ISL 2018: चित्र धुसर असूनही एफसी पुणे सिटी संघ आशावादी

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये एफसी पुणे सिटीला अजूनही पहिल्यावहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. बुधवारी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुणे सिटीची जमशेदपूर एफसी संघाविरुद्ध लढत होत आहे. मोहीमेच्या आव्हानाचे चित्र कितीही धुसर दिसत असले तरी पारडे फिरविता येईल अशी आशा हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांना वाटते.

तीन सामने झाल्यानंतर मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांच्याकडून रेड्डी यांच्याकडे सुत्रे आली. तेव्हापासून त्यांना अपेक्षित असे यश मिळालेले नाही. केरळा ब्लास्टर्स आणि दिल्ली डायनॅमोज यांच्याविरुद्ध बरोबरी साधल्यामुळे पुणे सिटीला दोन गुण मिळाले. त्यांचे सात सामने झाले आहेत. अशावेळी जमशेदपूरविरुद्ध सरस कामगिरी करून मोसमातील आव्हान वाचविण्याचे आव्हान संघासमोर असेल.

रेड्डी यांनी सांगितले की, कागदावर आमचा संघ फार चांगला आहे. गेल्या मोसमाच्या तुलनेत हा संघ सारखाच आहे, पण सामने कागदावर नव्हे तर मैदानावर जिंकायचे असतात. बरेच संघ अशा स्थितीत आहेत.

यजमान संघाला ब्राझीलचा स्ट्रायकर मार्सेलिनीयो याच्या पुनरागमनामुळे दिलासा मिळाला असेल. याशिवाय आयएसएलच्या इतिहासात सर्वाधिक गोल केलेला इयन ह्युम हा सुद्धा उपलब्ध झाला आहे. मार्सिलिनीयोला रेड कार्डमुळे एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागले होते. एमिलीयानो अल्फारो याला एटीकेकडे लोनवर पाठविण्यात आले आहे. ह्युम तंदुरुस्त झाल्यामुळे परतला आहे.

रेड्डी यांनी सांगितले की, एटीकेविरुद्ध आम्हाला बऱ्याच खेळाडूंची उणीव जाणवली, पण आता अशा काही अडचणी नाहीत. त्यामुळे आम्ही सामन्यास उत्सुक आहोत. या मोसमात प्रथमच आमचे सर्व 25 खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत.

पुणे आघाडीवरील संघाच्या तुलनेत 14 गुणांनी मागे आहेत.जिंकल्यास गुणतक्त्यात त्यांना आगेकूच करता येईल. दुसरीकडे सेझार फरांडो यांच्या जमशेदपूर संघाला गाफील राहून चालणार नाही. सात सामन्यांतून 11 गुणांसह हा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. जिंकल्यास हा संघ गुणतक्त्यात दुसरा क्रमांक गाठू शकेल.

फरांडो यांनी सांगितले की, मला वाटते की पुण्याचा संघ चांगला आहे. माझ्या मते हा संघ धोकादायक आहे. याचे कारण पहिल्या विजयासाठी ते आतूर आहेत. त्यामुळे आमच्यासमोर मोठे आव्हान आहे.

जमशेदपूरच्या संघाचा खेळ पाहता त्यांच्या क्षेत्रात मोकळीक मिळते. त्यामुळे इतर संघांना गोल करण्याच्या संधी मिळतात. टिरी आणि कंपनीने बचाव भक्कम ठेवला आहे. त्यामुळे हा संघ मोसमात पाच बरोबरी साधू शकला आहे. हे यंदाच्या मोसमातील सर्वाधिक प्रमाण आहे.

दुसरीकडे पुण्याने दहा संघांमध्ये सर्वाधिक गोल पत्करले आहेत. त्यांच्या काहीशा कमकुवत बचाव फळीसमोर मायकेल सुसैराज, सर्जिओ सिदोंचा अशा खेळाडूंचे आव्हान असेल. या दोघांना गोल करण्याचा फॉर्म गवसला आहे.

भारताच्या मायकेल याचे फरांडो यांनी कौतूक केले. ते म्हणाले की, मायकेल हा फार चांगला खेळाडू आहे. मोसमपूर्व शिबीर सेगोव्हीयामध्ये झाले. तेव्हापासून त्याने कामगिरीत सुधारणा केली आहे. तो कसून सराव करीत असून चांगला खेळ करतो आहे.

स्टार स्ट्रायकर टिम कॅहील या लढतीत खेळू शकणार नाही. तो त्याच्या गौरवनिधी सामन्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील लढत खेळण्यास गेला आहे. गौरव मुखी हा सुद्धा नसेल, कारण याला निलंबीत करण्यात आले आहे.