राहिले, पण चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या पराभवानंतर जोरदार विजय मिळविणे पुण्यासाठी महत्त्वाचे ठरले. उत्तरार्धात प्रतिस्पर्ध्याचे गोल होऊ न देण्यातही पुण्याला यश आले. बेंगळुरू एफसी (21 गुण) आघाडीवर, तर चेन्नईयीन एफसी (20) दुसऱ्या स्थानावर आहे. एटीकेला दहा सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह 12 गुण मिळवून त्यांचे आठवे स्थान कायम राहिले.

पुण्याने घरच्या मैदानावर आत्मविश्वासाने सुरवात केली. दुसरीकडे एटीकेला झगडावे लागत होते. 32व्या मिनीटाला मार्सेलिनीयोने डावीकडून कॉर्नरवर छान चेंडू मारला. त्यानंतर आदिलने उडी घेत ताकदवान हेडींग केले आणि एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याला चकविले. ­मध्यंतरास पुण्याने एका गोलची आघाडी राखली.

उत्तरार्धात ब्राझीलच्या कार्लोसने स्पर्धेतील पहिल्या गोलची प्रतिक्षा संपुष्टात आणली. त्यानंतर त्याने भावपूर्ण जल्लोष केला. 77व्या मिनीटाला सार्थक गोलुईने उजवीकडून रोहितला पास दिला. रोहितने एटीकेच्या बचावपटूंना चकवित ताकदवान किक मारत गोल केला. त्यानेही गोलनंतर प्रेक्षकांना भावपूर्ण अभिवादन केले.

एटीकेला अखेरच्या मिनीटाला आणखी हताश व्हावे लागले. झीक्यूईन्हाच्या क्रॉस पासवर रॉबीन सिंगने हेडींग केले. चेंडू नेटमध्ये गेला, पण तोच ऑफसाईडचा इशारा झाला. पुर्वार्धात एटीकेला काही संधी मिळाल्या. 30व्या मिनीटाला प्रबीर दासने दिलेल्या सुंदर पासनंतर झीक्यूइन्हाने मारलेला चेंडू पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याच्या हातात गेला. 36व्या मिनीटाला रायन टेलरने कॉर्नरवर मारलेला चेंडू कॉन्नर थॉमस याच्या पायापाशी पडला. त्याला पुण्याच्या ज्युवेल राजाने रोखण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू जॉर्डी माँटेल याच्यापाशी गेला. त्यावेळी माँटेलला संधी होती, पण त्याने मारलेला चेंडू नेटवरून बाहेर गेला. 43व्या मिनीटाला रायन टेलरने स्वैर फटका मारत संधी दवडली.

निकाल
एफसी पुणे सिटी : 3
(आदिल खान 32, दिएगो कार्लोस 59, रोहित कुमार 77)
विजयी विरुद्ध एटीके : 0