ISL 2018: ब्लास्टर्स आणि बेंगळुरूमध्ये चुरशीच्या लढतीची अपेक्षा

कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये केरळा ब्लास्टर्स आणि बेंगळुरू एफसी यांच्यात सोमवारी येथील नेहरू स्टेडियमवर रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये ही लढत रंगेल.

लिगमधील सर्वाधिक निष्ठावान चाहते लाभलेले दोन संघ म्हणून या संघांचा लौकीक आहे. त्यांच्या समर्थकांत खेळीमेळीच्या वातावरणात शेरेबाजी चालते. त्यामुळे लढतीची रंगत आणखी वाढते. गेल्या मोसमात नववर्षाच्या पूर्वसंध्येस बंगळूरूचा संघ कोचीत आला. त्यांनी तीन गोल केले. ब्लास्टर्सचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांच्यासाठी तो सामना शेवटचा ठरला. गतमोसमातील ब्लास्टर्सचा तो सर्वाधिक दारूण पराभव ठरला.

ब्लास्टर्सचे सहाय्यक प्रशिक्षक हर्मन ह्रैओर्सन यांनी सांगितले की, बेंगळुरू एफसी हा लिगमधील एक सर्वोत्तम संघ आहे. हा सामना आमच्यासाठी करू किंवा मरू इतक्या महत्त्वाचा असेल. आम्ही प्रत्येक सामन्यात तीन गुण मिळविण्याचा प्रयत्न करण्यासाठी खेळतो. उद्याचा सामना सुद्धा वेगळा नसेल. आम्ही विजयासाठी आतूर आहोत. मैदानावर उतरल्यानंतर हे प्रयत्न साध्य करण्याची आम्हाला आशा असेल.

ब्लास्टर्सला बरोबरीचे विजयात रुपांतर करण्यात अपयश येत आहे. यामागील अडथळ्यांचा शोध ब्लास्टर्सच्या तांत्रिक पथकाने घेतला आहे. संघ ताजातवाना राहावा म्हणून ब्लास्टर्स संघात बदल करेल असे हर्मन यांनी नमूद केले.

प्रमुख स्ट्रायकर मिकू जोशात असल्यामुळे बेंगळूरू संघ भरात आहे. मागील लढतीत कोलकत्यात कार्लेस कुआद्रात यांच्या संघाने पहिल्या पंधरा मिनिटांत गोल पत्करला. प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात चढाया करण्यासाठी त्यांना झगडावे लागत होते. मिकूने सेट-पीसवर चमकदार गोल केल्यानंतर मात्र चित्र पालटले. व्हेनेझुएलाच्या मिकूला संदेश झिंगन कसा रोखतो यावर बरेच काही अवलंबून असेल.

सी. के. विनीत हा ब्लास्टर्सचा खेळाडू सुद्धा जोशात उतरेल. याचे कारण तो त्याच्या पूर्वीच्या संघाविरुद्ध मैदानावर खेळत आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी ब्लास्टर्सकडे वळलेला रिनो अँटो यंदा पुन्हा बेंगळुरूकडे परतला आहे. तो सुद्धा आपला ठसा उमटविण्यासाठी प्रयत्नशील असेल.

गोल करण्याच्या क्षमतेबरोबरच बेंगळुरूचे बलस्थान म्हणजे त्यांनी फार कमी गोल स्विकारले आहेत. त्यांच्याविरुद्ध केवळ तीन गोल झाले आहेत. जॉन जॉन्सन आणि शुभाशिष बोस नसले तरी त्यांच्या गैरहजेरीत जुआनन आणि अल्बर्ट सेरॅन यांनी परिस्थितीचा अप्रतिम सामना केला आहे.

कुआद्रात यांनी सांगितले की, जॉन्सन आणि शुभाशिष यांची उणीव भरून काढणे सोपे नव्हते, पण अल्बर्ट आणि निशू कुमार यांनी ज्या पद्धतीने हे केले त्याचा मला आनंद वाटतो. आगेकूच करण्यासाठी त्यांनी प्रदर्शित केलेली जिगर मला फार कौतुकास्पद वाटते.

यजमान ब्लास्टर्सवर सलग चार बरोबरींची मालिका संपुष्टात आणण्याचे आव्हान आहे, दुसरीकडे बेंगळुरूला प्रतिस्पर्ध्याच्या मैदानांवरील सामन्यांतील (अवे मॅचेस) अपराजित मालिका कायम राखायची आहे. या दोन संघांमधील आधीच्या लढतींमधील चुरस पाहता ही लढत चुकवू नये हेच अनिवार्य असेल.