ISL 2018: पहिल्या चार संघांतील स्थान पक्के करण्याचे नॉर्थइस्टचे लक्ष्य

गुवाहाटी। नॉर्थइस्ट युनायटेडची येथील इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर आज (8 डिसेंबर)  एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) विरुद्ध लढत होत आहे. पहिल्या चार संघांमधील स्थान पक्के करण्याचा नॉर्थइस्टचा निर्धार असेल. सलग दोन बरोबरी झाल्यानंतर नॉर्थइस्टला विजयाची गरज आहे.

दोन्ही संघांनी चार सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे. एटीकेला जमशेदपूर आणि बेंगळुरू यांच्याविरुद्ध बरोबरी साधावी लागली. त्याआधी त्यांनी दोन सामने जिंकले होते. एटीकेने मागील सामन्यात चेन्नईयीनविरुद्ध 3-2 असा थरारक विजय मिळविला होता.

नॉर्थइस्ट 10 सामन्यांतून 19 गुणांसह गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. एटीकेचा संघ फार पिछाडीवर नाही. 10 सामन्यांतून 16 गुणांसह त्यांचा सहावा क्रमांक आहे. नॉर्थइस्टने 2015 मध्ये साखळीत 20 गुणांसह पाचवा क्रमांक अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. शनिवारी जिंकल्यास त्यांना गुणांचा उच्चांक मागे टाकता येईल. प्रशिक्षक एल्को शात्तोरी हा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्नशील असतील. आपल्या मार्गदर्शनाखाली संघाने किती वाटचाल केली हे दाखवून देण्याचा त्यांचा उद्देश राहील.

मागील सामन्यात नॉर्थइस्टने वर्चस्व राखले होते. बेंगळुरूला मोसमातील पहिलाच पराभव पत्करण्यास भाग पाडण्याची संधी त्यांना होती, पण भरपाई वेळेत चेंचो गील्टशेन याने सनसनाटी गोल केला. या बरोबरीनंतरही शात्तोरी यांच्यासाठी जमेचे अनेक मुद्दे आहेत. त्यांचा संघ आठ दिवसांत तिसरा सामना खेळत असेल. त्यामुळे  नेदरलँड््सच्या शात्तोरी यांच्यासाठी थकवा हा चिंतेचा विषय आहे.

ते म्हणाले की, आमचा सर्वांत मोठा शत्रू असेल तो थकवा. पहिल्या चार संघांमध्ये राहण्याचे आमचे ध्येय आहे, पण ते मोठे आव्हान आहे. जमशेदपूर, बेंगळुरू, एटीके या संघांचे बचावाचे स्वरुप सारखेच आहे. ते 4-2-3-1 किंवा 4-4-2 अशा स्वरुपाने खेळतात. त्यांचे आक्रमणाचे धोरण मात्र इतर संघांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यामुळे हा मोसम आमच्यासाठी खुला आहे. आम्हाला कमी अंतराने सलग दोन सामने खेळावे लागले आहेत. एटीकेला सुद्धा असे करावे लागले होते. आमच्या खेळाडूंना अशा भरगच्च वेळापत्रकाची सवय आहे.

उरुग्वेचा हुकमी खेळाडू फेडेरिको गॅलेगो याचा फॉर्म प्रशिक्षकांसाठी सुखद आहे. तीन गोल आणि पाच अॅसिस्ट अशा कामगिरीसह तो चमकला आहे आणि संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरला आहे. तो स्पर्धेतील सर्वोत्तम मध्यरक्षक ठरला आहे. अशावेळी एटीकेचे प्रशिक्षक स्टीव कॉपेल यांना त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयास घ्यावे लागतील.

एटीकेकडे मॅन्युएल लँझरॉत याच्या रुपाने कल्पक आणि शैलीदार खेळाडू आहे. तो प्रतिस्पर्धी बचावाला प्रत्यूत्तर ठरू शकेल. मागील सामन्यात चेन्नईयीनविरुद्ध त्याने दोन पेनल्टी सत्कारणी लावल्या. स्पेनचा हा खेळाडू धडाका कायम राखण्याची कॉपेल यांना आशा असेल.

एटीकेसाठी मोसमाचे पारडे सारखे दोलायमान होत आहे. मोसमातील पहिले दोन सामने गमावल्यानंतर या संघाला संमिश्र यश आले आहे. कॉपेल यांनी सांगितले की, काही वेळा तुम्हाला संघ माहित करून घ्यायला वेळ लागतो. तुम्हाला संघातील महत्त्वाचे खेळाडू, योग्य स्वरुप, संघातील वैविध्य लक्षात यावे लागते. मोसम पुढे सरकतो तशी तुमची माहिती वाढत जाते.

एटीकेसाठी जमेची बाब म्हणजे दुसऱ्या फेरीत नॉर्थइस्टविरुद्ध एकमेव गोलने हरल्यानंतर त्यांना आणखी एकच पराभव पत्करावा लागला आहे.  कॉपेल यांनी सांगितले की, दोन्ही संघांनी त्यानंतर प्रगती केल्याचे मला नक्कीच वाटते. नॉर्थइस्टचा आत्मविश्वास बराच उंचावला आहे. ते सामने जिंकत आहेत. त्यांचा संघ भक्कम आणि शिस्तबद्ध आहे. याचे  श्रेय प्रशिक्षकांना द्यावे लागेल. या संघाने मारलेली मजल हा काही दैवाचा भाग नाही. हा सामना खरेच खडतर असेल. प्रेक्षकांना चुरशीचा खेळ पाहयला मिळेल.

एटीकेचे फुलबॅक्स रिकी आमि अंकित मुखर्जी यांनी कौतुकास्पद खेळ केला आहे, पण त्यांच्यासारख्याच गुणवान रेडीम ट्लांग आणि लालथाथांगा खॉल्हरिंग या जोडीचे त्यांना आव्हान असेल.

दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे जो चमकदार गुणवत्ता मैदानावर दाखवेल त्याची सरशी होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: मार्सेलिनीयोच्या गोलमुळे पुण्याचा ब्लास्टर्सला धक्का

दुसऱ्या डावात अपयशी ठरला तर केएल राहुलला सरळ नारळ द्या

जगातील कोणत्याही संघावर येऊ नये ती वेळ आज पाकिस्तानवर आली