ISL 2018: गोव्याशी गोव्यात खेळण्याचे पुणे सिटीसमोर कडवे आव्हान

गोवा हिरो इंडियन सुपर लीगमध्ये एफसी पुणे सिटीसमोर आज (२८ ऑक्टोबर) खडतर आव्हान असेल. धडाकेबाज फॉर्मात असलेल्या एफसी गोवा संघाविरुद्ध गोव्याच्या नेहरू स्टेडियमवरील होम ग्राऊंडवर खेळण्यासाठी त्यांना सज्ज व्हावे लागेल.

गोव्याने मुंबई सिटी एफसीचा ५-० असा धुव्वा उडविला. अशा प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यापूर्वी पुणे सिटीने मुख्य प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्याशी फारकत घेतली आहे. पुण्यासाठी मोसमाचा प्रारंभ डळमळीत झाला. त्यांना दोन पराभव आणि एक बरोबरी इतकीच कामगिरी करता आली आहे. त्यामुळे पोर्तुगाल यांना पद गमवावे लागले.

एमिलियानो अल्फारो आणि मार्सेलिनीयो असे गुणवान स्ट्रायकर्स असूनही पुणे सिटीची गोलसमोरील कामगिरी ढिसाळ ठरली आहे. तीन सामन्यांत मिळून पुण्याला अवघा एकमेव गोल करता आला आहे. गेल्या मोसमात आक्रमणाच्या बाबतीत आघाडीवरील संघांमध्ये राहिलेल्या पुण्यासाठी हे चित्र निराशाजनक ठरले आहे.

पुणे सिटीचे हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांनी सांगितले की, “गोल्डन बूट किंवा सर्वाधिक अॅसिस्टसाठी दावेदार ठरतील असे स्ट्रायकर्स आमच्याकडे नक्कीच आहेत. केवळ त्यांना फॉर्म गवसण्याचा आणि आम्ही त्यांच्यासाठी पुरक परिस्थिती निर्माण करण्याचा अवकाश आहे. तसे झाल्यास ते आणखी गोल करू शकतील.”

पोर्तुगाल यांच्या गैरहजेरीत खेळाडूंना बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करण्याचे आव्हान रेड्डी यांच्यासमोर आहे. गोव्याकडे फेरॅन कोरोमीनास आणि ह्युगो बौमौस असे खेळाडू आहेत. रेड्डी यांना पुण्याने गेल्या मोसमात गोव्यावर मिळविलेल्या विजयापासून प्रेरणा घ्यायची आहे. त्यांनी सांगितले की, खेळाडूंना अशा वातावरणात प्रोत्साहित करणे सोपे नाही, पण आम्ही ज्या काही गोष्टी करीत आहोत त्यात एक व्हिडीओ क्लीप पाहिली.

गेल्या डिसेंबरमध्ये आम्ही येथे मिळविलेल्या विजयाची ही क्लीप होती. आम्ही त्या लढतीची क्षणचित्रे पाहिली. आम्ही संघ म्हणून कसा बचाव केला आणि आक्रमणात सांघिक कामगिरी कशी केली याचा आढावा घेतला. आम्ही तेव्हा २-० असे जिंकलो होतो, पण कदाचित तीन किंवा चार गोलने जिंकण्याइतक्या संधी आम्ही निर्माण केल्या होत्या. त्यामुळे आमचे मनोबल थोडे उंचावले आहे.

गोव्याने मुंबईवरील विजयासह इतर संघांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तीनच सामन्यांत त्यांच्या खात्यात दहा गोल केले आहेत. आपल्या संघाविषयी दरारा निर्माण होईल अशी ही कामगिरी आहे. प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा हे मात्र फार पुढचा विचार करण्यास तयार नाहीत.

पुणे सिटी गुणतक्त्यातील तळाच्या स्थानावरून वर येण्यासाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे हा सामना अवघड असेल अशी लॉबेरा यांची अपेक्षा आहे.

लॉबेरा म्हणाले की, “आम्ही फेव्हरीट आहोत असे मला खरोखर वाटत नाही. आम्ही शंभर टक्के खेळ केला नाही तर उद्या आम्ही जिंकणार नाही.”

स्पेनचे लॉबेरा पुण्याच्या गुणतक्त्यातील स्थानावरून फारसे निष्कर्ष काढण्यास तयार नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, गुणतक्त्यावरून पुणे सिटीची संघ म्हणून क्षमता दिसून येते असे वाटत नाही. त्यांचा संघ उत्तम आहे. ते जेतेपदासाठी झुंज देतील याची मला खात्री आहे. उद्याचा सामना अवघड असेल.

ब्रँडन फर्नांडिस तंदुरुस्त झाल्यामुळे गोवा संघ आणखी भक्कम झाला आहे. रविवारी निर्णायक विजय मिळवून गुणतक्त्यात आघाडी पटकावण्याचा गोव्याचा प्रयत्न राहील.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो

रोहित शर्मा, मुरली विजयचे कसोटी संघात पुनरागमन; आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा