ISL 2018: पुणे सिटीला अजूनही संघातील संतुलनाची प्रतिक्षा

बेंगळुरू। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (30 नोव्हेंबर) एफसी पुणे सिटी विरुद्ध बेंगळुरू एफसी लढत होणार आहे. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी पूर्वी बेंगळुरूकडे होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत पूर्वीच्या होमग्राऊंडवर असेल, पण त्यांना संघातील संतुलनाची अजूनही प्रतिक्षा आहे. श्री कांतीरवा स्टेडियमवरील लढतीत यादृष्टिने पाऊल पडेल अशी त्यांना आशा आहे.

बेंगळुरू एफसीची 2013 मध्ये स्थापना झाली तेव्हा रेड्डी कोचिंग स्टाफमध्ये होते. तुल्यबळ संघाच्या बांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. 2017 मध्ये ते पुणे सिटीत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून दाखल झाले. बेंगळुरुमधील परिस्थिती परीचयाची असली तरी त्यांच्यासमोर कठिण आव्हान असेल. कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा बेंगळुरू अद्याप अपराजित आहे.

पुणे सिटीला नऊ सामन्यांतून एकच विजय मिळविता आला आहे. त्यातच त्यांना गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या संघाशी दोन हात करावे लागतील. जमशेदपूर एफसीवरील 2-1 अशा विजयासह पुणे सिटीने पारडे फिरविण्याचे संकेत दिले, पण नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या आशांना धक्का बसला.

बेंगळुरूविरुद्ध पुण्याला बचाव फळीतील त्रुटी दूर कराव्या लागतील. पुण्याविरुद्ध 19 गोल झाले असून ही कामगिरी सर्वांत खराब आहे. त्याशिवाय लिगमधील सर्वाधिक 141 शॉट्सना सामोरे जावे लागण्याची वेळही पुण्यावर आली आहे. त्यावरून त्यांचा बचाव किती कमकुवत आहे हे स्पष्ट होते.

रेड्डी यांनी सांगितले की, “बचाव ही मोसमातील आतापर्यंतची समस्या ठरली आहे, पण मागील सामन्याचा विचार केल्यास आम्ही 90 मिनिटे चांगले संघटित होतो. आम्हाला सेट-पीसवर गोल पत्करावा लागला आणि ही मोसमातील डोकेदुखी ठरली आहे. याहून काळजीची गोष्ट म्हणजे आम्ही फार बचावात्मक खेळतो तेव्हा भेदक आक्रमण करू शकत नाही. त्याचवेळी आक्रमण करायला जातो तेव्हा बचाव उघडा पडतो. त्यामुळे आम्हाला योग्य संतुलन साधण्याची गरज आहे.”

सुनील छेत्री आणि कंपनीला रोखणे फार मोठे आव्हान असेल, पण मिकू दुखापतीमुळे जानेवारीपर्यंत उपलब्ध नसेल आणि यामुळे पुण्याला दिलासा मिळाला असेल. मिकू उपचारासाठी स्पेनला गेला आहे. छेत्रीला पुण्याविरुद्ध खेळायला आवडते. त्याने आतापर्यंत पुण्याविरुद्ध सहा सामन्यांत सहा गोल केले आहेत.

कुआद्रात यांनी सांगितले की,” मिकू हा असा खेळाडू आहे की, ज्याची जागा भरून काढता येत नाही. त्यामुळे तुम्हाला खेळण्याची पद्धत बदलावी लागले. अर्थात यामुळे आम्हाला आतापर्यंत प्रयोग करीत असलेल्या गोष्टी आजमावून पाहण्याची संधी मिळाली आहे आणि हे उत्कंठावर्धक असेल.”

बचावाच्या बाबतीत बेंगळुरू भक्कम आहे. त्यांच्याविरुद्ध केवळ पाच गोल झाले आहे. अल्बर्ट सेरॅन आणि जुआनन यांनी बचावाची जबाबदारी भक्कम पद्धतीने पार पाडली आहे. त्यांना चकविलेच तर गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याचा अडथळा पार करणे अशक्यप्राय ठरते. दिल्ली डायनॅमोज एफसीवरील 1-0 अशा विजयात बेंगळुरूने हेच दाखवून दिले. गुरप्रीत गोल्डन ग्लोव्ह किताबाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत क्लीन-शीट राखली आहे.

कुआद्रात यांनी सांगितले की,” या घडीला पुण्याची स्थिती अशी आहे की त्यांना तीन गुणांची गरज आहे. त्यामुळे ते दिल्लीप्रमाणे खेळतील. आमच्यासाठी ही नवी कसोटी असेल. आम्ही तीन गुण मिळविण्याइतका चांगला खेळ करू अशी आशा आहे.”

पुणे सिटीकडे आघाडी फळीत मार्सेलिनियो आणि दिएगो कार्लोस असे मातब्बर खेळाडू आहेत, पण त्यांना यंदा चमक दाखविता आलेली नाही. इयन ह्युम आतापर्यंत दोनच सामने खेळला आहे. अशावेळी रेड्डी यांना आपली आघाडी फळी स्पर्धेतील सर्वांत चिवट बचावासमोर चालेल अशी आशा बाळगावी लागेल.

बेंगळुरूचा संघ दिमास डेल्गाडो याच्या पुनरागमनामुळे आणखी भक्कम झाला आहे. दिल्लीविरुद्धच्या लढतीत तो निलंबनामुळे खेळू शकला नाही. स्पेनचा हा खेळाडू मध्य फळीत प्रभावी ठरतो. पुण्याविरुद्ध त्याची कामगिरी मोलाची ठरेल आणि आघाडीवरील संघ म्हणून आणखी वर्चस्व भक्कम करता येईल अशी आशा कुआद्रात यांना असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: ब्लास्टर्सशी गोलशून्य बरोबरीमुळे चेन्नईयीन एफसीच्या आशांना धक्का

हॉकी विश्वचषक २०१८: स्पेन विरुद्धच्या थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा विजय

२०१९ आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघातील या खेळाडूला मिळणार सर्वाधिक रक्कम