ISL 2018: एफसी गोवा संघाला पुणे सिटीचा धक्का

पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तळात असलेल्या एफसी पुणे सिटीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील घरच्या मैदानावर गोव्याला मंगळवारी (11 डिसेंबर) 2-0 असे गारद केले. दोन्ही गोल उत्तरार्धात झाले. ब्राझीलच्या मार्सेलिनियोने खाते उघडले, तर मार्को स्टॅन्सोविच याने पेनल्टी सत्कारणी लावली. त्यावेळी सुमारे सहा हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

74व्या मिनिटाला सार्थक गोलुईच्या पासवर मार्सेलिनियोने मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याच्या ग्लोव्ह्जना चाटून नेटमध्ये गेला. 90व्या मिनिटाला गोव्याचा बचावपटू महंमद अली याने बॉक्समध्ये स्टॅन्कोविचला मागून धरले. त्यावेळी चेंडू स्टॅन्कोविच याच्या दिशेने येत होता. त्यामुळे पंच ए. रोवन यांनी महंमदला यलो कार्ड दाखविताना पुण्याला पेनल्टी बहाल केली. त्यावर स्टॅन्कोविचने अचूक फटका मारला.

या प्रतिकूल निकालानंतरही गोव्याचे चौथे स्थान कायम राहिले. 10 सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला असून पाच विजय व दोन बरोबरींसह त्यांचे 17 गुण आहेत. पुण्याने एक क्रमांक प्रगती करताना केरळा ब्लास्टर्सला (11 सामन्यांतून 9 गुण) मागे टाकले. पुण्याने तिसरा विजय मिळविला असून दोन बरोबरी व सात गुणांसह त्यांचे 11 गुण झाले आहेत. बेंगळुरू एफसी 10 सामन्यांतून 24 गुणांसह आघाडीवर आहे. मुंबई सिटी एफसी दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचे 11 सामन्यांतून 21 गुण आहेत. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी 11 सामन्यांतून 20 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्याची सुरवात संथ होती, जे पूर्णपणे अनपेक्षित नव्हते. पहिले पाच मिनिटे चेंडूवर गोव्याचा ताबा होता, पण त्यांना गोलची संधी निर्माण करता आली नव्हती. दुसरीकडे पुण्याने सुद्धा आपल्या संघात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला होता. पुढील पाच मिनिटांत गोव्याकडे चेंडूचा ताबा असला तरी पुण्याने काही प्रयत्न करून चेंडू मिळविला होता. दोन्ही संघांच्या गोलरक्षकांना मात्र प्रयास पडले नव्हते.

14व्या मिनिटाला खेळात थोडी जान आली. दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले. मार्सेलिनीयोऩे सुरवात केली. त्याने आदिल खानला पास दिला. हा चेंडू गोव्याचा मध्यरक्षक अहमद जाहौह याने ब्लॉक केला. मग गोव्याने प्रतिआक्रमण रचले. उजवीकडे फेरॅन कोरोमीनास याला चेंडू मिळाला. त्याने एदू बेदियाला पास दिला. बेदीयाने चेंडूवर नियंत्रण मिळवित मारलेला फटका मात्र वरून गेला.

पुण्याच्या इयन ह्यूमने 17व्या मिनिटाला मार्सेलिनियोला पास दिला. त्यावेळी गोव्याच्या क्षेत्रात आक्रमक पवित्र्यामुळे पोकळी निर्माण झाली होती. परिणामी गोलरक्षक महंमद नवाझला पुढे यावे लागले. बॉक्समधून तो मैदानावर घसरत पुढे सरसावला. त्याचा सहकारी सेरीटॉन फर्नांडीस यानेही बचावाचा प्रयत्न केला. त्यानेच मार्सेलिनियोच्या ताब्यातून चेंडू घेतला. या झटापटीत मार्सेलिनियोचा बूट नवाझच्या चेहऱ्यावर लागला. त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

गोव्याने 22व्या मिनिटाला उल्लेखनीय प्रयत्न केला. बेदियाने पुण्याच्या बचाव फळीवरून चेंडू मारला, जो मिळवित ब्रँडन फर्नांडीसने डावीकडून बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने मारलेला चेंडू मात्र पुणे सिटीचा गोलरक्षक कमलजीत सिंग याने अडविला. 29 व्या मिनिटाला याच जोडीने चाल रचली. ब्रँडनला डावीकडून बेदिाने पास दिला. त्याचा फटका थोडक्यात चुकला आणि चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला.

गोव्याचा मध्यरक्षक अहमद जाहौह याला 33व्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने मैदानावर घसरत रॉबिन सिंगला रोखण्याचा प्रयत्न केला. यात रॉबिनच्या घोट्याला दुखापत झाली. अहमदला मोसमात मिळालेले हे चौथे यलो कार्ड आहे. त्यामुळे त्याला पुढील लढतीस मुकावे लागेल.

पुण्याची फ्री किकवरील संधी 39व्या मिनिटाला वाया गेली. मंदार रावदेसाई याने गोलक्षेत्रात मार्सेलिनियोला पाडले. त्यामुळे मिळालेली फ्री किक मार्सेलिनियोनेच घेतली आणि ह्युमला पास दिला, पण तो अचूक नव्हता.

गोव्याने 41व्या मिनिटाला प्रतिआक्रमण रचले. मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्जने डावीकडून चाल रचली. त्याने दिलेला पास कोरोने बेदीयाकडे सोपविला. बॉक्समधून बेदियाने मारलेला चेंडू मात्र क्रॉसबारवरून गेला. ह्युमला 45व्या मिनिटाला यलो कार्डला सामोरे जावे लागले. गोव्याचे प्रतिआक्रमण फोल ठरविण्याच्या प्रयत्नात त्याने ह्युगो बौमौस याला मागून धक्का देत पाडले. तेव्हा ह्युगो फ्री किक घेत होता.

दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी दोन्ही संघ सावध खेळ करीत होते. 52व्या मिनिटाला बेदीयाने उजवीकडून फ्री किकवर मारलेला फटका जादा ताकदीमुळे नेटवरून गेला. कमलजीतकडून तीन मिनिटांनी चुकून कोरोकडे चेंडू मारला गेला. बॉक्समध्ये हे घडताच कोरोने ह्युगोकडे चेंडू सोपविला. त्याचवेळी मॅट मिल्सने चपळाईने चेंडू ब्लॉक केला.

पुण्याने 63व्या मिनिटाला चांगली संधी दवडली. रॉबिनने पास देताच ह्युमने घोडदौड करीत डाव्या पायाने फटका मारला, पण अचूकतेअभावी चेंडू नेटच्या उजवीकडून बाहेर गेला. अंतिम टप्यात दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. 70व्या मिनिटाला अहमदने मारलेला चेंडू आदिल खान याच्या पायांमधून गेला, पण कमलजीतने दक्ष राहात डावीकडे झेप घेत बचाव केला. पुढच्याच मिनिटाला मार्सेलिनियोने बॉक्समधून उजव्या पायाने मारलेला चेंडू नवाझने झेपावत चपळाईने अडविला.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या रोहित शर्मालाच युवराजने खडसावले

राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेती खेळाडू झाली आमदार

रोनाल्डोचे मेस्सीला आव्हान, चाहते आले टेन्शनमध्ये