ISL 2018: पुणे-चेन्नईयीन यांना कामगिरीत जोश आणण्याची गरज

पुणे: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये एफसी पुणे सिटी आणि चेन्नईयीन एफसी फॉर्मसाठी झगडणे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. गेल्या मोसमात हे दोन्ही संघ दणदणीत फॉर्मात होते आणि त्यांनी बाद फेरीतील स्थान नक्की केले होते. आता बाजी पलटविण्यासाठी त्यांना मंगळवारी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढतीत कामगिरीत जोश आणण्याची गरज आहे.

चेन्नईयीन एफसीने गेल्या मोसमात जेतेपद खेचून आणले होते. आता गुणतक्त्यात तळाला असलेल्या या संघांना लवकर स्थिरावणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे असलेला वेळ कमी होत चालला आहे. त्यामुळे ही लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असेल. त्यात त्यांचे अस्तित्व पणास लागले असेल.

पुणे सिटीचे हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांनी सांगितले की, आता एक तृतीयांश मोसम संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी बाद फेरी गाठलेले दोन संघ यंदा या टप्यास या स्थितीत असतील असे कुणाला वाटले नसेल. आम्ही आम्हाला नको असलेल्या स्थितीत आहोत आणि आता घसरण थांबवून आगेकूच करणे आमची जबाबदारी आहे.

मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांची हकालपट्टी झाल्यानंतर रेड्डी यांच्याकडे सुत्रे आली. त्यांच्यासाठी पहिला प्रयत्न धक्कादायक ठरला. याचे कारण एफसी गोवा संघाकडून पुणे सिटीचा 2-4 असा पराभव झाला. त्यानंतर मात्र केरळा ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी साधून त्यांच्या संघाने चित्र बदलण्याचे संकेत दिले.

आता त्यांच्यासमोर खडतर आव्हान असेल. ब्राझीलचा स्ट्रायकर दिएगो कार्लोस याला गोव्याविरुद्ध रेड कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी आली. मार्को स्टॅन्कोविच हा जायबंदी झाला आहे. मागील आठवड्यात त्याने सनसनाटी गोल केला, पण सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली.

अशा परिस्थितीत एमिलीयानो अल्फारो याच्यावरच मदार असेल. त्याने दोन सामन्यांत दोन पेनल्टी दवडल्या आहेत. मार्सेलिनीयो याला सुद्धा गोलसमोरील फॉर्म लवकरात लवकर मिळविणे गरजेचे आहे.

जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन तळात दहाव्या स्थानी आहे. आक्रमणाबरोबरच बचावातही त्यांची कामगिरी खराब ठरली आहे. पुण्याच्या जोडीला लिगमधील सर्वांत खराब बचाव त्यांचा ठरला आहे. त्यांना 11 गोल पत्करावे लागले आहेत.

ग्रेगरी यांनी सांगितले की, आमच्यासाठी मोसम आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. सहा सामन्यांत आम्ही केवळ एक गुण मिळवू शकलो आहोत. येथे बोलून काही फरक पडणार नाही. त्यासाठी आम्हाला मैदानावर कामगिरी करून दाखवावी लागेल. उद्या संध्याकाळी मी असे खेळाडू निवडेन ज्यांच्याकडे सर्व तीन गुण जिंकण्याची जिगर आणि इच्छाशक्ती असेल.

आतापर्यंत संधी न मिळालेल्या खेळाडूंना ग्रेगरी मैदानावर उतरवतील का याची प्रतिक्षा असेल. ग्रेगरी नेल्सन याने बदली खेळाडू म्हणून दोन वेळा लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे तो प्राथमिक संघातून सामना सुरु करण्याची अपेक्षा आहे. करणजीत सिंग याला सुद्धा फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे त्याचे स्थान संजीबन घोष घेण्याची शक्यता आहे.

फॉर्मसाठी झगडणाऱ्या दोन संघांमधील लढतीत सरशी कुणाची होणार हा उत्सुकतेचा मुद्दा आहे. पुणे सिटी क्लब पोर्तुगाल यांच्या जागेवर कायमस्वरुपी नियुक्ती करण्याआधी रेड्डी संघाला विजयाचा मार्ग दाखविणार का की चेन्नईयीनची कामगिरी आणखी घसरणार हे उद्या ठरेल.