ISL 2018: गोल्डन बुटच्या शर्यतीमधील आघाडीसह कोरो भरात

मुंबई: हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात एफसी गोवा संघाचा स्पॅनीश स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने गोल्डन बुटच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. गेल्या मोसमात त्याने 18 गोलांसह हा मान मिळविला होता. यंदा सुद्धा हा किताब राखण्यासाठी तो भरात आला आहे.
 
कोरोच्या धडाक्याचा सर्वांत अलिकडचा फटका बसलेला संघ आहे केरळा ब्लास्टर्स एफसी.  सहा सामन्यांत त्याने आठ गोलांचा धडाका लावला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील नॉर्थइस्ट युनायटेड एफसीच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याला त्याने दोन गोलांनी मागे टाकले आहे.
 
स्पर्धेला आता भारताच्या आंतरराष्ट्रीय लढतीमुळे ब्रेक आहे. त्याआधी कोरोने धडाका राखला. ब्लास्टर्सची बचाव फळी कितीही प्रयत्न करून त्याला रोखू शकली नाही. त्यांची दमछाक झाली असेल, पण कोरोने त्यांना हुलकावणी देत दोन अप्रतिम गोल केले. पहिला गोल त्याने हेडिंगवर करताना गोलरक्षकाला चकविले, तर दुसरा गोल वैयक्तिक प्रयत्नांमुळे साकार केला. हा गोल दर्जेदार होता.
 
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी सांगितले की, कोरोच्या फिनीशिंगचा दर्जा अतुलनीय असाच आहे. तो लीगमधील सर्वोत्तम खेळाडू आहे असे वाटते. त्याला संधी दिली तर तो गोल केल्याशिवाय राहात नाही.
 
मोसमाच्या प्रारंभी कोरोच्या परिणामकारक खेळाविषयी प्रश्नचिन्ह होते. याचे कारण गेल्या मोसमातील त्याचा आघाडी फळीतील जोडीदार मॅन्युएल लँझरॉत एटीके संघाशी करारबद्ध झाला होता. कोरोच्या कामगिरीवर मात्र काहीही परिणाम झाला नाही. एदू बेदिया आणि ह्युगो बौमौस यांच्या साथीत त्याचा खेळ बहरलेलाच आहे.
 
त्याच्या मैदानावरील हालचाली, योग्य ठिकाणी जाण्याचे कौशल्य, गोलच्या संधीचा वेध घेणे असे पैलू या मोसमात आणखी विकसित झाले आहेत. यंदाच्या मोसमात गोल्डन बूटच्या किताबासाठी दुसऱ्या कुणा खेळाडूचे नाव दावेदार म्हणून पुढे आणणे शक्य नाही असेच चित्र आहे.
 
कोरोने दर 66 मिनिटांनी एक गोल अशी सरासरी राखली आहे. केवळ एक मोठी संधी त्याने दवडली आहे. या कामगिरीवरून त्याचे सफाईदार कौशल्य दिसून येते. त्या तुलनेत ओगबेचे याने पदार्पणाच्या मोसमात दर 90 मिनिटांना एक गोल अशी सरासरी राखली आहे, पण त्याने आताच दोन चांगल्या संधी वाया घालविल्या आहेत.
 
या शर्यतीमधील सुनील छेत्री, बेदिया, मिकू असे खेळाडू कोरोला गाठण्याची शक्यता फार धुसर आहे. कोरोचा खेळ म्हणजे केवळ गोल करण्यापुरता मर्यादीत नाही. त्याने बेदिया, ह्युगो, जॅकीचंद सिंग यांच्याशी छान जोडी जमविली आहे. याशिवाय त्याने चार गोलांमध्ये योगदान दिले आहे. ओगबेचे मात्र एकही अॅसिस्ट करू शकलेला नाही. त्यामुळे तो फेडेरिको गॅलेगो याच्यासारख्या खेळाडूंशी जोडी जमवू शकलेला नाही आणि गोलच्या संधी निर्माण करू शकलेला नाही.
 
कोरो हा एफसी गोवासारख्या दमदार आणि आक्रमक खेळ करणाऱ्या संघाकडून खेळतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे त्याला दर्जेदार साथ मिळणे कधीच थांबत नाही, एफसी गोवाने आतापर्यंत 21 गोलांचा पाऊस पाडला आहे. मोसम पुढे सरकत जाईल तशी ही संख्या वाढविण्याची पुरेशी संधी त्याला मिळेल. फॉर्मातील संघाची साथ लाभल्यामुळे कोरो गोलसाठी विजिगिषूवृत्ती दाखवू शकतो. त्यामुळेच त्याला कुणी गाठणे अवघड दिसते.